आत्मभान जागृत करणारे राष्ट्रसंत*: गाडगेबाबा २० डिसेंबर स्मृतीदिन विशेष

समाजाला आत्मभान शिकवणारे थोर समाजसुधारक, निष्काम कर्मयोगी, समाजाचे श्रद्धास्थान, राष्ट्रसंत गाडगे महाराज यांचा आज स्मृतिदिन. समाजाला अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचे महान कार्य या संतांनी केले. त्यामुळे त्यांच्या कार्याची आपण दखल घेऊन त्यांच्यानुसार वर्तन केल्यास आपलं राष्ट्र महासत्ता होण्यास उशीर लागणार नाही, त्यासाठी त्यांनी दशसूत्रे सांगितले, त्यांनी जे सांगितले ते फक्त आपण राबवायचे, व्यवहारात त्याचा उपयोग करायचा ,नवीन काहीही करायचं नाही, आपल्या मुलांना शिक्षण द्या, कर्ज काढू नका, ज्याना घर नाही त्यांना घरे द्या असे सरळ सांगणारे ते संत होते,सर्वांनी एकत्रित येऊन जीवन जगावे ;असे त्यांना वाटत होते, प्राणी मात्रावर दया करा, त्यांनाही जीव आहे अशी मानवतावादी त्यांची शिकवण होती, *दया करणे जे पुत्राशी| तेच दास आणि दासी* || अशाप्रकारे वागले, म्हणून तर त्यांचे नाव आपण आज सुद्धा घेत आहोत, कीर्तनातून समाज प्रबोधन करणारे, समाजाला नेहमी एकत्रित करून आत्मभान जागविणारे कसलाही वायफळ खर्च न करता मंदिराच्या समोर मोकळ्या जागेत स्वतः साफसफाई करून रात्रीच्या वेळी कीर्तन सेवा देणारे फक्त गाडग्या मध्ये अन्न खाणारे ते सुद्धा कष्ट करून अशी माणसे शेकडो वर्षानंतर जन्माला येतात असे गाडगे महाराज म्हणून आपण त्यांचा स्मृतिदिन करतो,
हे तरुणाने अगोदर जाणून घ्यावे,
नंतरच त्यांच्या कार्याकडे वळावे.
राष्ट्र संत गाडगेबाबांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ रोजी शेणगाव येथे झाला, त्यांच्या वडिलांचे नाव झिंगराजी राणोजी जानोरकर तर आईचे नाव सखुबाई झिंगराजी जानोरकर होते,

संत गाडगेबाबा हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध कीर्तनकार होते,त्यांनी आपल्या कीर्तनातून समाजातील दाभिंकपणा, रूढी परंपरा यावर टीका केली, महाराजांचे कीर्तन हे लोक प्रबोधनाचे एक उत्कृष्ट माध्यम होते अंधश्रद्धा दूर करण्यासाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केले,
दीन-दुबळया लोकांची अनाथ अपंगाची सेवा केली, समाजातील रंजल्या- गांजलेल्या निराधार लोकांना आधार दिला, त्यांच्या मध्ये त्यांनी देव पाहिला, साधा वेश करून कानात कवडी घालून व एका हातात झाडू,तर दुसऱ्या हातात गाडगे असे, म्हणूनच त्यांना लोक त्यांना गाडगेबाबा म्हणत असत, आयुष्यभर सदसद विवेक बुद्धीने विवेकाचा खराटा घेऊन गावाबरोबर गावाबाहेर लोकांची अंत:करणे स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला, तुमच्यात असणारे मतभेद, अस्पृश्यता, अंधश्रद्धा ,अस्वच्छता रोगराई या सर्वांची हकालपट्टी ते कीर्तनातून करीत असत ,
*अंधश्रद्धा नाश। रूढी परंपरा*
*ओढती ताशेरा। कीर्तनात*
*बळी बोकडाचा । देव शेंदराचा*
*नाही पुजायचा। पाप नको।*
” देवळात जाऊ नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र चमत्कार यावर विश्वास ठेवू नका, असा उपदेश ते करत असत,
स्वतः त्यांनी मुलीच्या बारशाचे जेवण गोडधोड केले, त्या काळातील रूढी व परंपरेला त्यांनी छेद दिला,
१ फेब्रुवारी १९०५ रोजी त्यांनी घरादाराचा त्याग केला, भारतभ्रमण करून लोकसेवा केली, कोणत्याही फळाची अपेक्षा न करता समाजासाठी व गोरगरीब लोकांसाठी जीवन जगले,
मी जगद्गुरू तुकाराम महाराजांचा शिष्य आहे, डॉ बाबासाहेब आंबेडकर माझे गुरु आहेत, माझा कोणीही शिष्य नाही, असे ते ठामपणे सांगत असत,
सर्व सामान्य लोकांना आपले विचार समजण्यासाठी व-हाडी भाषेचा वापर करत असत, राष्ट्रसंत गाडगे बाबांनी देहू, नाशिक, पंढरपूर, आळंदी या धार्मिक ठिकाणी धर्मशाळा बांधल्या,
अनेक नद्याकाठी घाट बांधले,
भागवत धर्माच्या कळसावर गाडगेबाबांनी २० व्या शतकात कर्मयोगाचे ध्वज फडकावले,

*गोपाला गोपाला । देवकीनंदन गोपाला* या भजनाचा प्रसार केला, त्यामुळे सर्व समाज एका छत्राखाली आला, लोकांना बाबाचे विचार पटले,
चालते बोलते संस्काराचे विद्यापीठ असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही, त्यांची वाणी श्रोत्यांच्या हृदयाला भिडणारी होती, रात्री कीर्तनाने डोक्यातील घाण स्वच्छ करीत जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती अशी त्यांची शिकवण होती ,

*स्वच्छता ज्याचे घरी। आरोग्य तेथे वास करी । आरोग्याचे मंत्र । स्वच्छ परिसर ।स्वच्छ भारत । समृद्ध भारत।।* * असे सांगता येईल,
संत गाडगेबाबाची दशसूत्री
१) उघडया-नागडयांना – वस्त्र
२) गरीब मुलामुलींना — -शिक्षण
३) बेघरांना —-आसरा
४) अंधू,पंगू रोगी —औषध
५) बेकांराना ———– रोजगार
६) पशुपक्षी व प्राणी —-,अभय
७) तरूण-तरूणीचे— लग्न
८) दु:खी व निराधार — हिंमत
९) भुकेलेल्यांना —अन्न
१०) तहानलेल्या — पाणी
असे समाज परिवर्तन करणारे महत्त्वाचे सूत्रे त्यांनी मांडले ,
शिक्षण हाच आजचा रोकडा धर्म आहे, आचार्य अत्रे यांनी संत गाडगेबाबा बद्दल खालील उदगार काढले, ‘ *सिंहाला पहावे वनात, हत्तीला पहावे रानात,तर गाडगेबाबांना पहावे कीर्तनात*, असे म्हटले जाते,
महाराष्ट्र शासनाने ग्राम स्वच्छता अभियानाला त्यांचे नाव दिले आहे, तसेच राष्ट्रसंत गाडगे महाराज अमरावती विद्यापीठ असे नामकरण केले आहे, त्यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेतली आहे,

आपण सुध्दा त्यांच्या प्रमाणे कार्य केल्यास आपला देश सदैव स्वच्छ राहील, निरोगी जीवन- स्वच्छ परिसर मानवी जीवनात अन्न ,वस्त्र ,निवारा शिक्षण व आरोग्य या मुख्य गरजा झालेल्या आहेत ,त्याबरोबर स्वच्छता हेही मुख्य गरजच आहे, अशा या महान समाजसुधारकाचा मृत्यू 20 डिसेंबर 1956 रोजी झाला , त्यांनी केलेले कार्य आपण सदैव चालू ठेवल्यास हीच त्यांना वाहिलेली भावपूर्ण श्रध्दांजली ठरेल,
राष्ट्रसंत गाडगेबाबांना विठूमाऊली प्रतिष्ठानच्या च्या वतीने विनम्र अभिवादन,

 

साहित्यिक,
*प्रा. विठ्ठल गणपत बरसमवाड*
अध्यक्ष: विठूमाऊली प्रतिष्ठान खैरकावाडी
ता. मुखेड जि, नांदेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *