प्रतिनिधी, कंधार
तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर शासनाकडून विविध योजनेंतर्गत अनुदान जमा करण्यात येत आहे. मात्र बँका शेतकऱ्यांच्या खात्यास प्रतिबंध (होल्ड) करुन अडवणूक करत आहेत. अशा बँकांवर कारवाई करुन शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अन्यथा बँकांना टाळे ठोकण्यात येईल, असा इशारा शिवसेनेचे तालुकाप्रमुख परमेश्वर जाधव यांनी कंधार तहसीलदारांना निवेदनाद्वारे दिला आहे.
दिलेल्या निवेदनात असे नमूद केले की, तालुक्यात शेतकऱ्यांच्या खात्यांवर शासनाकडून विविध योजनेंतर्गत अनुदान जमा होत आहेत. मात्र बँका शेतकऱ्यांच्या खात्यास प्रतिबंध (होल्ड) करून आडवणूक करत आहेत. शासनस्तरावरून नैसर्गिक आपत्तींमध्ये पशुपालकास सानुग्रह अनुदान, पिक विमा नुकसान रक्कम, किसान सन्मान अनुदान, पूरहानी मदत, घर पडझड मालकास मदत आदींसह विविध योजनेंतर्गत शासनाकडून मिळणारी मदत न देता शेतकऱ्यांची अडवणूक करून आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे उल्लंघन करत आहेत. तसेच सिबिल बरोबर नाही म्हणून शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करत नाहीत.
या निवेदनावर शिवसेना तालुकाप्रमुख परमेश्वर जाधव, विधानसभा संघटक गणेश कुटेवार, शहरप्रमुख अतुल पापीनवार, तालुका संघटक पंडित देवकांबळे, किसान सेनाप्रमुख शिवाजी पाटील, युवासेनेचे शहरप्रमुख अल्लूभाई शेख, सचिन पेठकर, जी.एम. पवळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
या निवेदनाच्या प्रति माजी मुख्यमंत्री, तथा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, शिवसेनेचे राज्य संघटक एकनाथ पवार, कृषी मंत्री धनंजय मुंडे, पालकमंत्री गिरीश महाजन, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हाप्रमुख माधव पावडे आदींना पाठविण्यात आल्या आहेत.