Post Views: 161
नांदेड – तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात वर्षभरातील ३६५ दिवस कधीही श्रामणेर दीक्षा दिली जाते. दरमहा १० दिवसांचे शिबिर आयोजित केले जाते. या ठिकाणाला आता श्रामणेरांची दीक्षाभूमी म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. १९ जानेवारी रोजी शुक्रवारी श्रामणेर दीक्षाभूमी संकल्प भवनाचा पायाभरणी समारंभ आयोजित करण्यात आला असल्याची माहिती येथील अखिल भारतीय भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष तथा धम्मगुरू संघनायक भदंत पंय्याबोधी थेरो यांनी दिली.
पौष पौर्णिमेच्या महिन्यात १९ तारखेला पौर्णिमोत्सव या कार्यक्रमात हा पायाभरणी समारंभ संपन्न होणार आहे. पौष पौर्णिमेला
राजा बिंबीसार याने राजगृह येथे बौद्ध धम्माची दिक्षा घेतली. वेळुवन भिक्षुसंघास दान म्हणुन अर्पण केले. यावेळी तथागतांनी वेळुवनात ४५ वा वर्षावास केला. या निमित्ताने मोठया उत्सवाचे आयोजन करण्यात आले. याच पौर्णिमेला राजा बिंबिसार यांची महाराणी खेमा यांनीही गौतम बुद्धाकडून धम्मदीक्षा घेतली. श्रीलंकेत ज्याप्रमाणे स्तुपाची पुजा केली जाते तद्वतच पौष पौर्णिमेला स्तुपाची पुजा करण्याचा प्रघात आहे. यासाठी भव्य स्वरूपातील या स्तुपाचे बांधकाम करण्यात येणार आहे.
या निमित्ताने सकाळपासूनच परित्राणपाठ त्रिरत्न वंदना, बुद्ध पुजा, गाथापठण, ध्यानसाधना, बोधीपुजा, भोजनदान, दान पारमिता, धम्मदेसना तसेच बुद्ध भीम गितांचा प्रबोधनपर कार्यक्रम आदी कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहणार असून स्तुप उभारणीबाबत पायाभरणी आणि पुढील नियोजन केले जाणार आहे. यासाठी येत्या शुक्रवारी परिसरातील बौद्ध उपासक उपासिका बालक बालिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन प्रशिक्षण केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.