उमरी ; विश्वाच्या नकाशात युध्दजन्य परिस्थिती निर्माण झाली असताना अशांत आणि अस्वस्थ मानवतेला सुखाची शांती देण्यासाठी संवादच आवश्यक आहे. जनसंवाद, मनसंवाद, धर्माधर्माचा, जातीजातीचा संवाद, देशादेशाचा संवाद आज आवश्यक आहे. संवाद अर्थपूर्ण हवा. विश्व कल्याणासाठी लोकसंवाद हा आधुनिक मंत्र आहे.
युगानुयुगे शेतकरी कर्जात मरतो असे का। या प्रश्नाच्या उत्तरात राजकारण संस्कृती आणि समाज पराभूत आहेत. लाखो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, भूकेने व्याकूळ होऊन एखादा मंत्री आत्महत्या केल्याचे ऐकीवात नाही. मंत्र्यांनी आत्महत्या करु नये पण शेतकऱ्यांचे दुःख जाणावे असे विचार सुप्रसिध्द वक्ते प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस यांनी 18 व्या राज्यस्तरीय लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.
उमरी येथील गिरीष देशमुख गोरठेकर इंग्लिश स्कूल व विद्या भारती ज्यू, कॉ. येथे 18 वे राज्यस्तरीय लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलन पार पडले. या प्रसंगी प्रसिध्द अनुवादक प्रा. डॉ. पृथ्वीराज तौर अध्यक्षपदी उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून आ. विक्रम काळे, शिरीष गोरठेकर, दिलीपराव धर्माधिकारी, मारोतराव कवळे गुरूजी, जि.प. सदस्या पूनमताई पवार, गोविंदराव सिंधीकर, प्रकाशदादा मिलवंडे, देविदास फुलारी, विश्वनाथ पाः बन्नाळीकर, पांडुरंग देशमुख आदी हजर होते. प्रारंभी उमरी नगरपरिषदेपासून ग्रंथ दिंडी व शोभा यात्रेची सुरूवात स्वागताध्यक्ष डॉ. विक्रम
देशमुख तळेगावकर, संयोजक दिगंबर कदम यांच्या हस्ते करण्यात आली. भजनी, लेझीम, वारकरी, गोंधळी, विविध देखाव्यावर ही शोभा यात्रा प्रेक्षकांची मने वेधून घेत होती. ठिकठिकाणी स्वयस्फूर्तीने दिडींचे स्वागत करण्यात आले.
संमेलनस्थळी संतोष तळेगावे यांच्या तैलचित्र व दुर्मिळ नाणे संग्रहाचे उद्घाटन आ. विक्रम काळे व श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते करण्यात आले.
यानंतर दिपप्रज्वलन व स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केल्यानंतर मान्यवरांचे स्वागताध्यक्ष डॉ. विक्रम देशमुख यांनी स्वागत केले व स्वागताध्यक्षीय भाषण केले तर संयोजक श्री दिगंबर कदम यांनी संमेलनाची भूमिका विशद केली. प्रमुख पाहुणे मा. विक्रम काळे म्हणाले – लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलन गेल्या सतरा वर्षापासून निष्ठेने साहित्य व साहित्यिकाची सेवा करत आहे. ग्रामीण भागात राहणारी साहित्यिक मंडळी छान लिहित आहेत. त्यांच्या लेखणीला धार यावी यासाठी अशा संमेलनाची नितांत गरज आहे असे संबोधून शुभेच्छा दिल्या.
पूनमताई पवार यांनी हे साहित्य संमेलन नवोदित व प्रस्थापितांसाठी हक्काचे व्यासपीठ असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल डॉ.वि.ना. कदम, शिवाजीराव धर्माधिकारी, प्रा. रामकृष्ण बदने, डॉ. अजय क्षीरसागर, भीमराव राऊत, सौ. लक्ष्मी पुरणशेट्टीवार, सौ. बबिता कौर, साईनाथ चंदापुरे, अनुरत्न वाघमारे, माधवराव पा. ईळेगावकर यांचा लोकसंवाद पुरस्काराने सत्कार करण्यात आला. तर जीवनगौरव पुरस्कार देवून ग. शं. चिटमलवार व मरणोत्तर जीवनगौरव कै. ग.पि.मनूरकर यांचे चिरंजीव दिलीप मनुरकर यांना देण्यात आला. या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन प्रा. धाराशिव शिराळे यांनी केले तर आभार श्री सुधाकर पवार यांनी मानले. शेतकऱ्यांच्या दैन्याला जबाबदार कोण? या विषयावरील परिसंवादात माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील अध्यक्षपदावरुन बोलतांना म्हणाल्या शेतकरी काबाडकष्ट करतो. पण त्याच्या घामाला, कष्टाला, पिकवलेल्या मालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आत्महत्या करतो. याला जवाबदार शासन आहे, पूर्वापार चालत आलेली धोरणे शेतकऱ्यांच्या दैन्याला जवाबदार आहेत. ती धोरणे बदलल्याशिवाय शेतकऱ्यांचे दैन्य दूर होणार नाहीत अशी अनेक उदाहरणे देऊन
स्पष्ट केले.
माजी आ. शंकरअण्णा धोंडगे म्हणाले शासन बोलते एक व करतेच दुसरेच. नुसते कायदे करुन चालणार नाहीत. त्याची अंमलबजावणी योग्य तन्हेने झाली पाहिजेत. तेच होणार नसेल तर कितीही धोरणे राबवून काही निष्पन्न होणार नाही.
दुपारच्या सत्रात विलास ढवळे यांच्या अध्यक्षतेखाली कथाकथन सत्र संपन्न झाले. यात राम तरटे, स्वामी कान्हेगावकर, प्रा. डॉ. शंकर विभुते, बालाजी पेटेकर यांनी विविध विषयाच्या कथा सांगून प्रेक्षकांची मने खिळून ठेवली.
प्रा. डॉ. शंकर राठोड यांच्या अध्यक्षतेखाली कवि संमेलन खूपच रंगले सूत्रसंचालन प्रा. डॉ. पंडित शिंदे यांच्या खुमाषदार सूत्रसंचालनाने तर बहारच आणली. यात नवोदित व प्रथितयश अशा चाळीस कविंनी सहभाग नोंदवला.
संमेलन यशस्वीतेसाठी शाळेचे प्राचार्य विश्वजीत देशमुख, सतिश देशमुख, मु.अ.सुरकुटवार, सौ. स्वाती वच्चेवार, संजय हिवराळे, टिप्रेसवार, महेश मोरे, नागोराव डोंगरे, गणपत माखणे, राजू श्रीरामवार, व शिक्षकांनी खूप मेहनत घेतली. सायंकाळी आठ वाजता संमेलनाचे सूप वाजले. प्रेक्षकांची गर्दी, साहित्यिकांचा सहभाग व उत्साह पहाता हे संमेलन खूपच यशस्वी झाल्याची चर्चा आहे.
दिगंबर कदम
संयोजक
लोकसंवाद साहित्य संमेलन मो.क्र.9422870381