@नवरात्रोत्सवाचे नौरंग

 

नवरात्र म्हटलं की उत्साह, आनंद, झगमगाट आजूबाजूला दिसून येतो. नऊ दिवस अगदी आनंदी वातावरणाचे दिवस आपल्याला प्रत्येकालाच अनुभवायला मिळतात. मुळात नवरात्रीमध्ये नऊ दिवस नऊ वेगवेगळ्या रंगांना महत्त्व दिले जाते. आपण नेहमी पाहतो की आपल्या आजूबाजूला अगदी पहिल्या दिवसापासून ते नवव्या दिवसापर्यंत ठराविक रंगांना महत्त्व असते. पण नवरात्रीच्या वेळी हे वेगवेगळे 9 रंग नक्की का घातले जातात? त्यांचे काय महत्त्व आहे. याची तुम्हाला माहिती आहे का? दुर्गाची नऊ वेगवेगळी रूपं आणि त्याप्रमाणे त्याचे रंग या दिवशी घालायची प्रथा आहे. भारतामध्ये दुर्गा अर्थात देवीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अनेक आख्यायिकादेखील आहेत.
नवरात्रीच्या या उत्सवात नवरात्रीचे नऊ रंग आणि रंगांची उधळण कशाप्रकारे असते आणि कोणते रंग वापरण्यात येतात, त्याचे काय महत्त्व आहे. हे आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. दुर्गेची नऊ रूपं अर्थात शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, काळरात्री, महागौरी आणि सिद्धीत्री यांची या दिवसात पूजाअर्चा करण्यात येते. या देवींना आवडणाऱ्या रंगांवरून नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या रंगांचे महत्त्व ठरलेले आहे. नवरात्रीची पौराणिक कथा तुम्हाला माहीत असतील पण आज आपण कोणता रंग कधी येतो आणि त्या रंगाचे काय महत्त्व आहे. याचबरोबर त्या रंगाचे आपल्या आयुष्यात काय स्थान आहे.हे जाणून घेणार आहोत. पण बरेचदा वारानुसारही रंगाची निवड करण्यात येते. मूळ रंग आणि त्याचे महत्त्व हे देवीच्या आवडीनुसार असल्याचे म्हटले जाते. गेल्या दशकापासून ही प्रथा जास्त प्रचलित झाली आहे.
नवरात्रीच्या काळात त्या विशिष्ट रंगाचा आपल्या जीवनात समावेश करणे खूप शुभ मानले जाते. नवरात्रीच्या नऊ दिवसांतील प्रत्येक दिवसासाठी एक विशिष्ट रंग नियुक्त केला जातो.
नवरात्रीच्या निमित्ताने महिलांनी रोज ठराविक रंगानुसार कपडे घालण्याची प्रचलित अशी प्रथा अलीकडील काही वर्षांत जोडली गेल्याचे दिसून येते आहे. ही प्रथा व परंपरा प्रामुख्याने गुजरात आणि महाराष्ट्रात खूप प्रचलित झाली आहे. त्यामुळे नवरात्रीच्या काळात महिला दररोज विशिष्ट रंगाचे कपडे आणि दागिने घालताना दिसून येते आहे. नवरात्रीच्या निमित्ताने महिला दांडिया आणि गरबा खेळतात तेव्हा त्या नवरात्रीच्या दिवसाच्या रंगानुसार कपडे घालण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात.
नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचा रंग कोणत्या दिवसापासून नवरात्र सुरू होतो यावर अवलंबून असतो आणि उर्वरित आठ दिवसांचे रंग एका विशिष्ट क्रमानुसार ठरवले जातात. यावर्षी ची
शारदीय नवरात्री ही दिनांक 15 ऑक्टोबर 2023 ते 24 ऑक्टोबर 2023 या कालावधीत साजरा केला जाईल.
प्रत्येक दिवसाबरोबरच दिलेल्या रंगाला ही खूप महत्त्व असते.
1)नवरात्रीचा पहिला दिवस हा केशरी रंगाचा आहे.
केशरी रंगाचे कपडे परिधान केल्याने, देवी नवदुर्गाची पूजा केल्याने ऊर्जा आणि आनंदाची भावना येते असे मानले जाते. हा रंग सकारात्मक ऊर्जेचा स्रोत आहे. याचबरोबर हा रंग मनाला उत्साही ठेवतो.
2) नवरात्रीचा दुसरा दिवस हा पांढ-या रंगाने सुरू होणार आहे.
पांढरा रंग शुद्धता आणि साधेपण दर्शिवणारा आहे. देवीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी पांढर्‍या रंगाचे कपडे घालावे असे मानले जाते. पांढरा रंग आत्म-शांती आणि सुरक्षिततेची भावना देतो.
3)नवरात्रीचा तिसरा दिवस हा लाल रंगाचा आहे.
नवरात्रोत्सवासाठी लाल रंग हा उत्साह आणि प्रेमाचे प्रतीक आहे. देवीमातेला लाल चुनरी अर्पण करावे असे माणले जाते.लाल रंग हा भक्तांना शक्ती आणि चैतन्य देतो.
4)नवरात्रीचा चौथा दिवस हा गडद निळा रंगाचा आहे.
नवरात्रोत्सवात गडद निळ्या रंगाचा वापर केल्यामुळे अतुलनीय आनंदाची अनुभूती मिळेल असे मानले जाते. हा रंग समृद्धी आणि शांतता दर्शवतो.
5)नवरात्रीचा पाचवा दिवस हा पिवळा रंगाचा आहे.
पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याने नवरात्रोत्सवात मन आशावादी आणि आनंदी राहते असे मानले जाते. हा रंग उबदारपणाचे प्रतीक आहे, जो दिवसभर व्यक्तीला आनंदी ठेवतो.
6)नवरात्रीचा सहवा दिवस हा हिरवा आहे.
हिरवा रंग निसर्गाचे प्रतीक आहे. वाढ, प्रजनन, शांतता आणि स्थिरतेची भावना निर्माण करते.हिरवा रंग वापरून देवीला शांती मिळावी म्हणून प्रार्थना करावे असे मानले जाते. हिरवा रंग जीवनातील नवीन सुरुवात देखील दर्शवतो.
7)नवरात्रीचा सातवा दिवस हा (ग्रे) राखाडी रंगाचा आहे.
राखाडी रंग संतुलित विचारसरणीचे प्रतीक आहे आणि व्यक्तीला व्यावहारिक आणि साधे होण्यासाठी प्रेरित करतो. हा रंग अशा भक्तांसाठी योग्य आहे असे मानले जाते. ज्यांना फिकट रंग आवडतो त्यांनी त्यांच्या स्वतःच्या विशिष्ट शैलीने जीवनाचा आनंद घेण्यासाठी प्रेरीत करतो.
8)नवरात्रीचा आठवा दिवस हा जांभळा या रंगाचा आहे. संबंधित रंग हा अध्यात्म आणि ज्ञानाचे प्रतिनिधित्व करतो,
जांभळा रंग हा निळ्या रंगाची स्थिरता आणि लाल उर्जा एकत्र करते, एक कर्णमधुर आणि शाही वातावरण तयार करते.
9)नवरात्रीचा नवा दिवस हा मोरपंखी हिरवा रंगाचा आहे.
मोरपंखी हिरवा रंग विशिष्टता आणि व्यक्तिमत्व दर्शवतो. निळ्या आणि हिरव्या रंगाच्या या विशेष मिश्रणाचा वापर केल्याने दोन्ही रंगांच्या गुणांचा समृद्धी आणि नवीनतेचा फायदा होतो असे मानले जाते.
असे नवरात्रीचे नऊ रंग असतात. या रंगांचा उपयोग उत्सवादरम्यान पूजा केलेल्या प्रत्येक देवतांचे चित्रण करण्यासाठी केला जातो.याचे महत्व ऐवढ्या पुरतेच नसुन
नवरात्र हा ऋतू परिवर्तनाचा काल असतो. यामुळे आपल्या नवीन शक्ती, नवा उत्साह, उमेद निर्माण होत असते. बृहत संहितेनुसार सूर्य तसेच इतर ग्रहांमध्ये होणाऱ्या परिवर्तनाचा प्रभाव मनुष्याच्या आरोग्यावर आणि व्यवहारांवर होत असतो. सृष्टीतील परिवर्तन हा शक्तीचाच खेळ आहे.ब्रह्मचर्य, संयम, उपासना, यज्ञ केल्याने शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढते. स्मरणशक्ती चांगली होऊन बौद्धिक विकास होतो. म्हणून नवरात्र हा शारीरिक व आत्मिक शुद्धतेचा काळ आहे असे मानले जाते.

 

 

सौ.रूचिरा बेटकर, नांदेड
9970774211

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *