तिसरी घंटा झाली की कितीही मोठा कलाकार असला तरीही त्याच्या पोटात कालवाकालव सुरु होते… रंगभुमीवर काम करायला फार कमी कलाकारांना मिळतं.. ज्याना मिळतं ते नक्कीच भाग्यवान .. काही कलाकारानी रंगभुमीवरच आपला प्राण सोडला.. काहीनी त्यांचं संपूर्ण आयुष्य पणाला लावलं .. माझ्यासारख्या काहीनी आपल्या संसाराला प्राधान्य दिलं..
खरं तर करीयर कशात करायचं याचा थांगपत्ता नाही.. योग्य मार्गदर्शन नाही आणि विशेष म्हणजे आपलं कुटुंब आणि घर यापेक्षा सुंदर काहीच नाही हीच कायम मानसिकता त्यामुळे अनेक कला अंगात असताना त्याकडे कला म्हणून पाहिलं , व्यवसाय म्हणुन नाही..
याचा पश्चाताप नक्कीच नाही कारण मला एकांकिका स्पर्धा ,राज्यनाट्य , नटसम्राट नाटकाचा विश्वविक्रम ,सिनेमा , सीरीय्ल्स करता आलं आणि अनेक कलाकारांसोबत काम करताना अनेक गोष्टी शिकता आल्या..
त्यातूनच सौंदर्य , फॅशन , लेखन , मॉडलींग , वक्तृत्व , देहबोली ,संवादफेक , भाषाशुध्दी ,यासारख्या अनेक गोष्टीचा अभ्यास झाला. . भारताबाहेर सचिन सोबत असताना अनेकदा थिएटर खुणावायचं पण एकावेळी सगळं मिळु शकत नाही याची जाणीव होती.. आपलं आयुष्य हे आधीच ठरलेलं असतं आणि ते आपल्याला हवं तसं सुंदर ठरलेलं असतं.. एका वेळी अनेक क्षेत्रात काम करताना अनेक लोकांकडुन अनेक गोष्टी वेचता आल्या त्यावेळी माझ्यातील माणूस घडला .. प्रत्येकाला देव कला देत नाही.. आमच्या घरात त्याने कलेची पेरणी केलेय..
अगदी राशींचा अभ्यास असेल किवा न्युट्रीशन डाएट याबाबतची माहीती असेल.. काउंसीलींग असेल किवा लैगिकतेवर काम करणं असेल , प्रेम असेल उत्तम मित्र परिवार असेल प्रत्येक ठिकाणी तिसरी घंटा वाजली की रंगभुमी वर घडलेले किस्से आठवतात.. एकदा एका एकांकिका स्पर्धेत आम्ही दुसऱ्या पानावरुन डायरेक्ट सहाव्या पानावर उडी मारली होती त्यावेळी जे काय धाबं दणाणलं होतं.. आता हसायला येतं पण स्टेजवर कलाकाराने किती सतर्क असायला हवं हे शिकण्याची ती वेळ होती.. कधी डायलॉग विसरले जातात तर कधी अजुन काही.. अतिशय सुंदर असा तो मिलाफ असतो.. प्रत्येक कला ही जगण्याची ताकद असते आणि कलाकार समाजाची ताकद असतो..
रंगप्रेमीना भरभरुन शुभेच्छा
सोनल गोडबोले
.