माणुसकीशी नाळ जोडुन असलेला प्रा भगवान आमलापुरे यांचा निरागस कविता संग्रह ‘गारपीट’ ! 

        प्रा भगवान किशनराव आमलापुरे, या किशनराव आणि पार्वतीबाई या आई वडीलांच्या पोटी जन्माला आलेल्या सदगृहस्थाच्या चेह-यावर कायम करुणा आणि नितळ निर्मळ हसू.’सौ.अन्नपुर्णा’ आणि दोन कन्या ‘धनश्री’ आणि ‘यशश्री’ हे त्यांचं चौरस घर.प्रचंड चढ उतार आणि खाच खळग्यांनी आयुष्य भरलेलं असूनही हा मनुष्य कठीन कठोर होवू शकला नाही. ते त्यांच्या अंगी असलेल्या कवितेमुळं. अशा मायाळु  स्वभावाचा हा सज्जन मनुष्य आज ब-यापैकी स्थिर झालेला आहे.खिशात परळीच्या मराठवाडा साथीचं वार्ताहार म्हणून ओळखपत्र असलेला परंतू इंग्रजी विषयाचा प्राध्यापक मनुष्य जो धर्मापुरीच्या कै.शंकरराव गुट्टे
ग्रामीण वरिष्ठ महाविद्यालयात कार्यरत आहे. कधी कुठं भेट झाली तर नेहमीच हा मनुष्य हसून बोलतो. प्रचंड नम्रता, विनयशीलता अंगी रुजलेला सभ्य मनुष्य होय.कधी मधी ‘काय लिहिलं अशात महोदय ?’ असं म्हटलं की मनाची कळी कायम खुलणारा हा मनुष्य एखाद दुसरी निरागस रचना नेहमी ऐकवणार.अंबाजोगाईच्या आमच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाचं पेपर तपासणी केंद्र असल्याने सतत गाटी-भेटी होत रहातात आणि मग इंग्रजी विषयाच्या अंगानं चर्चा करंत करंतच कधी आम्ही कवितेकडं वळतो, कळंत नाही .परंतू विषयाच्या अंगानं सुरु झालेलं अभिवादन आणि चर्चा शेवटी कवितेच्या आंगणात स्थिरावते आणि मग कांही एक छान ऐकणं, ऐकवणं होतं.

 

 

        कवितेतुन तुमच्या मनाचा ठावठिकाणा लागतो. तुम्ही काय विचार करता कळतं आणि काय भावना बाळगता हे ही कळतं.तुम्हाला करावं काय वाटतं, तुम्हाला व्हावं काय वाटतं, तुमचं स्वप्न काय आहे आणि त्यासाठी केलं काय जावं ते ही कळतं. अमलापुरे महोदयांच्या कवितांनी हा मनुष्य असाच साधा सोपा करुन ठेवला आहे .आपल्या समोर हा भोळा भाभडा निरागस मनुष्य कविताही तशाच निरागस लिहितो हे त्यांच्या सात्विक स्वभावाचं सादरीकरण आहे.


        प्रा भगवान आमलापुरे कंधार तालुक्यातील कंधारेवाडी या कंधार पासून मन्याड नदीच्या बॅकवॉटर भागापासून दहा किलोमिटर अंतरावरील खेड्यातले. त्यांचं रहातं गाव फुलवळ जे जळकोट – कंधार दरम्यान आहे. वडीलांचा जीव शेती, किरणा दुकानात आणि साखर कारखाण्यात ठेकेदार म्हणून रमलेला.चार भावंडं आहेत, त्यातलं शेंडेफळ म्हणजे कवी भगवान आमलापुरे. महोदयांचं प्राथमिक शिक्षण कंधारेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत तर माध्यमिक शिक्षण अनुक्रमे फुलवळ आणि मोटरगा या गावी झालं. पुढं आकरावी ते पदवी पर्यंत ते देगलुरच्या देगलूर महाविद्यालयात शिकले. तिथे कळत नकळत ते कविवर्य प्राचार्य लक्ष्मिकांत तांबोळींच्या शिस्तीत शिकले. पदव्युत्तर शिक्षणासाठी त्यांनी उदगीरचं उदयगिरी महाविद्यालय गाठलं आणि पुढं एम फिल साठी २००७ साली तामिळनाडूचं विनायक मिशन श्रीशैलम गाठलं. २००४ साली महोदयांचे वडील निवर्तले. आई चौ-याऐंशी पंचाऐंशीच्या असतील. महोदय धर्मापुरीच्या ग्रामीण महाविद्यालयात पुर्णवेळ, कायमस्वरुपी इंग्रजी विषयाचे प्राध्यापक आहेत. देगलूरला असताना आमलापुरे डायरी लिहित ज्यात त्यांच्या काव्यलेखणाचं मुळ आहे.या पुस्तकाच्या प्रकाशनापुर्वी त्यांच्या कविता ०५ – ०६

वृत्तपत्रांमधून छापून आलेल्या आहेत. ‘शब्दगंध’ या प्रातिनिधीक कविता संग्रहातही त्यांच्या कविता प्रकाशीत झालेल्या आहेत. आकाशवाणी नांदेड केंद्रावरुन त्यांनी ,” युवावाणी ” या कार्यक्रमात काव्यवाचन केले आहे.ते मराठवाडा साथीचे स्तंभ लेखकही आहेत.हे असे पाय रोवून उभे राहिलेले माणसं कुठल्या ना कुठल्या रुपात व्यक्त होणारंच. त्यामुळं गाव, रान, जनवारं, पिकपेरा, ग्रामसंस्कृती, नातीगोती, गणगोत,संसार, शिक्षण, राजकारण आणि एकुणच भारतीय माणुस आणि त्याचा मनोव्यवहार त्यांच्या चिंतनाचा गाभा आहे. या कविता संग्रहातल्या कविता काव्यलेखणाच्या पहिल्या टप्प्यातल्या आहेत. त्यामुळं त्यात तत्वज्ञान आणि तात्विक चर्चा हा विषय नाही.विषय आहे काय आवडलं आणि काय नाही. त्यामुळं लिहायला कविनं काय निवडलं आणि काय नाही हे सहज कळतं.भाषेच्याही बाबतीत फार सौंदर्यशास्त्रांचा धांडोळा घेण्याचं कारण नाही. एकोनिसाव्या शतकातला लोकप्रिय इंग्रजी कवी विलीयम वर्ड्सवर्थ म्हणतो तशी दैनंदिन संभाषणातली साधी सोपी भाषा कवी आपल्या कवितांमधुन बोलतो आहे, हे सुंदरच आणि आवश्यकही आहे.

 

 


         कवी भगवान आमलापुरे स्वत: प्राध्यापक आहेत, संवेदनशील मनुष्य आहेत. त्यामुळं शिक्षणातल्या उणीवा त्यांच्या डोळ्यांना सहज दिसतात आणि मग अस्वस्थलेपण आलंच.ही संवेदनशील मनाची अस्वस्थताच त्यांना लिहिण्या – बोलण्यासाठी प्रवृत्त करते.ही मनुष्याच्या अंगी असलेली अस्वस्थताच तर कविता लिहिण्याची पहिली पायरी आहे. ही बेचैनी तम्हाला गप्प बसू देत नाही.मन खात रहातं स्वत:ला.त्यातुन मग बोलतो माणुस आणि निर्णायक वळणावर लेखणी घेतो हातात.ही लेखणीच तर सभ्य आणि सत्शिल मनुष्याचं शस्त्र आहे. कवी या संवेदनशील अस्वस्थतेच्या विळख्यातुन सुटण्यासाठी शब्दांचा वापर करतो.मोजके, नेमके आणि मर्मग्राही शब्द त्याच्या भावना आणि विचारांना कधी छंदात तर कधी मुक्तछंदात व्यक्त होतात.कविता लिहिण्याची पहिली पायरी आमलापुरेंकडं आहे त्यामुळं त्यांच्या लिहिण्याला अर्थ आहे.आमलापुरेंच्या कवितांनी शेतीच्या अंगानं येणारा निसर्ग आहे. ज्यात अग्रक्रमाने पाऊसपाणी, दुष्काळ, शेती, शेतकरी, सण-समारंभ आलेच.या अशा लिहिण्याच्या कांही छान नोंदी इथं करणं शक्य आहे.

       ‘नाळ’ही ‘गारपीट’ कविता संग्रहातील पहिली कविता. भारतीय शेती आणि तिचा जाळभाज हा या कवितेचा आषय.खरीप आणि रब्बी असे दोनही हंगाम पावसाच्या भरवशावर.पाऊस आला तर सुगी नाही तर अर्थातच दुष्काळ. निसर्गाचं आकलन नसलेले निगरगट्ट लोक आणि त्यांच्या निसर्गविरोधी कृतींमधून शेती नासवली जाते आहे ही मूळ भावना.त्यावर उपाययोजना म्हणून कवी म्हणतो…

”  यापुढंही एक पाऊल धावनार आहे.
  दोन-दोन वृक्ष दरवर्षी लावणार आहे.
  आणि वातावरणामधील बदल होवू नये,
  पुन्हा गारपीट व निसर्गाची मारपीठ
  आम्हा शेतक-यांच्या नशिबी येवू नये,
  ही करत-करत मुखानं उपासना
  अगदी पोटच्या लेकरागत…
  त्यांची करणार आहे जोपासना ! “
  (नाळ)

ही स्वत:प्रती व्यक्त केलेली कवीची कटीबद्धता मला मौलिक वाटते.

‘नवक्रांती’ ही कविता हाच शेतीमातीचा विषय पुढं नेते ती अशी…

” तुमच्या डिजीटल इंडियात
  थोडा आमचा भारतही नटवा,
  अन् साहेब ! तुमचा कॅमेरेवाला
  आमच्या रानातही पाठवा ! “
  ( नवक्रांतीची मशाल )

ही राजकीय व्यवस्था शेतकरी, शिक्षण आणि एकुणातच समग्र पातळ्यांवरती अपयशी ठरली आहे.  नेतृत्व निगरगट्ट होवून बसलं आहे.अधुनिकतेच्या नावाखाली शोषण सुरु होतंय. या बद्दल ही रचना विषेश लक्ष खेचून घेणारी आहे.

कवी कायम विनाअनुदान आणि सेवेतील अडचनींमुळं पार  वैतागून गेला आहे. अशा वेळी त्याला शेतावर विसंबून रहानं परवडंत नाही. तेंव्हा कवीची अगतीकता त्याच्या हातुन हे असं कांही लिहून घेते…

” एकच सवाल आहे 
  कि कोण करणार आहे मला,
  वैद्यवनाथाच्या साक्षीने 
  मखमली गोंड्याचा आहेर !
  काढणार कोण 
  गाळातली घोंगडी ?
  चाळातली बेडी ?
  पिचलेली नस
  कानातील रस 
  आणि कोण काढणार मला या दलदली बाहेर ? “
( गोंड्याचा आहेर )

हे असे अंत:करण पिळवटून टाकणारे प्रश्न कवी आपल्या कवितांमधून समाजासमोर ठेवतो आहे.

अशा प्रश्नांचा विचार करताना ‘रविवारची साहित्यिक पुरवणी’ ती वैचारीक आणि भावनीक कोंडी फोडायला मदत करते. राजूरच्या बाजारातील सुसंवाद ब-यापैकी ही जगण्याची झालेली कोंडी फोडतो.वृत्तपत्रांमधून 

येणा-या अन्याय अत्याचाराच्या बातम्यांनी रोज जीव बिमार पडतो.बातम्या वाचताना जीवाची चाळण होते.अशावेळी कविताच हे सगळं निस्तारु शकते वाटणं हे या साहित्याचा फार मोठा सन्मान आहे. कवी  लिहितो…

” पाहून समाज मनाची भणक
  मी झालो कवितांचा जनक
  पण मिळण्यासाठी रौनक
  झालं पाहिजे शौणक “
  (लक्ष्मण रेषा )

अशाही आवस्थेत कवीला चार चांगली माणसं दिसतात ती ‘कै दिगांबरराव पटणे साहेब, आणि अधुनिकतेचा चेहरा म्हणून ‘वैजनाथराव सादलापुरे काका’ यांचा आदर वाटतो.

 

 

       ‘ पावसाळी ज्योत ‘, ‘ जीवन निष्ठा ‘, ‘अर्थातच दुष्काळ ‘, ‘भाषिक कर्ज ‘, ‘आबाळ ‘ , ‘आवई ‘ ‘पापाचा घडा ‘, ‘ टिंब टिंब ‘, ‘सांस्कतीक पाऊलखुणा,’ ‘शेतकरी बापडे ‘ ‘ ‘ ‘घटनाकारांचा ऊसुल ‘ ,’आत्मशोध ‘दुसरं पुष्प ‘, ‘ पदरमोड ‘, ‘ दोन व्यक्ती ‘ , ‘ शब्द आरती ‘, ‘ गावचा विकास ‘, ‘ जय विजय’, ‘ स्वर्ग सुख ‘, ‘ राष्ट्रीय एकात्मतेचा दीप ‘, ‘अमरत्वाचा मार्ग ‘, ‘अर्पण ‘,आणि ‘लोकनेता ‘ अशा तीस-पस्तीस कवितांचा हा सुंदर कवितासंग्रह कवीने आपल्या लाडक्या लेकीच्या वाढदिवसाला काढून मोठा आलौकीक आनंद साजरा केला आहे. यातील ‘अमरत्वाचा मार्ग ‘ ही रचना माणसाला अवयव दानाच्या माध्यमातुन अमरत्वाची वाट दाखवणारी आहे. ‘अर्पण ‘ ही रचना कवीच्या सुंदर संवेदनशीलतेचा परीचय करुन देणारी आहे.गाव, शाळा, महाविद्यालय, परीसर, परीवार, सन्मित्र, सद्गुणी नेतेगण, आपुलकी- जिव्हाळ्याचे साहित्यिक, गुरुजन, वडील अशा सगळ्यांप्रती नितांत श्रद्धाभाव व्यक्त करणारी कवीच्या मनाचं मोठेपण दाखवणारी रचना आहे.आपल्या आयुष्याला आकार देणारी माणसं मग ती रक्ताची, जातीची, मातीची असोत किंवा नसोत त्यांच्या बद्दल आपुलकी आणि जीव्हाळा व्यक्त करणं हे कुण्याही सज्जन मनाचं लक्षण या कवितेनं अधोरेखीत केलं आहे.गावमातीत रुतून बसलेली सज्जन  माणसं, कविवर्य लक्ष्मिकांत तांबोळी, गावातली जुनी शाळा, हिरीतल्या आंघोळी, पारावरली पोथी,  मायीच्या चपलेस,बापाच्या धाकास, पाटलाच्या पाटीलकीस आणि प्रा आमलापुरेंना धर्मापुरीच्या ग्रामीण महाविद्यालयात बोट धरुन घेऊन आलेल्या प्रो.एस. जी. मुंडे सर या मनानं मोठ्या असलेल्या माणसांची कृतज्ञतापुर्वक आठवण कवीनं मोठया खूबीनं जपली आहे.

“ब-यापैकी गावाबाहेरील जुन्या शाळेस,
सकारण कांतापुढे घोटलेल्या लाळेस,
मायीनं चपल्या हातात घेऊन मारोती समोरून जातांना ,
शेताच्या ओढीनं गडबडीत म्हटलेल्या आरतीस,
पाटलाच्या पाटीलकीला,
ऐन उमेदीत दिलेल्या आपुलकीला,
लास्ट बट नाॅट लिस्ट,
वाय नॉट फॉर प्रो. एस.जी. मुंडे सर, 
ज्यांनी मला आणलं, या इथवर,
ज्यांनी मला नेलं , त्या तिथवर.”
(अर्पण)

         या कविता संग्रहातील शेवटची रचना धर्मापुरी – परळी वै परीसराचे लोकनेते कै. गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या स्मृतीस अर्पण केली आहे.समाज आणि पक्षीय रीती रिवाज यातुन आवर्जून त्यांनी कायम झुकतं माप दिलं ते समाजहिताला. बघा हे कवीचं सुक्ष्म निरीक्षण…

” आम्हा आडचनीचा वेद,
  त्यालाच दिलात छेद,
  तेच करतोय शब्दबद्ध !

  पक्षाचा थोडा,
  जनतेचा जास्त,
  सरसेनापती” !
  (लोकनेता)

 

         प्रा आमलापुरे यांचा कवितासंग्रह त्यांच्या संवेदनशील मनाची साक्ष देतो. सर्व स्तरीय चांगुलपण उचलून धरतो. भल्या-बु-यातली सीमारेषा स्पष्ट करतो, भल्याची बाजू घेतो. सत्य- सुंदर- मंगलाची नित्य आराधना गातो.ही संहिता एका सभ्य माणसाच्या हृदयाचा मऊ मुलायम गाभा आहे.कै. शंकरराव गुट्टे ग्रामीण महाविद्यालय धर्मापुरीची ही पहिलीवहीली साहित्यिक मुद्रा आहे, जी इतिहास म्हणून कायम दखलपात्र राहील.धर्मापुरीचा हा पहिला कविता संग्रह म्हणूनही त्याची ऐतिहासिक नोंद होईलच.कालवर आपल्या गणगोतात, परीवारात, महाविद्यालयात आणि परीसरात सायलेंट मोडवर एक सामान्य आयुष्य जगलेला मनुष्य “गारपीट ” या कविता संग्रहाने सर्वांच्या आदराचा विषय होईल आणि हीच तर कवितेची किमया असते.प्रा आमलापुरेंच्या हातून खूप सारं गद्य पद्य लेखण लिहून झालेलं आहे. जे या प्रकाशनानंतर हळुहळू प्रकाशात येईलच आणि त्यासाठीही सन्मित्र कवी आमलापुरे यांना मन:पुर्वक शुभेच्छा देतो.

      ‘धनश्री’ या आपल्या थोरल्या लेकीचा वाढदिवस  कविता संग्रह काढून साजरा करणारा बाप निराळाच हो ! महोदय !  लेकीच्या सर्वांगसुंदर आयुष्यासाठी संपुर्ण व्यक्तिमत्व विकासासाठी मन:पुर्वक शुभेच्छा महोदय ! 

 

आपला,
प्रा.डॉ.मुकुंद राजपंखे,
(पदवी, पदव्युत्तर व संशोधन इंग्रजी विभाग प्रमुख)
यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, अंबाजोगाई.
मो.9881294226

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *