नांदेड दि. 27 :- भारत सरकारच्या हस्तशिल्प, वस्त्र मंत्रालय विकास आयुक्त कार्यालयाअंतर्गत छत्रपती संभाजीनगर हस्तशिल्प सेवा केंद्राच्या माध्यमातून चैतन्यनगर येथील सौभद्र मंगल कार्यालयात 31 ऑक्टोबर पर्यंत विविध खादी ड्रेस, साडी, बांगड्या व इतर वस्तुंचे प्रदर्शन व विक्री ठेवण्यात आली आहे. संपूर्ण देशात 2 ते 31 ऑक्टोबर या कालावधी खादी महोत्सवाचे आयोजन केले गेले आहे. स्थानिक कारागीर, विणकर यांना चालना देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम शासनाने घेतला आहे. मराठवाड्यातील विविध जिल्ह्यातून कारागिरांना इथे निमंत्रीत करण्यात आले आहे.
या प्रदर्शनात बंजारा उत्पादने, ज्यूटशिल्प, सोलापूर कॉटनवॉल हँगिंग, लाकडाची खेळणी, लाखेच्या बांगड्या व इतर साहित्य याचा समावेश आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते नुकतेच या प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले. या प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी एमसीईडी नांदेडचे शंकर पवार, छत्रपती संभाजीनगर हस्तशिल्प सेवा केंद्राचे सहाय्यक व्यवस्थापक अमन कुमार जैन, हस्तशिल्प संवर्धन अधिकारी शैलेंद्र सिंह हे विशेष परिश्रम घेत आहेत.