कंधार/प्रतिनिधी
श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा.डॉ.पुरूषोत्तम धोंडगे यांना लोकशाही मराठी या वृत्त वाहिनीच्या वतीने सामाजिक व शैक्षणिक कार्याबद्दल दिला जाणारा “लोकशाही सन्मान” पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्याहस्ते दि.१५ ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता यशवंतराव चव्हाण सभागृह मुंबई येथे हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.
प्रा.डॉ.पुरूषोत्तम धोंडगे यांनी कोरोना काळात कंधार आणि लोहा शहरांमध्ये ‘भाऊचा डब्बा’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केला.या उपक्रमाने ८८५ दिवसाचा टप्पा पार केला. उपक्रमाच्या माध्यमातून गरजूंना अन्नदान सुरू आहे. कंधार व लोहा ग्रामीण रुग्णालयातील व खासगी हॉस्पिटल मधील डॉक्टर, नर्स व रुग्णवाहिका चालकांना पीपीई किट, मास्क व सॅनिटायझरचे मोफत वाटप केले. मुख्यमंत्री सहाय्यता निधी, पूरग्रस्तांना, सामुहिक विवाह सोहळ्याला प्रत्येकी १ लक्ष रुपयांची मदत केली. कोरोना काळात गरजूंना व दिव्यांगांना अन्नधान्याच्या किटचे वाटप केले. कोरोना काळात ज्याचे पालकत्व हिरावले अशा सर्व विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारले. भाग्यश्री जाधव या अपंग विद्यार्थिनीला ऑलिंपिक खेळासाठी किट व १ लक्ष रुपयांची आर्थिक मदत केली.
लोहा येथील लक्ष्मीकांत कहाळेकर या विद्यार्थ्याला एमबीबीएसची फिस भरण्यास मदत केली. आशा विविध सामाजिक व शैक्षणिक कार्याची दखल घेऊन त्यांना लोकशाही सन्मान हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, खा.सुप्रियाताई सुळे, लोकशाही मराठी वृत वाहिनीचे मुख्य संपादक कमलेश सुतार आदी उपस्थित होते. प्रा. डॉ. पुरुषोत्तम धोंडगे हे शेकापचे ज्येष्ठ नेते जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी, माजी आमदार व माजी खासदार, दिवंगत भाई डॉ. केशवराव धोंडगे यांचे कनिष्ठ पुत्र आहेत. या सन्मानाबद्दल त्यांचे सर्वस्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.