कंधारचे ग्रामदैवत म्हणून सर्व परिचित असलेले अष्टभुजा खडंकी देवीचे मंदिर या देवीच्या हातात खडग (तलवार )आहे म्हणून या मंदिराचे नाव अष्टभुजा खडंकी माता मंदिर असे पडले ,
देवीची मूर्ती ही गारगोटीच्या दगडातील असून महिषासुराचा वध करत असलेल्या दुर्गाभवानी रूपामध्ये आहे , देवीस आठ हात असून सर्व हातामध्ये आयुधे आहेत, महिषासुर हा मनुष्य आणि पशु या दोन रूपात आहे तर त्याचे शरीर रेड्याचे असून त्याचे शीश हे राक्षसाचे आहे तर देवीचे वाहन सिंह असून आक्रमक दिसून येतो.
या मंदिराचे बांधकाम कळ्या पाषाणात केलेले असून उंच अशा वट्ट्यावर बांधले आहे मंदिरात गर्भगृह, ओहरी व सभामंडप हे तीन भाग आहेत मंदिरात जाण्यासाठी दगडी कोरीव पायऱ्या आहेत तर मंदिर जमिनीपासून दहा फूट उंचीवर आहे. या मंदिराच्या सुरक्षा भिंती व किल्ल्याच्या संरक्षण भिंती मध्ये साम्य दिसून येते.
या मंदिराचे शिखर आधुनिक पद्धतीने बांधले असले तरी हे शिखर श्री लक्ष्मी यंत्राच्या आकारात असून हे शिखर कासवाच्या पाठीवर उभारल्या गेलेले आहे हे विशेष.आणि दररोज सूर्यकिरणे हे देवीच्या गर्भग्रहापर्यंत व देवीच्या मूर्तीवर पडतात हे मात्र सर्व भाविकात कुतुहल निर्माण करणारे आहे हे मंदिर स्थापत्यशास्त्राचे अलौकिक उदाहरण आहे
राजा कृष्णदेवराय तिसरा हा देवीचा उपासक व शिवभक्त होता, कृष्णदेवराय यांनी इसवी सनाच्या नवव्या शतकामध्ये कृष्णपुर (पंचाळपूर,कंधार) नगरीची स्थापना केली, त्यावेळी अनेक मंदिरे या कंधार परिसरात बांधले .
कंधार येथे भुईकोट किल्ल्याची बांधणी करण्या अगोदर त्याने जगतुंग सागर च्या काठावर देवीची प्राणप्रतिष्ठा केली. त्याचबरोबर या जगतुंगसागराच्या बांधणीसाठी ,निर्मितीसाठी देवीच्या मंदिरा लगतच सिद्धिविनायक गणेशाची स्थापना करून तलावाचे काम पूर्ण केले .
अष्टभुजा खडंकी माता मंदिर हे पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे ग्रामदैवत आहे नवरात्र मोहत्सवाच्या काळामध्ये महाराष्ट्र .कर्नाटक. तेलंगाना. आंध्रा येथील भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात नवरात्राच्या काळामध्ये मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमासह सामाजिक उपक्रम मोठ्या प्रमाणामध्ये घेतले जातात विशेषतः अष्टमीच्या दिवशी होणारे कुमकुमअर्चन ही पूजाविधी साठी हजारो महिला या ठिकाणी उपस्थित राहुन सामूहिक पूजा केली जाते
या मंदिराचा जिर्णोद्धार सोळाव्या शतकामध्ये या किल्ल्याचा किल्लेदार गोपाळसिंह राजपूत याने केला असून या मंदिरामध्ये यात्रेकरूसाठी धर्मशाळा, वाट सुरू साठी पानपोई , घोड्यांसाठी पागा ही बांधला.
आज हे मंदिर सुस्थितीत ठेवण्यासाठी गेल्या पन्नास वर्षापासून या मंदिराची विश्वस्त स्व.हरिसिंह ठाकूर यांनी शर्तीचे प्रयत्न केले. तर हीच परंपरा सध्या मंदिराची विश्वस्त उषाताई हरीसिंह ठाकूर हे पार पाडत आहेत .
जगतुंग सागराच्या काठावर असलेल्या मंदिरात होणारी सायंकाळची आरती ही मन प्रसन्न करणारी असते आणि मंदिरातून दिसणारा अथांग जगतुंगसागर व नयनरम्य परिसर मन प्रसन्न करणारे आहे या मंदिरात आल्यावर नवचैतन्य, ऊर्जा मिळते हा अलौकिक अनुभव भाविकांसाठी अनुभव करण्यासारखा आहे…..