चला किल्ला बांधुया!

 

दिवाळीचा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्व या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात. हा सर्वात मोठा सण आहे. दसऱ्याच्या 20 दिवसांनंतर दिवाळी येते. हा सण संपूर्ण देशात आनंदानं आणि उत्साहानं साजरा केला जातो. या सणासाठी प्रत्येक भागात काही विशिष्ट परंपरा आहेत

 

महाराष्ट्रामध्ये दिवाळीत किल्ले बनवले जातात. घराच्या बाहेर दर्शनी स्थळी हा किल्ला बनववण्यासाठी जय्य्त अशी तयारी केली जात होती. पुर्वी आबालवृद्धांमध्ये किल्ला बनवण्यासाठी विशेष असा उत्साह संचारत होता.
पण, आता परिस्थिती बदलली आहे दिवाळी म्हटले की, डोळ्यांसमोर फक्त नवीन कपडे , सुटीची मौजमजा, आवडीचे पदार्थ खाणे; फटाके फोडणे, एखादे पर्यटन स्थळ गाठने, एवढेच निमित्त मात्र उरले आहे…या सर्वांत महत्त्वाच्या गोष्टीचा हळूहळू विसर पडत चालला आहे, तो म्हणजे दिवाळीत किल्ला बनवण्याचा ! सध्याच्या मुलांना दिवाळीत किल्ला कसा बनवायचा ? हे न शिकवल्यामुळे
‘ही कला लुप्त होणार कि काय ?’अशी भीती वाटू लागली आहे. दिवाळीत किल्ला बनवण्याची प्रथा केवळ महाराष्ट्रात आहे, याचा सार्थ अभिमान आपल्या सर्वांना असायला हवा. मुलांच्या हातात मोबाईल आल्यापासून त्यांना मातीत हात घालण्याची सवय राहिली नाही. त्यामुळे भविष्यात मुलांच्या मनातील या शूरवीरांच्या मातीशी नाळ तुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे यांचे कर्तृत्व, तसेच अफझलखान, शाहिस्तेखान यांसारख्या शत्रूंवर महाराजांनी मिळवलेला विजय हा इतिहास मुलांना समजावून त्यातूनच येणार्‍या नव्या पिढीमध्ये देशप्रेम अन् राष्ट्रप्रेम जागृत होण्यास मदत होईल.

किल्ला बनवण्याच्या कृतीमुळे मुलांमध्ये कौशल्य विकासासह इतरांना घेऊन एकत्रितपणे काम करणे, इतरांची मते जाणून घेणे यांसारख्या विविध गुणांचा विकास होण्यास ही मदत होईल. आपण आपल्या लहानपणी किंवा अनेकांनी किल्ला बनवण्यातील आनंद मनसोक्त घेतलेला आहे, मग आपल्या मुलांनाही तो आनंद घेण्यास उत्सुक करायला हवे. यातून त्यांना खर्‍या इतिहासाची आठवण होण्यासह त्यांच्यातील शौर्य,वीर असा रस जागा होण्यासाठी मदत होईल.

दिवाळीच्या निमित्ताने फटाके उडवून आर्थिक हानीसह, हवा आणि ध्वनी प्रदूषण करण्याऐवजी, मुलांकडून किल्ले बनवून घेतल्यास खर्‍या अर्थी फायदेशीर होईल. याचबरोबर
अनेक शहरांमध्ये उत्कृष्ट किल्ले बनवण्याच्या स्पर्धा घेतल्या जातात. त्यामध्ये आपल्या मुलांना आवर्जून भाग घेण्यासाठी प्रोत्साहित करा. त्या निमित्ताने मुलांमधील आनंद आणि कुतूहल निर्माण होईल. आतापर्यंत आपण आपल्या पाल्याला सर्व सोयीसुविधा देण्याचा प्रयत्न केला. आता त्यांना किल्ला बनवण्याच्या माध्यमातून जीवनातील एका वेगळ्या आनंदाची अनुभूती घ्यायला शिकवा; म्हणजे त्यांना पुढील जीवनात त्याचा फायदा होईल.
दिवाळीतील किल्ले बनवण्याची परंपरा ही आपल्या पूर्वजांनी आपल्याला गौरवशाली इतिहास मुलांनी अभ्यासावा याकरता निर्माण केलेली एक संधी आहे असं म्हणायला हरकत नाही.
किल्ला बनवण्याच्या प्रक्रियेमागे अनेक कथा आणि परंपरा आहेत, किल्ल्या बांधकामासाठी आवश्यक असलेली माती आणि पाण्याचे गुणोत्तर कळणे, मिश्रणात सुसंगतता आणने, इतर आवश्यक साधन- सामग्रीची जुळवाजुळव करणे, एवढेच नाही तर बारकाईने किल्लातील बारकावे शोधूने ते दुरुस्त करणे आणि सौंदर्यशास्त्राच्या भावना लक्षात घेणं आवश्यक आहे. या गोष्टी मुलांना घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.

 

इतिहासातील अनेक सुवर्ण क्षण, अनेक मोहिमी, आनंदाचे दुःखाचे क्षण, पराभव- विजय, पराक्रम, आक्रमण यांचे हे किल्ले साक्षीदार आहे. यांच्या इतिहासामुळे मुलांमध्ये सकारात्मकतेचं बीज रोवले जाईल.
सद्यस्थितीत जरी फ्लॅट सिस्टीमची संस्कृती असली तरी पालकांनी आपल्या मुलांसह घराच्या कोपऱ्यात किंवा गॅलरीत किल्ला बांधून हा सण साजरा करता येऊ शकतो का? ते पहावे.

 

रूचिरा शेषराव बेटकर, नांदेड
9970774211

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *