ध्येय प्राप्ती

 

सुरेश नावाचा मुलगा इ. ०८ वी वर्गात जिल्हा परिषद शाळा गुडसूर येथे शिक्षण घेत होता. त्याची आर्थिक परिस्थिती प्रतिकूल होती. आई व वडील दोघेही मजुरी करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. त्याच्या वर्गातील इतर काही विद्यार्थी चांगले कपडे, दप्तर ,पायात बुट घालून यायचे, त्यावेळी नरेशला पण वाटायचे, आपल्याला असे कपडे कधी मिळतील? वर्गातील सतीश, नरेश हे सुरेशचे मित्र होते.

सुरेश मेहनती व हुशार विद्यार्थी होता. पण तो नेहमी मागच्या बाकावर बसून राहायचा. कारण इतर विद्यार्थ्यांकडे पाहून त्याच्या मनात न्युनगंड निर्माण झाला होता. सुरुवातीला तो आपल्या आईवडिलांना दोष देऊ लागला. त्याच्या वर्तनात बदल झाला. तो अभ्यास सोडून इतर बाबींचा विचार करण्यात वेळ घालवू लागला . वर्गात शिक्षक शिकवताना लक्षपूर्वक ऐकणारा नरेश आता मात्र त्याचे लक्ष सारखे खिडकीतून बाहेर राहू लागले. हे सर्व त्याचे वर्गशिक्षक श्री नारायण महाराज सर यांच्या लक्षात आले. त्यांनी त्याला समजावून सांगितले ‌. शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले ‌ . त्यामुळे त्याच्यातील न्यूनगंड कमी झाला होता.

ऑक्टोबर महिना असल्यामुळे ०२ तारखेला महात्मा गांधी यांचा जन्मदिवस ‘आंतरराष्ट्रीय शांतता व अहिंसा दिन’ म्हणून आपण साजरा करणार आहोत आणि या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षक श्री गणेश बिरादार सर उपस्थित राहणार आहेत, असे वर्गशिक्षकांनी सांगितले. आपल्या विद्यालयातून काही विद्यार्थी मनोगत व्यक्त करणार आहेत. तेव्हा आपल्या वर्गातून चार विद्यार्थी आपण घेणार आहोत. तुम्ही चांगली तयारी करावी . जे विद्यार्थी चांगले भाषण करतील, त्या पहिल्या तीन विद्यार्थ्यांना बक्षीस राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री गणेश बिरादार सर यांच्या हस्ते दिले जाणार आहे.

दुसऱ्या दिवशी वर्गातून विद्यार्थ्यांनी चार नावे भाषणासाठी दिली. त्यात सुरेशचे नाव नव्हते. सरांना शंका होती की, सुरेशच्या सध्याच्या वर्तनामुळे तो भाषणासाठी नाव देणार नाही.०२ ऑक्टोबर हा दिवस उजाडला. विद्यालयात महात्मा गांधी यांची जयंती साजरी करण्याच्या कार्यक्रमाची तयारी झाली होती. प्रमुख पाहुणे वेळेवर आले आणि कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पहिल्या तीन विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले होते. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शन सुरु झाले.ते आपल्या मार्गदर्शनात म्हणाले, विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी यांचे ‘सत्य आणि अहिंसा’, हे तत्त्व जीवनभर अंगिकारुन आपले जीवन यशस्वी करावे. विद्यार्थ्यांनी आपल्याला भविष्यात काय बनायचे आहे? हे आजच ठरवून एक ध्येय डोळ्यासमोर ठेवून, ते प्राप्तीसाठी प्रयत्न करावेत, मेहनत घ्यावी. अशक्य या जगात काहीच नाही. आपण आपल्या प्रतिकुल परिस्थितीवर शिक्षणाच्या माध्यमातून मात करुन, जीवनात यशाच्या शिखरावर जावू शकतो.त्यासाठी मराठीचे प्रसिद्ध साहित्यिक प्र.ई. सोनकांबळे, इंदुमती जोंधळे यांनी आपल्या प्रतिकुल परिस्थितीवर मात करुन यश कसे प्राप्त केले? यासंबंधीची माहिती दिली. हे सर्व सुरेशने लक्षपूर्वक ऐकले आणि त्याने त्याचवेळी ठरवले, आपणही जीवनात ध्येय ठेवून, आजपासून चांगली मेहनत घेऊन अभ्यास करायचा.

सुरेशने त्याचे ध्येय वर्गशिक्षक श्री नारायण महाराज सरांना सांगितले, ” मी इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण करुन उद्योजक होणार आणि माझ्यासारख्या असंख्य तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणार.” सरांनी त्याच्या विचाराचे कौतुक करुन , त्याला शाबासकी दिली आणि सर्व मदत मी करतो असे आश्वासन दिले. तेव्हा पासून सुरेश नियमित अभ्यास करु लागला. इ. १० वी बोर्ड परीक्षेत तो विद्यालयातून प्रथम आला. सरांच्या मार्गदर्शनामुळे त्याने उदगीर येथील उदयगिरी महाविद्यालयात इ. ११ वी विज्ञान मध्ये प्रवेश घेतला. त्याने आपले ध्येय कायम ठेऊन ग्रंथालयात बसून नियमित अभ्यास करु लागला. इ. १२ वी बोर्ड परीक्षेत ही महाविद्यालयातून तो प्रथम आला.त्यानंतर आपले ध्येय पूर्ण करण्याच्या हेतूने इंजिनिअरिंग करण्यासाठी तो पुणे येथे गेला. तिथे त्याने खूप अभ्यास केला. प्रत्येक परीक्षेत पहिल्या तीन मध्ये आपले नाव आणले. त्याच्यातील जिद्द, मेहनत, परिश्रम, ध्यास पाहुन इंजिनिअरिंग महाविद्यालतील प्राध्यापक त्याला नेहमी मदत करायचे.

चार वर्षाचे इंजिनिअरिंग सुरेशने प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केल्यामुळे त्याचे कॅम्पस सलेक्शन होऊन एका नामांकित कंपनीत तो मॅनेजर म्हणून काम करु लागला. त्याचा प्रामाणिकपणा, जिद्द, मेहनत पाहून कंपनीच्या संचालक पदी त्याची निवड करण्यात आली. त्यादिवशी त्याला खूप आनंद झाला होता. त्याने जे ध्येय इ. ०८ वी वर्गात असताना ठरवले होते ते आज पूर्ण झाले होते.त्याने आपल्या यशाची पहिली बातमी आपले वर्गशिक्षक श्री नारायण महाराज सरांना फोन करुन सांगितली. त्यावेळी सरांनी सुरेशचे अभिनंदन करुन भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.

सध्या सुरेशने विविध राज्यात स्वतः च्या मालकीच्या पाच कंपन्या सुरु करुन जवळपास पाच हजार तरुणांना नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या आणि आपली ध्येय प्राप्ती केली होती. त्यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिले की, प्रतिकुल परिस्थिती आपली कमजोरी नसून त्याला आपली ताकद बनवली पाहिजे. आपण प्रतिकुल परिस्थितीवर शिक्षणाच्या माध्यमातून मात करुन जीवनात यशाच्या शिखरावर पोहचू शकतो व समाजासाठी आपल्या शिक्षणाचा फायदा देऊ शकतो, हा संदेश आपल्या वर्तनातून दिला होता.

बालाजी ज्ञानोबा मुस्कावाड,
एनसीसी प्रमुख तथा साहित्यिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *