थंडीची चाहूल लागली की त्याची नाविन्यपूर्ण ओळखीतून उजळून येणारी सकाळ त्यातून भासणारा हर्ष मनाला कोठून तरी सुख,आनंद आणि जिव्हाळ्याची फुंकर घालतो.
असे भासते की ,पहाटेच्या साखर झोपेला आपण जसे मिठीतुन कधीच सोडू नये तिलाच बिलगून लाडिक तिच्या खुशीत घुसून झोपावे अन् रात्र कधी संपूच नये आणि तेवढ्यात कोणी तरी आपल्या खोलीचे दार वाजवावे आणि म्हणावे , चल उठ उठ पहाट झाली चल चालायला !”
बरेच दिवसांनंतर आज सकाळी चालायला जाणार होते. पहाटे 5 वाजता उठून जुजबी आवरून मॉर्निंग वॉक साठी तयार झाले आणि चालायला निघाले पुरते उजाडले तर नव्हतेच, त्यात ही थंडी मी-मी म्हणतच होती. थंडीशी प्रतिकार करत मी एका अर्धवट तुटलेल्या ओट्यावर दुसऱ्या मैत्रीणी येण्याची प्रतीक्षा करत होते. आजुबाजुला पाहिले तर मोजक्याच लोकांच्या अंगावर मफलरी अन कानटोप्या पडल्या होत्या. रोज तुडुंब चालाण्यासाठी वाहणारा रस्ता कोवळ्या उन्हाची वाट बघत पहुडला होता.
आत्ता बऱ्यापैकी वाटणारी थंडी जास्तच वाटू लागली. धुक्यात वाट काढत काढत जाताना निसर्गाच्या करामतींची मौज वाटू लागली काही अंतरात वातावरण बदलले होते. नभांगण आता हळूहळू केशरी शेला पांघरत गडद होत चालले होते. त्या केशरी रंगाने गात्रात हलकीशी ऊब तर आणली पण रानावनात मनसोक्त गच्च भरलेल्या थंडीने त्याला काही दाद लागू दिली नाही. सर्वत्र धुके पसरले होतेच, वाहत्या गारव्याने ते आता माळरानात उतरू पाहत होते. झाडांच्या पानापानातून वाट काढू पाहणाऱ्या कोवळ्या सूर्यकिरणांशी जणू काही त्याची शर्यंतच लागली असावी.
पहाटे पहाटे उठून, गार पाण्याने अजून थंडी वाजेल म्हणून तोंडही न धुता, कपाटातून खाली काढलेले स्वेटर चढवून, बगलेत हात धरून फिरायला निघालेले लोक डोळ्यासमोर असे तरळून गेले. हातमोजे वैगरे अश्या गोष्टी फारच ‘वाढीव’ म्हणून हात बगलेत घट्ट ठेवून चालत राहिले कि थोडीफार ऊब येईल म्हणून लोक भरभर चालू लागले. पहाटे गाड्यांच्या काचांवर जमलेले दव, त्यावर आपली कारीगरी करत अन तोंडातून वाफाळलेल्या चहासारखी वाफ काढायची स्पर्धाच जणू लागून जायची आमच्या सगळ्यांच्यात. आजही अजाणतेपणाने आलेल्या जांभईने आज मला स्पर्धक नसल्याने विजेताच केले असावे. आजही रोमारोमात थंडी भरली तर होतीच अन हातही निमूट बगलेत विसावले होते.
काही लोक सकाळच्या धुक्यात ध्यानस्थ बसल्यासारखे दिसायला लागले होते. आजूबाजूच्या शेततळ्यामध्ये तुरळकच सूर्याचे बिंब परावर्तित होऊन सगळा परीसर सोनेरी झाला होता. सर्व परिसर थंडीच्या कुशीत निवांतपणे विसावला होती. ना कुठं कसली धावपळ ना कसला माग.
आळसावलेल्या गावां-खेड्यांमध्ये आत्ताशी कुठं मंदिरे जागी झाली असेल का ? असा ही एक क्षणिक विचार मनात आला आणि आपले अस्तित्वच धुक्याच्या हवाली केले असेल का? नदीच्या पाण्याने त्या धुक्याच्या रंगात आपला रंग मिसळून बेमालूमपणे लपवला असेल का?. सूर्यप्रकाशाचा सोनेरी मुकुट घालून ढगांशी दोन हात करत डोंगर उभा असेल का? उंच उंच झाडी तर ढगात डोकं खुपसून बसले असेल का?.
पूर्वेला क्षितिजाकडे बघता आता पुरते उजाडले होते. रेंगाळलेल्या धुक्याची अजूनही मागे हटायची तयारी नव्हती. डोंगरांच्या कुशीत खोल वसलेल्या वस्त्या व गावे आता जागी होत असतील का!वाटेतील घरात असलेली लगीनघाई स्पिकरवरुन कळत होती पण तेवढाच काय तो कोलाहल. बाकी निरव शांतता.
सुवर्णमयी सकाळेने थंडीची चाहूल करून दिली. सूर्य आपल्या गतीनं वर येऊ लागला आणि आमचा घराकडं परतीचा प्रवास सुरू झाला.
रूचिरा बेटकर, नांदेड
9970774211