लाॅ ऑफ अट्रॅक्शन मध्ये नमुद केलेली पाच सुत्रे आपण तंतोतंत पाळली, तर आयुष्यातील सर्व दुःखे, सर्व समस्या, सर्व प्रॉब्लेम्स चुटकीसरशी ‘छुमंतर’ म्हटल्यासारखी पळुन जाऊ शकतात..
१) कितीही गंभीर समस्या असो, त्या समस्येकडे आश्चर्याने, नवलाईने, सकारात्मकतेने बघा. उदाहरणार्थ अ) आज दुकानात नोकर नाही आला या समस्येवर तुमची आश्चर्यकारक प्रतिक्रिया अशी असायला हवी की, “अरे वा.!, बघु आज, काय काय अडतयं त्याच्यावाचुन आपलं.!” ब) आज घरी कामवाली बाई नाही आली या अडचणीवर तुमचा आनंदी दृष्टिकोन, “असं का.? मज्जा आहे मग आज.!” असा ठेवायला काय हरकत आहे.?
क) प्रश्न : पंचवीस तारीख आहे, पैसे संपत आलेत यावर तुमचे मजेशीर समाधान : “छान, मस्त काटकसर करु आता पाच-सहा दिवस.!” ड) तो माझ्यावर निष्कारण चिडला. “अरेच्या, तो असं पणं करतो का.? असु दे.! असु दे.!” इ) तिने माझ्याशी उगीचचं भांडण केले, यावर तुम्ही नवल व्यक्त करत म्हणायचं “हो का.? किती मज्जा, आता रुसवा काढायची संधी मला मिळणार.!” बघा – कसलीही, कितीही भयानक समस्या आणा “कितीही गंभीर समस्या असो, त्याकडे आश्चर्याने बघा” ह्या फॉर्मॅटमध्ये ठेवुन बघा, आश्चर्य व्यक्त केल्यास, समस्येची तीव्रता अचानक नाहीशी होते, “ओह! हे असं आहे का.? अरे.! हे असं पण असतं का.? ओके.!” आहे त्याचा स्विकार केल्यास नव्यान्नव टक्के चिंता पळुन जातात. समजा, एखादा दात तीव्रपणे ठणकतोय, आता इथे कसा काय मार्ग काढणार.? एक उपाय आहे. डोळे बंद करुन, त्या दुखणार्या दाताकडे संपुर्ण लक्ष द्या, त्या त्रासदायक संवेदना अनुभवा, त्या ठिकाणी शंभर टक्के मन एकाग्र करा. बघा वेदनांची तीव्रता कमी होईल. गंमत अशी आहे, की प्रत्यक्ष वेदना तितकं दुःख देत नाहीत, जितकं वेदनांमुळे मनात येणारे विचार त्रास देतात, वेदनांना विचारांपासून तोडलं की चिंता व ठणक पळुन जाते.!
२) भुतकाळात घुटमळणे बंद करा – बसल्या बसल्या ना, आपल्या डोक्यात उगाच चक्र सुरु असते, “दहा वर्षांपुर्वी मी चांगला अभ्यास केला असता तर आज मीही खुप मोठ्ठा ऑफीसर राहीलो असतो.” किंवा “सात वर्षांपुर्वी मी प्लॉट घ्यायला हवा होता, तेव्हा मी ही सुवर्णसंधी सोडली.” आपल्याला कधीकधी वाटते “त्यावेळी मी त्यांच्याशी असे वागायला नको होते, खुप वाईट आहे मी.!” अजुन एक उदाहरण बघा “मी खुप कमी पगारावर काम करायला तयार झालो, मी असे नव्हते करायला पाहीजे.” काही काही जणांना उगीच आठवत राहते की “त्या कार्यक्रमाच्या दिवशी, ती मला अशीच म्हणाली.” अरे.! व्हायच्या त्या घटना घडुन गेल्या, टाईममशीनमध्ये जाऊन ते काही बदलता येणार नाही, तेव्हा आता त्यावर विचार करुन फक्त आणि फक्त, आपली बहुमुल्य उर्जा फालतुमध्ये खर्च होणार, त्यापेक्षा भुतकाळातल्या ह्या सर्व चांगल्या वाईट घटना विसरुन गेलेलं बरं.!
३) इथे प्रत्येक जण अद्वितीय आहे – बहुतांश दुःखांच मुळ हे तुलनेत असतं, उदाहरणार्थ, त्यांचं पॅकेज बारा लाखाचं आहे, मी कधी पोहचणार त्या ठिकाणी.? त्यांच्याकडे इनोव्हा आहे, आपल्याकडे खटारा गाडी.! ते मेट्रोसिटीत राहतात, किती ऐश करतात, नाहीतर आपण.? ती किती सुंदर दिसते. स्लीमट्रीम, माझं वजन थोडं जास्तच आहे. हिला सासुचा ‘जाच’ नाही, किती ‘सुखी’ आहे ही. तिचा नवरा तिचा प्रत्येक शब्द झेलतो, माहीतेय.! इत्यादी, इत्यादी, इत्यादी.! ह्या जगात प्रत्येक गोष्ट एकमेवाद्वितीय आहे, गुलाब दिसायला सुंदर असतो, पण म्हणुन मोगर्याचं महत्व कमी होत नाही, त्याचा विशेष सुगंध ही त्याची खास ओळख.! त्या दोघात डावं-उजवं अशी तुलना करता होईल का.? प्रत्येक फुल अद्वितीय आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक फळाचा स्वतःचा एक गोडवा आहे, एक चव आहे, आंबा रसाळ, चवदार म्हणून चिक्कु, अननस खराब म्हणावेत का.? संत्रा-मोसंबीने ईर्ष्या करावी का.? केळीने माझे नशीबच फुटकं म्हणुन रडत बसावे का.? सफरचंद-डाळींबाने आत्महत्या कराव्यात का.? कोणतं फळ चवदार आहे, कुणात औषधी गुणधर्म आहेत, कोणी पाणीदार आहेत, कोणी कोरडी.! ज्याचं त्याचं एक वैशिष्ट्य आहे, जसं फळांचं, तसंच, माणसांचं.! कोणी शार्प बिजनेसमन आहे, कोणी प्रचंड मेहनती आहे, कोणी कलाकार आहे, कोणी बोलुन मनं जिंकण्यात तरबेज, कोणी प्रेमळ आहे, कोणी शिस्तप्रिय, कोणी यशासाठी भुकेला आहे, कोणी प्रेमासाठी आतुर, कुणी प्रचंड स्वार्थी आणि चतुर, तर कुणी भलताच लबाड व लाचार.! आता यात डावं उजवं करुन, कशाला दुःखी व्हायचं.! तुम्हाला माहीतेय, ह्या जगात साडेसहा अब्ज लोक राहतात आणि प्रत्येकाच्या हाताचे ठसे वेगवेगळे आहेत, प्रत्येकाचा चेहरा एक दुसर्यापासून वेगळा आहे, म्हणुन ह्या जगातली प्रत्येक व्यक्ती एकमेवाद्वितीय आहे, अगदी तुम्ही सुध्दा.!
४) ‘आयुष्य कशासाठी’ याचं उत्तर शोधा – आयुष्य आपल्याला दिलेली अनमोल भेट आहे, आयुष्य सतत आनंदी राहण्यासाठी आहे, आयुष्य उत्साहाने भरभरुन जगण्यासाठी आहे, आयुष्य भव्यदिव्य स्वप्नं बघण्यासाठी आणि ती स्वप्ने पुर्ण करून मनमुरादपणे जगण्यासाठी आहे, आयुष्य आपल्या आणि इतरांच्या चेहर्यावर हसु फुलवण्यासाठी आहे, प्रामाणिकपणे प्रेम वाटण्यासाठी आहे.! जीवनाचा प्रत्येक क्षण निष्पापपणे बागडण्यासाठी आहे, मनातले सर्व अपराधी भाव, भुतकाळ-भविष्यकाळ, काल्पनिक जबाबदार्यांचे ओझे, सगळे सगळे फेकुन द्या. मोकळे व्हा, रिते व्हा, रिक्त व्हा. प्रत्येक क्षणाला, निरापराध वृत्तीने, निरागसपणे सामोरे जा.! आपल्या जीवनात आलेले कटू प्रसंग आयुष्याने प्रत्येकाच्याच जीवनात आणलेले असतात. फक्त तुम्ही उगाचच उहापोह करत बसता म्हणून जगाला ते कळतात. वारंवार कोळसा उगाळल्यासारखं तेचंते नकारात्मक उगाळणाऱ्यांना जगात कुणीही शहाणं समजत नाही. जीवन चलने का नाम, चलते रहो सुबह शाम.! जगाच्या दिनदर्शिकेवर २०२० सुरू आहे आणि आपण मात्र अजूनही १९७२ चा दुष्काळ आठवुन दुःखी कष्टी होऊन आजचा आनंद गमावणार असू तर आपल्यासारखे कपाळकरंटे आपणचं.! माणसाला तीन गोष्टी जास्त त्रास देतात, प्रत्येक दुःखाच्या मुळाशी ह्या तीन गोष्टी सापडतील, १) अपेक्षा२) अपुर्ण स्वप्ने३) ध्येयप्राप्ती नंतर येणारा रिक्तपणाबहूदा आपण ‘भला ऊसकी कमीज मेरे कमीजसे सफेद कैसी.?’ या विचारात असतो. तो कसा सुखी आहे, ती कशी मस्त जगते, त्याच आयुष्य आरामशीर आहे, माझ्याकडे हे का नाही, या अपेक्षेने, तुलनेने दुःखी होत तर नाही ना.? बघा! किती गंमतीशीर आहे हे, समजा, एखाद्याचे लग्न होत नाही, तेव्हा तो किती परेशान असतो, उठता-बसताना, जेवताना, झोपताना एकच ध्यास असतो, लग्न-लग्न-लग्न.! नकळत हाच विचार, चिंता बनुन, त्याच्या आत्म्याला डाचु लागतो, त्याच्या दुःखाचं कारण बनतं, मग हास्य गायब होतं, चित्त थार्यावर राहत नाही, चिडचिड वाढते. स्वप्नप्राप्तीकडे रोज वाटचाल करायची पण मनावर जखम न होवु देता!, ह्याला म्हणतात, सुखी जीवन! आणि समजा, एके दिवशी लग्न झालेच (तसे ते सगळ्यांचे होतच असते) मग अचानक आयुष्यातले थ्रील खतम.! पुन्हा सप्पक आयुष्य सुरु. जॉब लागु दे, जॉब लागु दे म्हणुन तळमळलो, आणि जॉब लागला, आता थोड्याच वर्षात त्या जॉबचा कंटाळा यायला लागतो, एक प्रकारचा रिक्तपणा येतो, आयुष्य कशासाठी.? जीवनाचा निर्भेळ आनंद घेण्यासाठी, मनाच्या आकाशात हे उत्तर जेव्हा गवसेल, तेव्हा नैराश्य, उदासीनता जवळपास फटकणार पण नाहीत!
५) सेवा करण्यार्याला आत्मिक समाधान मिळते – बघा, किती मजेशीर आहे हे.! अगरबत्ती स्वतः हवेत विरुन जाते, पण वातावरणात एक प्रसन्न सुगंध पसरवते. दिव्याची वात स्वतः नष्ट होते, पण तेजाने घर उजळुन टाकते. झाड तप्त सुर्याच्या उन्हाचा मारा सहन करतो, आणि वाटसरुला सावली देतो. ज्यात कसलंही पौष्टीक तत्व नाही असे गवत खाऊन गाय सकस, चविष्ट दुध देते. सुर्य जिथं भरपुर पाणी आहे, त्याची वाफ करतो, ढग बनवुन, जिथं पुरेसं पाणी नाही, अशा दुष्काळी प्रदेशात पाऊस पाडतो. आणि म्हणुनच की काय, ह्या सर्वांना मानवी संस्कृतीत पुजनीय मानलं गेलंयं. काहीतरी बनण्यासाठी, काहीतरी प्राप्त करण्यासाठी आपण सकाळ संध्याकाळ धावत असतो, पण खरे समाधान कुठे आहे.? इतरांसाठी निस्वार्थीपणे काहीतरी करण्यामध्ये एक वेगळे समाधान आहे. आपल्यात असलेल्या गुणांचा, शक्तीचा वापर आजुबाजुच्यांना, नातेवाईकांना, मित्रांना, अगदी अनोळखी लोकांना सुखी, आनंदी बनवण्यासाठी करणार्यांचं जीवन खरं सार्थ झालं, असं म्हणता येईल. निम्म्या गोवऱ्या मसनात गेल्या तरीही पैशासाठी चोरी, लबाडी, लाचारी करणाऱ्या हावरटांना कुत्रंही विचारत नाही. काही माणसे मरोस्तोवर मी अमक्याचा मेहुणा, तमक्याचा दाजी, फलाण्या अस्थापनेचा अधिकारी, बिस्ताण्या संघटनेचा अध्यक्ष अशी उसनी ओळख सांगत फिरताना दिसतात. ज्यांना आजीवन स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करता आली नाही त्यांनी किमान शेवटच्या घटिकेत तरी आत्मपरीक्षण करावे, सिंहावलोकन करावे, स्वार्थ सोडून इतरांसाठी व समाजासाठी जगण्यातला खरा निर्भेळ आनंद लुटावा.
उपरोक्त पाच सुत्रांचा मिळुन बनतो – लॉ ऑफ अट्रॅक्शन.! (संग्रहित) मनाच्या तळाशी जाऊन सुखाचा शोध घेऊ पाहणाऱ्या आणि प्रामाणिकपणा, इमानदारी, सत्यवचन, स्वाभिमान हाच खरा पुरुषार्थ आहे हे मानणाऱ्या सगळ्यांचे आयुष्य, सुखी, समाधानी आणि समृध्द होवो.कोशिश इतनी है की, हमसे कोई खफा ना हो, बाकी नजरअंदाज करने वालो से नजरें हम भी नहीं मिलाते..!!सबका मंगल हो.
इंजि. शिवाजीराजे सुनिता भिमराव पाटील
मास्टर कोच – जवाहरलाल नेहरु लिडरशिप इंन्स्टिट्युट,
नवी दिल्ली राष्ट्रीय अध्यक्ष – वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद