स्त्री – पुरुषाच्या नात्यातीलa अनोखं चित्रण – बियॉंड सेक्स

 

लेखिका – सोनल गोडबोले
प्रकाशक – चेतक बुक्स
समीक्षण – सुभाष पाचारणे
भ्रमणध्वनी – 9890199121
*पुस्तकासाठी संपर्क – 8605697161

मुळातच सेक्स हा विषय म्हटलं की माणसाची उत्सुकता ताणली जाते .. माणसाचं सारं आयुष्य तो सेक्सचा अर्थ शोधण्यात घालवतो …. पण सेक्सच्या पलीकडंही काही असू शकतं याचा तो विचार करत नाही .. त्या सेक्समध्येच तो घुटमळून जातो किंवा त्यातच तो समाधान पावतो.. पण याही पलिकडं ती विचार करते आणि बियॉंड सेक्स नावाचं एक हटके पुस्तक लिहिते.. सेक्सच्या पलिकडचं जग ती त्यात दाखवते आणि वाचकालाही विचार करायला लावते.. मुळात या विषयावर लिहावंसं वाटणं हेच तिचं मुळी धाडस होतं .. एक स्त्री असून या विषयावर एवढं सखोल पूर्ण लिहिणं हेच तिच्या धाडसाचं आणि तिच्या बुद्धिमतेचं कौतुक वाटतं .. तारुण्याला दुसरी इनिंगही असू शकते हा तिचा विचारच मुळी सुंदर वाटतो ..

 

स्त्री पुरुषाची मैत्री हा समज आपल्या, स्वतःला पुढारलेला म्हणवणाऱ्या समाजात अजूनही तितकासा रुजला नाही आणि त्यातही वैवाहिक स्त्री पुरुषाची मैत्री तर नाहीच नाही.. स्त्री पुरुषांची मैत्री निखळ असू शकते हे अजूनही आपल्या समाजाने स्वीकारलेलं नाही .. स्त्री पुरुषांची मैत्री म्हणजे अजूनही गावठी भाषेत सांगायचं झालं तर लफ़डंच समजलं जातं.. स्त्री पुरुषांची मैत्रीही पवित्र असू शकते .. निष्पाप असू शकते.. निष्कलंक असू शकते हे अजूनही समाजमान्य नाही .. अजूनही अशा स्त्री पुरुषांकडे समाज संशयी नजरेनं पाहतो .. पण स्त्री पुरुषाची मैत्री किती आदर्श असू शकते .. किंवा होऊ शकते हा एकच धागा पकडून लेखिका सोनल गोडबोले यांनी आपल्या बियॉंड सेक्स या कादंबरीत ती पावित्र्यता दाखवली आहे.. संसारातून बाहेर पडण्याचं स्त्रीचं एक वय असतं .. त्या वयानंतर तिनं स्वतःचं अस्तित्व जपायला हवं .. स्वतःच्या आवडीनिवडी जपायला हव्यात .. दुर्लक्षित केलेलं आयुष्य पुन्हा एकदा जगायला शिकायला हवं.. आणि हे आयुष्य तिच्या वाट्याला येतं चाळिशीनंतर .. या वयामध्ये तिच्या वरील जबाबदारी थोडी कमी झालेली असते .. मुलं मोठी झालेली असतात आणि नवऱ्याचंही लक्ष बऱ्यापैकी कमी झालेलं असतं .. आणि हीच तिच्या तारुण्याची दुसरी इनिंग असते .. पण ही इनिंग खेळताना आपल्या पति – पत्नीच्या नातेसंबंधावर कुठलाही प्रकारचा आच येऊ न देता मनसोक्त आयुष्य जगावं.. स्त्री पुरुषाचं नातं म्हणजे काही फक्त उपभोगण्यासाठी नाही तर एकमेकांचा आदर ..

 

एकमेकांच्या कलागुणांची तारीफ .. वा वा .. करणारं असं हे नातं असतं..
सोनल गोडबोल्यांची बियॉंड सेक्स हेच सांगते..
या कादंबरीत लेखिकेने फार काही मोठा बडेजाव दाखवला नाही .दोन मुलं आणि नवरा या आपल्या सुखी संसारात रमणारी मीरा एक सर्वसामान्य गृहिणी .. सुंदर सोज्वळ. सुसंस्कृत स्त्री पणाचे सर्व गुण असणारी एक आदर्श गृहिणी .. लेखिका .. कवयित्री असल्याने मनाने हळवी .. वयाची चाळीशी उलटून गेलेली .. आपल्या आजूबाजूला वावरणारी स्त्री .. आणि असाच आपल्या आजूबाजूला दिसणारा एखादा बिझनेसमन .. जवळ बऱ्यापैकी पैसा असल्याने थोडासा राजकारणी.. दिसायला हँडसम .. मजबूत देहयष्टी असलेला सागर .. या दोघांची प्रेमकहाणी म्हणजे बियॉंड सेक्स.
स्त्री – पुरुषांची मैत्री म्हटलं की समाजाला त्यांच्यात काहीतरी आहे असं वाटतं .. आणि या काहीतरी असण्यालाच लेखिका पुन्हा तारुण्यात जाण्याची किनार म्हणते .. जी आपला संसार अधिक फुलवण्यासाठी उपयोगी पडते .. संसारात गुरफटलेलं चाळिशीपर्यंतचं मन या काहीतरी असण्यानं बहरून जातं आणि मग मन आणि शरीर दोन्हीही पुन्हा नव्याने जगायला उभारी येते..
खरं तर प्रत्येकाच्या मनामध्ये दुसऱ्या एका जोडीदाराची इच्छा असते पण लहानपणापासून आपल्यावर झालेल्या संस्कारामुळे.. लाज ..शरम या गोष्टीमुळे आपण त्या गोष्टी बोलू शकत नाही पण लेखिकेने मात्र या सगळ्या गोष्टी बिनधास्तपणे इथं मांडल्या आहेत ..
समीर आणि मीरा एक चाळीशीचं जोडपं .. दोघांचाही प्रेमविवाह झालेला.. पण हळूहळू तोच तो पणा मीराला जाणवायला लागतो. तिला सेक्समध्ये प्रचंड इंटरेस्ट .. सेक्ससंबंधी जोक्स .. व्हिडीओज.. लिखाण .. मित्रांमध्ये होणाऱ्या चर्चा यात तिला खूप इंटरेस्ट.. पण समीरशिवाय इतर कुणाशी शारीरिक संबंध याचा ती कधी विचार करत नाही. समिरवर तिचं नितांत प्रेम .. पण तिच्या मनाची भूक मोठी होती.

 

.. आणि मग अशाच एका मीडियाच्या ग्रुपवरून तिची सागर नावाच्या एका तरुणाशी ओळख होते.. सागर पन्नाशीत असला तरी एखाद्या तरुणाला लाजवेल अशी त्याची देहयष्टी असते…. आणि तिथूनच त्यांच्या प्रेमाला सुरुवात होते .. मुळातच कवयित्री आणि लेखिका असणारी मीरा आणखीच हळवी होते ..
व्यायामाने कमावलेलं शरीर .. बिझनेसमॅन असल्याने भरपूर पैसा .. स्वतः कवी नसला तरी त्यात रस असणारा ( की मीरावर भुरळ घालण्यासाठी आहे असं दाखवणारा ) त्यामुळं मीरा आपोआपच त्याच्याकडं ओढली जाते.. पुढं पुढं तिचं सागरला भेटत जाणं ..आणि त्यांच्या ह्या स्वच्छंदी जगण्यातून पुढं पुढं सरकत जाणारी कथा म्हणजे बियॉंड सेक्स ..
एकमेकांच्या प्रेमात असलं तरी मीरा ही आपल्या कुटुंबावर नितांत प्रेम करणारी आहे.. एक आदर्श पत्नी म्हणून ती समीर साठी जे काही करते तितकंच एक आदर्श माता म्हणून आपल्या मुलांसाठीही करते. मीराच्या कुटुंबात जशी लेखिका डोकावते तशी सागरच्या कुटुंबात डोकावताना ती दिसत नाही. सागरच्या कुटुंबाचं ती जास्त वर्णन दाखवत नाही..
मीराचा नवरा म्हणून दाखवताना लेखिकेनं समीरवर जरा जास्तच विश्वास ठेवला आहे..मीराच्या कुठल्याच वागण्या बोलण्यावर तो संशय घेत नाही किंवा मीराच्या कुठल्याच गोष्टीचा त्याला राग येत नाही. कंपनीच्या कामानिमित्त परदेशी जाताना तो मीराला पूर्ण मोकळीक देतो.. मग मुलांना माहेरी ठेवून सागर आणि त्याच्या मित्रांसोबत गोव्याला जाणारी मीरा इथं खटकते .. स्त्री कितीही मॉड विचारांची अथवा बोल्ड असली तरी तीन चार पुरुषांबरोबर ती अशी एकटी ( शिवाय विवाहित ) बाहेर कुठं जावू शकत नाही तरीही लेखिकेनं तिला तीन पुरुषांबरोबर असं एकटं पाठवून कादंबरीत रंगत भरली आहे.
लेखिकेनं जसा समीरवर विश्वास दाखवला तसाच सागरच्या बायकोवर.. राधावरही तिनं विश्वास ठेवला आहे ..परदेशी गेलेल्या नवऱ्याला कोरोना झाला या धास्तीने कोलमडून पडलेल्या मीराला सागरने आपल्या घरी आणल्यावर सुरुवातीला रागावलेली राधा नंतर सागरच्या बोलण्यावर विश्वास ठेवते..कारण ती एक समंजस बायको असते .. समीरचं जेवढं मीरावर प्रेम असतं तेवढंच प्रेम आणि विश्वास राधाचाही आपल्या नवऱ्यावर.. सागरवर असतो आणि म्हणूनच ती या अशा कठीण प्रसंगात मीराला मायेची साथ देते .. निष्पाप .. निर्व्याज .. प्रेमाच्या नात्यात कुठेही पाय घसरू न देता संयम राखलेली मैत्री दाखवण्यात लेखिका यशस्वी झाली आहे… तर कधी कधी उत्कट प्रेमाची पराकोटीची भावना दाखवून तिने वाचकाला खिळवून ठेवलं आहे. पण वाचकांना खुश करण्याच्या नादात तिने कुठेही या मैत्रीच्या नात्याला कलंक लागेल असे प्रसंग रेखाटले नाहीत.. विवाहित स्त्री – पुरुषांच्या शारीरिक संबंधापेक्षा मानसिक संबंधांना तिने इथं मह्त्त्व दिलं आहे.
कादंबरी रंगवताना चारोळी आणि कवितांची केलेली पेरणी यामुळे कादंबरीला रंगत आली आहे आणि वाचक त्या चारोळी आणि कवितांच्या प्रवाहात मनसोक्त पोहण्याचा आनंद घेतो. कादंबरीच्या सुरुवातीलाच लेखिका म्हणते की, यातील काही घटना माझ्या आयुष्यातील असल्याने त्या तितक्याशा सहज नव्हत्या .. जितक्या कागदावर त्या सोप्या वाटतात..

कथेची नायिका म्हणून मीराला रंगवताना कदाचित त्यांनी स्वतःला उतरवलं असण्याची शक्यता वाटते .. कारण योगा .. व्यायाम.. लेखन.. कविता .. कादंबरी या स्वतःच्या आवडीच्या गोष्टी लेखिकेनं या नायिकेमध्ये दाखवल्या आहेत ..
कादंबरी वाचताना किंवा कादंबरीच्या नावात सेक्स आहे म्हणून वाचक कादंबरीच्या पानापानावर सेक्स शोधत जातो आणि कादंबरीच्या शेवटी त्याला ,
Beyond sex, there is always love
हे वास्तववादी सत्य पटून जातं हे या कादंबरीचं यश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *