माहूर ; तालुका प्रतिनिधी /
:- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी श्री रेणुकादेवीच्या दर्शनानिमित्त आज सोमवारी सकाळी ११:३० वा.२० नोव्हेंबर रोजी माहूरगडाला भेट देऊन श्री रेणुकादेवीचे दर्शन घेऊन महाआरती केली.यावेळी पूजेचे पौरोहित्य पूजारी रविंद्र काण्णव व शंतनू रिठे यांनी पार पाडले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेत सरसंघचालक मोहन भागवत यांचे सोमवारी सकाळी १० च्या दरम्यान माहूर येथे आगमनण झाले.संघपरिवाराच्या भेटीगाठी निमित्ताने त्यांचा सध्या दौरा सूरु असून,संघाच्या जिल्हा कार्यकर्त्यांशी संवाद बैठकीसाठी ते माहूर येथे आले होते.
आगमनानंतर प्रथम त्यांनी स्थानिक एकविरा धाम येथे चहा-पाणी घेतला.त्यानंतर त्यांनी मातृतीर्थ येथे जाऊन वंंदन करून गडावर जाऊन श्री रेणुका देवीचे दर्शन घेऊन महाआरती केली.
दर्शनानंतर श्री रेणुकादेवी मंदिर संस्थानच्या वतीने सरसंघचालक मोहन भागवत यांचा संस्थानचे पदसिध्द अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नागेश न्हावकर यांच्या हस्ते श्री रेणुका देवीची प्रतिमा व प्रसाद देऊन यथोचित सत्कार सन्मान करण्यात आला.यावेळी सचिव तथा सहाय्यक जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.,कोषाध्यक्ष तथा तहसीलदार किशोर यादव,विश्वस्त चंद्रकांत भोपी,संजय काण्णव,आशिष जोशी, दुर्गादास भोपी,अरविंद देव,बालाजी जगत,मुख्य पुजारी भवानीदास भोपी, शुभम भोपी यांची उपस्थिती होती.
दर्शनानंतर सरसंघचालक मोहन भागवत यांचे दुपारी साडेबारा च्या सुमारास भोजनादीसाठी माहूर येथील रास्वंसेसंघाचे तालुका संघचालक तथा श्री रेणुका देवीचे पुजारी अनिल काण्णव यांच्या निवासस्थानी आगमन झाले.तेथे भोजन घेतल्यानंतर त्यांनी थोडावेळ विश्रांती करून संघाचे जिल्हा कार्यकर्त्यांसोबत संघ परिवाराची संवाद बैठक घेतली.यावेळी किनवट जिल्हा कार्यकर्ते सतिष काण्णव सह २५ जिल्हा कार्यकर्ते उपस्थित होते.
बैठकीनंतर माहूर येथून परत जातांना सरसंघचालक भागवत यांनी दुपारी ४ वाजता स्थानिक वेदपाठशाळेला भेट दिली.
यावेळी वेदपाठशाळेचे विश्वस्त दिपक काण्णव, सचिव चंद्रकांत भोपी व सदस्य बालाजी जगत यांनी सरसंघचालक भागवत यांचा यथोचित सत्कार केला.यावेळी आशिषवादमंत्र केदार गुरुजी यांनी म्हटले.
सरसंघचालक भागवत हे वाशीम येथून नागपूर मार्गे माहूर येथे आले होते.माहूर येथून ते परत वाशीम कडे दुपारी साडेचार च्या सुमारास मार्गस्थ झाले.
सरसंघचालक यांच्या आजच्या दौऱ्या निमित्ताने त्यांच्यासोबत संघाचे विदर्भ प्रांताच्या पदाधीकाऱ्यांसह देवगिरी प्रांताचे मुख्य रामानंद काळे हे उपस्थित होते.तर माहूर तालुका कार्यवाह सौरभ भोपी, सहकार्यवाह हिमालय भोपी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.अशी माहिती पूजारी तथा तालुका संघचालक अनिल काण्णव यांनी तरुण भारत शी बोलताना दिली.
सरसंघचालक भागवत यांच्या माहूर भेटी निमित्ताने जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षकांच्या देखरेखीखाली पोलीस निरीक्षक डॉ. नितीन काशीकर यांच्या सह पाच पोलीस निरीक्षक यांनी शहरासह परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.