समाजामध्ये नागरिक म्हणून वावरताना माणसांमाणसामध्ये सुसंबद्ध राहण्यासाठी व सामाजिक संस्थांना पायाभूत ठरणारी जी तत्वे असतात त्यांना नीतिमूल्य असे म्हणतात. नीती म्हणजे सदाचार होय. सदाचाराचे पालन सर्वांनी करावे व नीतीला धरून वर्तन करावे. नीतिमूल्ये नेहमी आचरणामध्ये आणावीत,
नीती मूल्यांचा विचार करताना स्वावलंबन, राष्ट्रप्रेम, कर्तव्यदक्षता, निर्भयता ,सहकार्य ,बंधुता, खिलाडू वृत्ती ,राष्ट्रीय एकात्मता, आदरभाव ही अतिशय महत्त्वाची सामाजिक मूल्ये आहेत ही मूल्ये पाळल्यास उद्याचा भावी नागरिक सक्षम बनू शकतो, नराचा नारायण होण्याची किमया फक्त शिक्षणात आणि संस्कारामध्येच आहे
आजच्या बदलत्या परिस्थितीमध्ये मानवामध्ये एकतचे मूल्य नष्ट होत चालले आहे; मनुष्य हा पशु सारखा वागत आहे , त्याच्यात असणारी माणुसकी, राष्ट्रीय एकात्मता, मानवता ,जागृत करण्याची आज नितांत गरज आहे. म्हणून मानवाची कल्याण साधणारी, एकात्मतेचा मंत्र देणारी, विद्यार्थ्यांच्या मनामध्ये ठासून भरणारी, नैतिकता तयार करणे आज आवश्यक आहे, जर आपण नैतिकता जोपासली नाही तर येणारा काळ भयंकर ठरेल, त्यासाठीच हा लेखन प्रपंच……
तुमच्या देशातील तरुणांच्या ओठावरची गाणी सांगा.
मी देशाचे भविष्य सांगतो, यातील वास्तव्यतेचा विचार केल्यास माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांना कोणते गीते पाठ आहेत. याचा विचार करणे अतिशय गरजेचे आहे. विद्यालयात दररोज परिपाठ घेतला जातो त्या परिपाठात वेगवेगळी गीते, बोधकथा, दिनविशेष सांगून बुद्धीमध्ये वाढ केली जाते
,*पूर्व दिव्य ज्यांचे । त्यांना रम्य भावी काळ*
असे म्हटले जाते. एखाद्या महान व्यक्तीचा स्फूर्तीदायी, प्रेरणादायी इतिहास सांगून मुलांना तसे होण्याची प्रेरणा दिली जाते. भारतीय संस्कृतीने ज्ञानावर व प्रेमावर भर दिला. बळ नसेल तर ज्ञान व प्रेम ही मनातल्या मनात मरून जातील. बलवान शरीर निर्मळ व सतेज बुद्धी अतिशय आवश्यक आहे. त्यासाठी जीवनात समतोलपणा गरजेचा आहे.
आदर्श नागरिक बनविण्यासाठी देशभक्ती. देशसेवा समाजसेवा. संस्कार. नैतिक मूल्यांची गरज आहे, *स्वार्था विना सेवा जिथे। तिथे तुझे पद पावना।।* या ओळीतून मनाची जडणघडण कशी होते हे सांगता येते. शिक्षणाने ज्ञानाचा विकास होतो तर शारीरिक शिक्षणातून शरीराचा विकास आणि पाठांतरातून हृदयाचा व मनाचा विकास होतो. म्हणून *हे हृदयाचे ते हृदयी घातले* इतक्या सहजपणे भावनांचे बीजारोपण व सद्गुणांची पेरणी होते. म्हणून आपल्याला नैतिक शिक्षणाची आज अत्यंत गरज आहे.
आज छोटे छोटे मुलं हिंसक बनत आहेत. व्यसनाधीन झालेले आहेत. मोबाईलची त्यांना सवय लागलेली आहे ,मोबाईल नाही घेऊन दिले तर त्याचे विपरीत परिणाम होत आहेत, म्हणून नैतिक शिक्षण देणे आज खरोखरच अत्यंत आवश्यक आहे. शिक्षण हे समाज परिवर्तनासाठी आवश्यक आहे. समाजाची संस्कृती सामाजिक, आर्थिक ,नैतिक उन्नती झाली पाहिजे असे जर आपणाला वाटत असेल तर शाळांमधून नैतिक शिक्षण द्यावे लागते. भविष्यातील भारत आजच्या शालेय वर्गातून घडत असतो. विद्यार्थ्यांना कोणते शिक्षण द्यावे याचा अभ्यासक्रम ठरवला जावा .
समाजाला नैतिक अधिष्ठान हवे असेल तर समाज हा प्रगत झाला पाहिजे. समाज निरक्षर असून चालत नाही दुबळा असून चालत नाही ,त्यासाठी शालेय जीवनात नैतिक संस्कार होणे ही काळाची गरज आहे. दररोजच्या शालेय जीवनात परिपाठातून दहा गाभाभूत मूल्ये विद्यार्थ्यांना समजावून द्यावे लागतात .श्रमप्रतिष्ठा राष्ट्रीय एकात्मता .राष्ट्रप्रेम,स्त्री पुरुष समानता ,वैज्ञानिक दृष्टिकोन, भूतदया ही मूल्ये रुजवावी लागतात सर्वधर्मसमभाव, सर्वधर्मसहिष्णुता, धर्म निरपेक्षता ही मुलांना परिपाठातून सांगता येते तसेच वेगवेगळ्या धर्माची माहिती सांगून आपण सर्वजण कसे एक आहोत हे सांगता येते. परिपाठामध्ये सर्वच मूल्यांना अतिशय महत्त्व आहे .
आजचा शाळेचा विद्यार्थी उद्याचा देशाचा नागरिक आहे. त्यासाठी त्याला सर्व गोष्टी सांगाव्या लागतात. शाळेचा परिसर, प्रवेशद्वार स्वच्छ ठेवावे लागते, काळ बदलला तसं मानवाने बदलावे ,आज तरुण वर्ग गुन्हेगारी क्षेत्राकडे वळत आहे. त्यामुळे रिमांड होम मध्ये मुलांना ठेवण्याची वेळ येत आहे, जर विद्यार्थी लहानपणीच क्रूर बनला तर पुढील काळात तो दहशतवादाकडे वळतो आणि दहशत निर्माण करून दरोडेखोर होतो जर त्याला बालपणीच चांगले संस्कार नाही मिळाले तर तारुण्यात तो वाममार्गाला लागतो, म्हणून नेहमी आपले मन निर्मळ व स्वच्छ असावे,
मित्राबद्दल द्वेष असू नये *मन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धीचे कारण*
असे म्हटले जाते ,
आपलं मन जोपर्यंत निर्मळ आहे, तोपर्यंत कोणत्याच गोष्टीचा परिणाम आपल्यावर होत नाही, त्यासाठी मनाची एकाग्रता चिंतन अतिशय महत्त्वाचे आहे .आज आपण पाहतो. सामाजिक जीवन अतिशय धकाधकीचे झालेले आहे;
प्रत्येक ठिकाणी आपण घाई करत आहोत, शाळांमधून राष्ट्रगीत ,प्रार्थना, प्रतिज्ञा भारताचे संविधान, महाराष्ट्र राज्य गीत घेऊन विद्यार्थ्यांना शिक्षण विषयक घडामोडी सांगाव्या लागतात, त्यावेळेस विद्यार्थी नैतिक मार्गाने जातो काही विद्यार्थी वाममार्गाने ,कुमार्गाने जातात आणि स्वतः ते वाममार्गाला लागतात, काळ बदलतो, काळानुसार नाही वागले तर काळ आपल्याला जीवन जगू देत नाही. पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला पोहोल्या नंतर माणूस वाहूनच जातो तो निसर्गाचा नियम आहे. म्हणून शिक्षण शिका असे अनेक समाजसुधारकांनी सांगितलेले आहे, कारण त्यामधून नैतिकता शिकवली जाते ;आई ,वडील गुरु हे देवा समान असतात, शहाणपणा वयावर व पांढऱ्या केसावर अवलंबून नसतो ,ज्याची बुद्धी परिपक्व तोच खरा शहाणा असतो. ज्यांना संधी मिळते तो नशीबवान असतो. आणि जो स्वतः संधी निर्माण करतो तो बुद्धिमान असतो असे म्हणतात. सिद्धी प्राप्त होते ज्ञानाने, ज्ञान मिळते सरावाने त्यासाठी हवेत शिक्षण आणि पुस्तके त्यामुळेच बुद्धी परिपक्व होते. व्यक्ती समाजात जितक्या उंचीवर पोहोचतो ,त्या व्यक्तीच्या असलेल्या कर्तृत्वामुळेच नव्हे तर त्या व्यक्ती सोबत असलेल्या लोकांचा सुद्धा त्यात महत्त्वाचा वाटा असतो .आपण मोठे म्हणण्यापेक्षा आपल्याला मोठे करणारे आपले माणसे मोठी असतात. माणसाला सुंदर दिसण्यासाठी सुंदर असणं महत्त्वाचं नसतं तर त्याचे विचार नेहमी महत्त्वाचे ठरतात. चांगले विचार आणि चांगली व्यक्ती जर सोबत असतील तर जगात तुमचा पराभव कधीही होत नाही. जो व्यक्ती स्वतःमध्ये सुधारणा करत असतो. जिद्द चिकाटी ठेवत असतो त्यांना इतरांचे वाईट करण्यासाठी वेळ मिळत नसतो.
दुसऱ्यांच्या दारात सुखाचे झाड लावले की आनंदाची फुले आपल्या दारात आपोआप पडतात म्हणून शिक्षणात नेहमी नैतिकता असावी नैतिकतेने माणूस विचारवंत होतो, उद्धटपणाने वागणाऱ्यांनी दुसऱ्याकडून नम्रपणाची अपेक्षा कधी करू नये. समाजामध्ये सदाचार वाढला की दुराचार घाबरतो. तलवार ही शूरांची निशाणी नाही तर ती भीतीची निशाणी आहे. ज्याला हात पाय आहेत आणि अक्कल हुशारी आहे अशा माणसावर या देशात कधीच उपाशी मरण्याची पाळी येणार नाही ,ज्या पायरीवरून आपण चढतो त्या पायरीला लाथाडणे यात शहाणपण नाही, व्यसन लहान आहे म्हणून त्याची गय करू नका ,लहान ठिणगी ही आगीचा डोम उठवते म्हणून छोट्या छोट्या चुका करू नका.
एके दिवशी त्याच मोठ्या होऊन बसतात. जोपर्यंत आपल्याकडे खिसा भरलेला आहे तोपर्यंत मित्रांची कमतरता नाही. म्हणून सावध राहा .अज्ञान हा सर्व अधोगतीचा पाया आहे .त्यासाठी समाजामध्ये प्रगती होण्यासाठी जागृत विचारमंच असावेत ,लहानपणी केलेले संस्कार आजीवन उपयोगी ठरतात. आज प्रत्येक घरात मुलं ऐकत नाहीत. मुलं आमच्यापासून दूर राहतात. मुलांचे आमचे विचार जुळत नाही असे सूर आई-वडिलांकडून ऐकायला मिळतात.
मुलं हट्टी झाली की आई -वडील हातबल होतात. त्यामुळे दुरावा वाढत जातो, विद्यार्थी हा शाळेचा अलंकार आहे. त्याला सांभाळा ,मोठे करा, पाठीवर काठी बसल्याशिवाय छातीवर बिल्ले झळकत नाहीत ,त्यासाठी श्रम करावे लागतात ,ध्येयाचा ध्यास लागला म्हणजे कोणत्याही कामाचा त्रास वाटत नाही. काही ठिकाणी शक्ती चालली नाही तर युक्तीने चालावे लागते, म्हणून नैतिकता ही अत्यंत गरजेची आहे.
म्हणून विचार हा तलवारीपेक्षा बलवान आहे. मानवाला पारतंत्र्यात कधीही सुख मिळत नाही. म्हणून शिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन आहे कधीही आपले मस्तक हे गुंणवतापुढे झुकवावे ,धनापुढे झुकवू नये ,फुलांचा सुगंध हवेच्या दिशेने पसरतो मात्र व्यक्तीच्या चांगुलपणा प्रत्येक दिशेला पसरतो असे म्हणतात. म्हणून नैतिकतेने चला, परोपकार करा, चांगले विचार मनात बाळगा, शेजाऱ्यावर प्रेम करा, प्राणी मात्रांना दया दाखवा, गुन्हेगाराला त्याची जागा दाखवा, पुन्हा पुन्हा चूक करणे हा सुद्धा मोठा गुन्हा आहे, जिथे आपली किंमत होते तिथेच जा, स्वप्नात जीवन जगू नका, वास्तविकतेचे भान ठेवा.
आजची स्थिती पाहिली तर दिवसाढवळ्या बँकेवर दरोडे पडत आहेत. समाजामध्ये चोरी, लबाडी, भ्रष्टाचार ही नित्याची बाब आहे. महिलांवर अत्याचार केले जातात. व्याभिचार, छळवणूक, हत्या यांनी वर्तमानपत्राचे बहुतांश भाग भरलेले असतात सार्वजनिक क्षेत्रात भ्रष्टाचार फार बोकाळलेला आहे. नीतिमत्तेचा गंध कुठेही पाहण्यास मिळत नाही. आजचे तरुण-तरुणी व्यसनाकडे वळत आहेत. त्यामधूनच ते गुंड प्रवृत्ती कडे वळतात, त्यामुळे त्यांचे मन उदास होऊन वैफल्यग्रस्त जीवन जगत आहेत म्हणून शेवटी असे म्हणावेसे वाटते *शोधात कस्तुरीच्या आहेत पारधी हे। हरणे जपून ठेवा अंधार फार झाला।।*
शब्दांकन
*प्रा.बरसमवाड विठ्ठल गणपत*
अध्यक्ष विठूमाऊली प्रतिष्ठान खैरकावाडी ता.मखेड जि. नांदेड