कविता मनामनातल्या कवी – कुसुमाग्रज- कविता – कणा
कुसुमाग्रज (विष्णू वामन शिरवाडकर उर्फ तात्यासाहेब शिरवाडकर).
जन्म : २७/०२/१९१२ नाशिक येथे.
मृत्यू : १०/०३/१९९९
कुसुमाग्रज यांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर. त्यांचे काका वामन शिरवाडकर यांनी त्यांना दत्तक घेतले, त्यानंतर त्यांचे नाव विष्णू वामन शिरवाडकर असे झाले. कवी, लेखक, नाटककार, कथाकार, कादंबरीकार, लघूनिबंधकार आणि समिक्षक असे त्यांचे चतुरस्त्र व्यक्तिमत्व होते.प्रामाणिक सामाजिक आस्था, क्रांतीकारक वृत्ती आणि शब्दकलेवरचे प्रभुत्व ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये आहेत.
कुसूम ही त्यांची लहान बहीण. तिच्या आधी जन्मलेला म्हणजेच कुसुम पेक्षा मोठा कुसुम+अग्रज = कुसुमाग्रज असे त्यानी टोपण नाव धारण केले. आणि आयुष्यभर या टोपण नावानेच त्यांनी कविता लेखन केले.
कुसुमाग्रजांचे मराठी साहित्यात मोलाचे योगदान आहे. याची दखल घेऊन त्यांना ज्ञानपीठ पुरस्काराने सन्माननित करण्यात आले. वि.स.खांडेकर यांच्या नंतर ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे कुसुमाग्रज हे मराठी साहित्यातील दुसरे सन्माननित साहित्यिक आहेत.त्यांच्या साहित्यातिल योगदानाचा गौरव म्हणून २७ फेब्रुवारीला म्हणजेच त्यांच्या जन्म दिवशी “मराठी भाषा गौरव दिन” (मराठी राजभाषा दिन) साजरा केला जातो. हा कुसुमाग्रज यांचा मोठा सन्मानच आहे.
——————
कुसुमाग्रज यांच्या अनेक गाजलेल्या कवितांपैकी आपल्या सर्वांच्याच मुखी असलेली एक सर्वपरिचीत रचना म्हणजे “कणा”. ही कविता शालेय पाठ्यपुस्तकात अभ्यासक्रमात होती.
अती पावसामुळे पुरात एका माणसाचे पूर्ण घरदार, संसार वाहून गेलेला असतो, अशी व्यक्ती कुसुमाग्रजांकडे येते आणि महापूरात झालेल्या नुकसानीची कहाणी सांगत असते. हे ऐकून सरांचा हात मदतीसाठी नकळत खिशाकडे जातो. ते पाहून ती व्यक्ती सांगते की मला पैसे नकोत सर. एकटेपणा वाटला म्हणून आपल्यासोबत बोललो. माझा संसार जरी मोडला असला तरी माझा कणा अजून ताठ आहे. आपण फक्त लढ म्हणा, उमेदीचे शब्द सांगून पाठीवर हात ठेवा, मी पुन्हा जोमाने कामाला लागेन. हा त्या व्यक्तीच्या ठायी असलेला आत्मविश्वास आणि स्वाभिमान वाचकांनाही स्फुर्ती देतो. आणि कितीही मोठे संकट आलं तरी कोलमडून जायचं नाही, धीराने संकटाचा सामना करायचा असा मोलाचा संदेश ही कविता आपल्याला देऊन जाते.
कवितेत महापूराचा कुठेही उल्लेख नसतानाही वाचक महापूरात लोटले जातात आणि महापूराला प्रसन्न मुद्रेने ताठ कण्याने सामोरे जातात.मुक्तहस्त अलंकाराने सजलेली ही कविता आपल्या सर्वांच्याच मनात घर करून आहे….
*कणा*—–—–
ओळखलत का सर मला?’ – पावसात आला कोणी;
कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी
क्षणभर बसला नंतर हसला, बोलला वरती पाहून;
‘गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून’
माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली;
मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली
भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले;
प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले
कारभारणीला घेऊन संगे, सर आता लढतो आहे;
पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे
खिशाकडे हात जाताच, हसत हसत उठला;
‘पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला’
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा;
पाठीवरती हात ठेऊन, फक्त ‘लढ म्हणा’!
◆◆◆◆◆- कुसुमाग्रज◆◆◆◆◆संदर्भ – इंटरनेट
(विजो) विजय जोशी – डोंबिवली
९८९२७५२२४२