“ऋणानबंधाच्या पडल्या गाठी, भेटीत तृष्ठता मोठी”
अस म्हंटल जातं की पती पत्नीच्या आयुष्याच्या गाठी स्वर्गात पडल्या जातात; तर मैत्रीच्या गाठी या पहिल्या वर्गात. आपल्या खऱ्या आयुष्याची सुरुवात ही पहिल्या इयत्तेपासूनच होते. नंतर आपण खूप शिकतो. मोठे होतो, नोकरी, व्यवसाय करतो. पण बालपणीच्या मित्रांना कधीही विसरू शकत नाही. त्यांच्या सोबतच बालपण आपल्या नेहमी आठवणीत राहत. वय बदललं पण आपली आठवण मात्र बदलली नाही. अशाच आठवणीतून आज 22 वर्षानंतर पुन्हा एकदा आम्ही जि.प.कें.प्रा.शाळा शिराढोण व भीमाशंकर माध्य. व उच्च माध्य. विद्यालय शिराढोण येथील बालपणीचे मित्र एकत्र आलो. याची सुरुवात खर तर 2015-16 सालीच झाली. स्मार्ट फोन वापरने सुरू झाले होते. म्हणून व्हाट्सअप च्या माध्यमांतून ‘Classmates’ नावाचा ग्रुप उदयास आला. अन् हळूहळू त्यात एका एका बालमित्र-मैत्रिणींची संख्या वाढत गेली. क्लासमेट्स म्हंटले की डोळ्यासमोर येत ते अख्खं आपल शैक्षणिक आयुष्य. मौज, मस्ती, वर्गातली भांडणं, स्पर्धा, परीक्षा; अन् त्या ही पलीकडे आठवते, ते आपल्या मित्रांचं प्रेम. बालपणीच्या मैत्रीत एक निरागसता, निष्पाप सौंदर्य दडलेलं असत. तोच निरागसपणा आमच्या ग्रुप मध्ये देखील आहे. रोज रंगणाऱ्या गप्पा गोष्टीतून एक ‘स्नेह संमेलन’ घ्यावं असा एक सामूहिक विचार समोर आला. मुहूर्त निघाला 16.11.2023 चा. त्या वेळी विचाराला मूर्त रूप देण्याचं कार्य गोळेगाव येथील आमचे मित्र मंडळी यांनी केला.त्यात प्रामुख्याने बालाजी कपाळे, सुभाष कपाळे, दिलीप कपाळे, मोहन ढाले, पांडुरंग कपाळे, दत्ता कपाळे यांनी हा कार्यक्रम गोळेगाव येथील पवित्र अशा ‘तपोवन’ भूमीत करण्याचा आग्रह केला. त्यांच्या विनंती ला मान देऊन ग्रुप एडमिन लक्ष्मी पांडागळे व भगवान नागठाणे यांनी ग्रुप मधील सर्व सदस्यांच्या अनुमतीने हा कार्यक्रम गोळेगावला करण्याचे ठरविले. आज ग्रुप मध्ये जवळपास 48 सदस्य आहेत. यातील सर्व मित्र मैत्रिणी वेगवेगळ्या ठिकाणी राहत आहेत. सन 2001 साली ज्यांची 10 वी. झाली व सन 2023 ज्यांची बारावी झाली. व जे 1 ली पासून या बॅच चे मित्र मैत्रिणी राहिले आहेत. त्या सर्वांना ( ज्या ज्या व्यक्तीशी संपर्क झाला त्यांना) या स्नेह मिलनांचा भाग बनवला गेला. त्यापैकीच काही मित्रांनी कार्यक्रमाचे नियोजन करण्याचे ठरविले. त्यामध्ये धोंडीबा भुरे, ईश्वर देवणे, सुदर्शन कपाळे, मुक्ताराम देवणे, साईनाथ येरावार, श्याम चौडम, भगवान नागठाणे, शरद देवणे, नागोराव चिलखे, सुदर्शन देवणे, मन्मथ बामणे, शिवसांब पांडागळे अन् वर्गातील बरीचशी मंडळी दोन दिवस अगोदरच पासूनच तपोवन भूमीत जाऊन नियोजन करत होते. कार्यक्रमाची सुरुवात तपोवनातील ऋषींची पूजा करून झाली. त्यानंतर राष्ट्रगीत गाईले गेले. वर्गात कधीही न बोलणारा व्यक्ती सुद्धा समोर हातात माईक घेऊन आपल सुख-दुःख व्यक्त करत होता. आपले 20-22 वर्षातील अनुभव सांगत होता. नकळत मध्येच हसू येत होतं तर नकळत डोळ्यात कधी पाणी येत होतं. 20-22 वर्षात पडलेला खंड क्षणात पुसल्या गेला. आज ग्रुप मधील बरेच जण खूप छान पदावर कार्यरत आहेत. काही जण उत्तम व प्रगतिशील शेतकरी झाले आहेत. तर कुणी आपला छोटा मोठा व्यवसाय पाहत आहेत. मुलींपैकी बऱ्याच जनी उत्तम व सकुशल गृहिणी बनल्या आहेत तर काही जणी आपला स्वतःचा व्यवसाय सांभाळत आहेत. कुणी लग्नानंतर शिकून आज नोकरीला लागल्या आहेत. संपूर्ण दिवसभर सर्व मित्रांमध्ये एक नवचैतन्याची लाट मनात संचारली होती. सगळे जण भूतकाळातील आठवनीत रममान झाले होते. दिवस मावळतीला निघून गेलेला; तरी कुणाचे पाय त्या तपोवनातून निघत नव्हते. सगळ्यांचा मनोगतातून एक गोष्ट समोर आली; ती म्हणजे ग्रुप पुरती मैत्री सीमित न राहता ती समाजासाठी एक आदर्श कसा निर्माण करू शकेल. अन् भविष्यात ग्रुपच्या माध्यमातून एखादा सामाजिक उपक्रम ही राबविण्याची तयारी त्यावेळी मित्रांनी आपल्या मनोगतातून दर्शवली. इयत्ता 1 ते इयत्ता 12 वी पर्यंत जपलेल्या आठवणी त्यात सर्व शिक्षक, प्राध्यापक यांच्या आठवणी अन् ते ही नावांसहित सांगितल्या गेल्या. ग्रूप ला बनून 7 वर्ष झाले म्हणून संपूर्ण Clasmate ग्रुप चा वाढदिवस ही ग्रुप चे अॅडमिन लक्ष्मी पांडागळे व भगवान नागठाणे यांच्या हस्ते झाला. म्हणून क्लासमेट समूहाच्या नावाने केक कापला गेला आणि समूहातील मैत्रीण शिवकला सोनटक्के चा वाढदिवस ही स्नेह संमेलनात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जेवणाची उत्तम व्यवस्था ही करण्यात आली होती. दिवाळी लगेचच हा स्नेह संमेलनाचा कार्यक्रम झालेला असल्यामुळे प्रत्येक मैत्रिणींना एक सुंदर साडी भेट म्हणून देण्यात आली. हा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम मित्र-मैत्रिणींनी स्वयंस्फूर्तीने घेतला होता. यासारख्या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमांमधून माजी विद्यार्थी एकत्र येतात आणि त्यातून एक सामाजिक उपक्रम घडू शकतो. म्हणून शाळांनी स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमासाठी माजी विद्यार्थ्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे. त्यातून माजी विद्यार्थी एकत्र येऊन समाज उपयोगी विधायक कार्य करू शकतात. अशी भावना सर्वांमध्ये दिसून आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मी पांडागळे यांनी केले. प्रास्ताविक प्रा.धोंडीबा भुरे यांनी केले तर आभार प्रदर्शन ईश्वर देवणे यांनी केले. 20 ते 22 वर्षातील मनात साठवलेल्या आठवणींची शिदोरी मनात घेऊन प्रत्येकाची पाऊले पुन्हा आपापल्या घरट्याकडे फिरली. पुन्हा असच दरवर्षी एकत्र येण्याचं स्वप्न उराशी घेऊन. अन् 16 नोव्हेंबर 2023 ही तारीख प्रत्येकाच्या जीवणाचा एक अविभाज्य अंग बनली .
शब्दांकन – लक्ष्मी पांडागळे ( नांदेडे)