मोहनावतीची सावली डॉ दिलीप पुंडे
आज दि. 11/11/2023 रोजी सर्पदंश तज्ञ , मुखेड भूषण डॉ.दिलीप पुंडे यांचा 62 वा वाढदिवस आहे त्या निमित्ताने त्यांच्या जीवन कार्यावर टाकलेला हा शब्द प्रकाश….
दुरितांचे तिमीर जावो। विश्व स्वधर्म सूर्य पाहो ।।जो जो वांछील। तो ते लाहो प्राणी जात।। हा संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलीचा उदात्त मानवतावादी दृष्टिकोन ज्याने आपला जीवन धर्म मानला असे डॉ. दिलीप पुंडे साहेबांचा आज 62 वा वाढदिवस त्या निमित्ताने केलेला शब्दप्रपंच. ….
जीवनातील वास्तवता लक्षात घेऊन ध्येयवादी प्रवृत्तीने कार्य करणाऱ्या व येणाऱ्या अडचणींना हसत हसत तोंड देणारा खरा ज्ञानी असतो .हा सिद्धांत मला आवडतो.वास्तवस्वप्न,सृष्टी, व हास्यरस या तिन्ही गोष्टीचे एकत्र मिश्रण म्हणजे ज्ञान होय. हे जीवनाचे गणित आज मान्य आहे. जीवनात हे सुखाचे क्षण येतात ते सूर्याच्या कोवळ्या किरणासारखे सोनेरी व सतेज असतात, ते क्षणभर राहतात; आणि नंतर भडक होतात. पण ज्यावेळी हे किरण कोवळे दिसतात त्यावेळी त्यांचे तेज ते रम्य स्वरूप पाहून मला आनंद वाटतो, तसेच डॉ. दिलीप मुंडे साहेबांचे व्यक्तिमत्व आहे. जंगलाच्या वाटेने जात असताना उन्हाच्या वेळी एखादा झरा दिसला की त्याचे पाणी पिताना केवढा आनंद होतो; जीवनातील आनंदाचे क्षण हे असे असतात ,प्रतिकूल परिस्थितीमध्ये जन्म घेऊन डॉ. दिलीप पुंडे साहेबांनी आपल्या जीवनामध्ये अफाट जनसमुदाय जोडला ,दुष्ट ,दुर्जन, व्याधी संकटे,पीडित निरक्षर अडाणी या साऱ्या वाईट प्रवृत्तीचा एक ‘वीक पॉईंट’असतो; त्या अंगावर आल्या की घाबरायचं नाही, त्यांना निडरपणे तोंड द्यायचे ,मग त्या आपोआपच पळून जातात. घाबरले की शिरजोर होतात हे मौलिक चिंतन डॉ.दिलीप मुंडे साहेब नावाच्या यशस्वी व्यक्तीने करून दाखवले, अनेक मौलिक संस्काराचे पदर त्यांच्याकडे आहेत. साहित्याकडे ,सहकार्याकडे, कामगारांकडे, समाजाकडे बघण्याची सजग दृष्टी अशा अनेक गोष्टी त्यांच्या व्यक्तिमत्त्वात दडलेल्या आहेत, त्यांच्या मनात आपुलकीचा ममतेचा, आणि सहृदयतेचा सदभाव नेहमी पाझरत असतो .
पुंडे घराणे हे धार्मिक वारकरी घराणे आहे तो वारसा त्यांनी चालवलेला आहे. दिंड्यांचे स्वागत करणे, दिंड्यांना अल्पोपहार देणं हे ते नेहमी करतात. संतांची महती ते नेहमी त्यांच्या अभ्यासातून सांगतात, त्यांच्या कार्य विचाराचे हे संपादित धन अक्षर वाड;मयात शब्दबद्ध करून ते चिंतन करण्याची संधी मला लाभली हे माझे सदभाग्य समजतो, ते फक्त डॉ. नाहीत ,अध्यात्म ,आणि समाजकारणा बरोबर त्यांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला अभ्यासाची जोड दिली, समाजातील रंजल्या गांजल्यानं मदतीचा हात दिला. कर्तुत्ववान व्यक्तीचे त्यांनी त्यांच्या आई-वडिलांच्या स्मृतिदिनी भिमाई व्याख्यानमालेत कौतुक करत आहेत,त्यासाठी ते सदैव कार्यरत असतात ,सामान्य माणसाच्या समस्यांची उत्तम जाण असल्याने ते आपले पुरोगामी व प्रगतिशील विचार प्रभावीपणे मांडतात. त्यांनी जिल्ह्यात अनेक विधायक व परिवर्तनशील तसेच सकारात्मक उपक्रम यशस्वीपणे राबविले आहेत,त्यांचे उपक्रम जिल्ह्याला मार्गदर्शन करणारे ठरलेले आहेत. रक्त संकलन करणे, गरजूंना ते देणे, असे परोपकारी कार्य करतात.
या लेखाच्या माध्यमातून या कोहिनूर हिऱ्याचे दर्शन सामान्य रयतेला व वाचकाला करून देण्याचा एक उद्देश मी मनात बाळगला आहे .
त्यांच्या कार्यात त्यांचे कष्ट व चिकाटी आणि सृजनशीलता दिसते. त्यांचे सदैव जीवन तरुणाईला प्रेरणा देणारे व युवकांच्या जीवनात ज्ञानाची नवी पहाट निर्माण करणारे दीपस्तंभा प्रमाणे आहे, देशाच्या व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नैसर्गिक आपत्ती असेल; कोरोना सारखी महाभयंकर रोग असतील; किंवा भूकंप व भूस्खलन झालेली गावी असतील. त्या ठिकाणच्या पिडीत व्यक्तींना तातडीने मदत देण्याचे कार्य ते करत आहेत, दवाखान्यांमध्ये येणारा रूग्ण लहान असो मोठा असो सर्वांना ते सारखी वागणूक देतात, त्यांच्याकडे अजिबात भेदाभेद नाही *विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म । भेदाभेद भ्रम अमंगळ*।। या ओवीनुसार ते वागतात. सर्पदंश झालेले व्यक्ती कधी ही त्यांच्याकडे आल्यानंतर ते मृत्यू पावले नाहीत अशी उदाहरणे आहेत. मधुमेहासारख्या रोगावर नियंत्रण आणण्याचे काम त्यांनी केल्यामुळे त्यांना या भागातील जनता देव समजतात, वरील सर्व कार्याची दखल घेऊन अनेक सेवाभावी संस्थेने, प्रतिष्ठानने त्यांना कितीतरी मानाच्या उपाध्या, किताब देऊन त्यांचा यथोचित सत्कार करून सन्मानित केले आहे, म्हणूनच मला त्यांना *मोहनावतीची सावली* असे अत:करणातून म्हणावे वाटते, सध्याचे जग आधुनिकते कडे झेपलेले असल्याने नवनवीन कल्पना, नाविन्य विलास सप्तरंगी जीवनाचे आकर्षण अद्यावत सुख सोयीकडे मनुष्य महत्त्वकांक्षणे पाहू लागला आहे ,आज वर्ग संघर्ष ,मतभेद, राजकारण, ताण तणाव, जातीय धार्मिक तेढ या सर्वांना बाजूला सारून सदैव लोकांपर्यंत पोहोचण्याचा आपल्या कार्यातून त्यांनी वसा घेतला आहे, त्यांचे जीवन शांत, संयमी आणि सोज्वळ व्यक्तिमत्व समाजाला उपयुक्त व समाजाभिमुख वाखाण्याजोगेच आहे, शांत दिसणारा महासागर तप्त झालेल्या धरतीला शांत करण्यासाठी जसा उसळून येतो ;तसे डॉ. दिलीप पुंडे साहेबांचे व्यक्तिमत्व आहे, सामाजिक जाणीव व अन्यायाच्या परिमार्जनासाठी समाज रुपी किनाऱ्यावर रौद्ररूप घेऊन वास्तवाचे भान आल्यावर स्वप्नातील पक्षी भुरकन उडून जातो. स्वप्नाळूपणा कल्पनाविलास, वेडगळ समजूती, वाईट रुढी ,प्रथा परंपरा,अंधश्रद्धा यांना त्यांच्याकडे थारा नाही, वैज्ञानिक दृष्टिकोन, नीटनेटकेपणा, वक्तशीरपणा स्त्रीपुरुष समानता, सर्वधर्मसमभाव या मूल्यांवर ते जास्त भर देतात म्हणूनच आज ते जागतिक आरोग्य संघटनेचे सदस्य म्हणून नावारूपाला आलेले कर्तृत्ववान व्यक्तिमत्व आहे, त्यांच्या कार्याचा सुगंध सर्वत्र दरवळत आहे. माणसाने चारित्र्यसंपन्न होण्यासाठी स्वतःमधील स्वत्व मनोमन ओळखावे. आत्मविश्वास वाढवावा .गर्विष्ठ पणाचा त्याग करावा .दुराभिमान अजिबात बाळगू नये. आपले मन वाईट विचारानी मलीन ,भ्रष्ट होऊ देऊ नये ते नेहमी शुद्ध ठेवावे ,आत्मज्ञान वाढवावे. आत्मज्ञान हे सर्वोच्च ज्ञान आहे असे स्पष्टपणे ते वेगवेगळ्या शिबिरात, व्याख्यानात रोखठोकपणे बोलत असतात, त्यांच्या सुविध पत्नी सौ. मालाताई यांनी सुद्धा त्यांना चांगली साथ देत आहेत.चांगल्या कार्यासाठी घरातील अर्धांगिनीचे सहकार्य हे पुरुषाच्या यशासाठी फार मोठे प्रबलन असते, त्या सुसंस्कृत कुटुंबातून आल्या असल्या तरी डॉ. साहेबा बरोबर ग्रामीण भागात राहून शेकडो रुग्णांची सेवा नि:स्वार्थपणे करीत आहेत.त्यांची मुले आज डॉ. बनून *देणाऱ्याने देत जावे,घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे* या काव्यपंक्तीप्रमाणे वडिलांच्या वारसा पुढे चालवत आहेत.
अशा या महापुरुषाच्या कार्याचा सुगंध इलेक्ट्रॉनिक मीडिया पर्यंत पोहोचला. ए,बी,पी माझा, ई टी,व्ही .केअर डिस्कवरी यासारख्या वाहिनीने त्यांच्या मुलाखती घेऊन त्यांचे कार्य सर्व दूर पोहोचले ,विविध साहित्यिकांनी साप्ताहिक व वृत्तपत्रातून त्यांच्या कार्याचे लेखन केले. अशा नि:स्वार्थ सेवा करणाऱ्या व्यक्तीचा सन्मान समाजाने सतत केला पाहिजे ही माणसं जपली पाहिजे, एक वेळेस त्यांना हृदयविकाराचा झटका आला सगळे हवालदिल झाले त्यांना बरे होण्यासाठी समाजातील अनेक लोकांनी प्रार्थना, उपवास ,अभिषेक केले त्यांच्यासाठी अश्रु ढाळणारे डोळे व प्रार्थना करणारे असंख्य हात पाहायला मिळाले हेच खरे त्यांचे यश आहे ,यापुढील त्यांचे जीवन सुखाचे, समृद्धीचे ,भरभराटीचे व आरोग्य संपन्न जावो हीच वाढदिवसाच्या दिवशी त्यांना अभिष्टचिंतन करून येथे मी थांबतो.
शब्दांकन
*प्रा. विठ्ठल गणपत बरसमवाड*
संस्थापक: विठूमाऊली प्रतिष्ठान गोकुळवाडी ता. मुखेड