आमची आई आम्हाला मिळावी म्हणून हरी त्याच्या आईपासुन दुर झाला..

 

एक घडलेला खराखुरा किस्सा सांगते.. माझ्या माहेरी अनेक माउ , अनेक जनावरे .. घरचं दुधदुभतं.. प्राणीसेवा हीच इशसेवा असं आमचं घर.. माणसांपेक्षा प्राण्यांवर प्रचंड जीव..
घरातील प्रत्येकजण प्राणी ,पक्षी आणि निसर्ग प्रिय..
साधारणपणे महिन्याभरापुर्वी आमच्या म्हशीने एका रेडकाला जन्म दिला.. भावाने त्याचं नाव हरी ठेवलं.. रेडकु एकदम देखणं.. म्हैस साडेतीन लिटर एकावेळी दुध द्यायची..
अचानक १४ व्या दिवशी रेडकु दुध पिणं बंद झालं.. डॉक्टर म्हणाले , तो दुध खुप पितोय त्यामुळे त्याचं पोट भरलय .. थोडं दुध कमी द्या.. दोन दिवस होवून गेले तरी हरी दुध न पिता शांत बसुन असायचा.. रोज उड्या मारणारा हरी शांत झाला त्यामुळे हसणारं घरही शांत झालं.. सगळेजण हवालदिल झाले .. जंत झाले असतील म्हणुन त्याला जंताचं औषध दिलं तरीही काहीही उपयोग नाही. हरीला गोठ्यातुन घरात बेडवर आणलं .. त्याला पेज दे , मांडीवर डोकं ठेउन त्याला पाणी पाज अशी सेवा सुरु झाली.. पण हरी या सगळ्याला रीसपॉंड करत नव्हता..
तेव्हाच आई घरातल्या पायऱ्या उतरताना पडली आणि तिला लागलं.. एकीकडे हरी आणि दुसरीकडे आई . नक्की कोणाकडे जास्त लक्ष द्यायचं असं झालं.. सगळे रडवेले झाले पण घरातील संस्कारानी हरीकडे जास्त ओढा धरला आणि हरीला रत्नागिरीत गाडीने आणुन सलायन लावलं.. गोळ्या सुरु केल्या.. आई दुखरा पाय घेउन घरात शांत बसुन राहिली..
माझ्या भावाचा मला फोन आला , त्याने सगळी परिस्थिती सांगितली.. रेड्याला ॲडमीट केलं .. जवळपास साढेबावीस हजार रुपये खर्च झाले पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही.. त्याला पुन्हा घरी आणलं.. आई दुखरा पाय घेउन झोपुन आणि हरी बेडवर..पुन्हा दोघांची सेवा सुरु झाली..
आई पडुन चार दिवस झाले तिचं ऑपरेशन तर करावच लागणार होतं.. वाचवायचं तर दोघांनाही होतं पण कसं ??..
पण शहाण्या हरी बाळाने स्वतःहुन प्रॉब्लेम सोडवुन टाकला..
त्याने पहाटे प्राण सोडले आणि त्याला धरणीमातेच्या स्वाधीन करुन भाऊ आईला घेउन रत्नागिरीत हॉस्पिटलला आला .. तिथे तिला ॲडमीट करुन तिचं सगळं उत्तम झालं.. आईचा प्राण वाचवायला आणि सगळ्याचा त्रास कमी करायला हरीच्या आत्म्याला शरीर सोडावं लागलं.. घरातल्या प्राण्यांना जेवढं कळतं तेवढं कोणालाही कळणार नाही म्हणुनच शिवाजी महाराजांच्या वाघ्याने त्यांच्या चितेत उडी घेतली..
जे प्राण्यांवर प्रेम करत नाहीत त्यांना या गोष्टीचं महत्व कळणार नाही.. किवा हरी जाणारच होता असं म्हणतील .. मानला तर देव नाहीतर दगड यातलाच हा प्रकार पण जो प्राण्यांवर जीवापेक्षा जास्त प्रेम करतो तोच हे जाणु शकतो..आपल्यासाठी ते आपला जीव देतात आणि आपण ?.. प्राणी , पक्षी, झाडे सगळे बोलतात, सगळ्याना ऐकु येतं आणि सगळ्याना आपलं प्रेमही कळतं.. त्यांना स्पर्श कळतो..
यावरुन माझ्या बागेत घडलेला एक किस्सा सांगते. माझ्या अंगणात असलेली जाई सुकुन गेली होती.. माझा माळी म्हणाला , मॅम झाड पुर्ण गेलय काढून टाकु ना ??.. मी झाडापाशी गेले आणि पाहिल्यावर माळ्याला म्हटलं , काढु नका , असूदेत.. दुसऱ्या दिवशी सकाळी झाडाजवळ गेले आणि त्याच्यावर हात फिरवत म्हटलं , माझं काही चुकलं का ??.. मला माफ कर.. तुला पाणी कमी दिलं गेलय .. मी त्या वेलीला पाणी दिलं आणि अतिशयोक्ती नाही चार पाच दिवसांत त्याला बारीक पालवी दिसली म्हणुन मी माळ्याला फोन केला तर तो म्हणाला , मॅम हे कसं शक्य आहे ??.. मुळं पूर्ण सुकुन गेली होती.. माझ्या स्पर्शाने , बोलण्याने ते झाड पुन्हा बहरलं होतं.. कृतज्ञता आणि माफी या दोन शब्दात खुप मोठी ताकद आहे..
मी यापुढे काहीही लिहु शकत नाही..इतकच सांगेन सगळ्यावर भरपुर प्रेम करा..

सोनल गोडबोले.. हरे कृष्ण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *