वेदेनेच्या अलीकडे अन् भावनांच्या पलिकडे जगता यावे.

 

जीवनातील प्रत्येक क्षणी तुमच्याकडे जे आहे फक्त तेच तुम्ही इतरांना देऊ शकता. जसे आनंद, प्रेम, सुख-दु:ख, वेदना, द्वेष, राग, मत्सर, आपुलकी, वर्ण इत्यादी. यातल तुम्हाला नेमकं कोणाला काय द्यायचंय हे परिस्थितीवर किंवा ज्याच्या-त्याच्यावर अवलंबून असते.
मनातल्या कोणत्याही भावनांचं वादळात रूपांतर व्हायला वेळ लागत नाही. वेळ लागतो आनंद, प्रेम आणि सुख याचा शोध घ्यायला. मानवी जीवन जगत असताना तो विविध अंगांनी जगत असतो भावनांना अनावर घेऊन वावरत असतो त्यातूनच वेदनांच्या कळा त्याच्या चेहऱ्यावर उमटु लागतात. हळूहळू तो भावनांच्या वादळात अडकतो, अश्या वेळी आपण काय करतो? लगेच अपशब्द वापरतो अथवा असं काही तरी करून बसतो ज्याचा काही काळानंतर आपल्याला पश्चाताप होतो. कारण आपल्या क्रोध, दुःख किंवा नकारात्मक भावना यांना कसे हाताळावे हे शाळेत किंवा घरी शिकविले जात नाही.

मनात उठणाऱ्या प्रत्येक भावनेला प्रतिरूप अशी एक लय श्वासांमध्ये असते. म्हणून जेव्हा मनावर थेट ताबा मिळविणे शक्य नसते, तेव्हा श्वासाद्वारे मनावर ताबा ठेवता येतो.
आपल्याला श्वासांबद्दल अधिक ज्ञान होते, तेव्हा आपण आपल्या विचार आणि भावनांवर ताबा ठेवू शकतो, आणि आपल्या इच्छेनुसार क्रोध व नकारात्मक भावनांना दूर ठेवू शकतो.

नकारात्मक भावना आपोआप नाहीशा होतात. वारंवार येणारा क्रोध व तणाव हा प्रचंड प्रमाणात कमी होतो. वस्तुस्थिती स्वीकारायची क्षमता वाढते. भावनांच्या आवेगात काहीतरी करून बसण्या ऐवजी तर्कसंगत कृती करू लागतो.
आपापसातील प्रेम टिकवून ठेवण्यासाठी प्रारंभीचे आकर्षण आणि परिवर्तनशील भावनांच्या पलीकडे तुम्हाला जावे लागेल. मग कोणत्याही प्रकारच्या भावना आल्या तरी तुम्ही तुमच्या प्रियजनांबरोबर जीवनाची गोडी कौशल्याने टिकवून ठेवू शकाल.
अर्थातच आपसात सुसंवाद ही तसाच असायला हवा
“मला खरेच तसे म्हणायचे नव्हते, तुम्हाला कळत कसं नाही?”तुमचा गैरसमज होतो आहे., माझं ऐकुन तर घ्या, किंवा घोळात न ठेवता स्पष्ट काय ते सांगा” अश्या अनेक संवादातून मिळणाऱ्या उत्तरातून अनेक वाद टळतील आणि वेदनांची कळ सोसावी लागणार नाही. भावनेतील तणावामुळे तुमच्या विचार, वाणी आणि कृती यामध्ये तफावत निर्माण होउ शकते.

जेव्हा तुमचे मन तणाव-मुक्त होईल, तेव्हा परिस्थितीचे स्पष्टीकरण ही होईल. वाणी शुद्ध होईल आणि कृतीमध्ये सौम्यता येईल.
जमिनीच्या पृष्ठभागावर पसरवलेल्या किंवा जमिनीत खोलवर पेरलेल्या बियांना अंकुर फुटू शकत नाही. त्यांना जमिनीच्या थोड्या आतमध्ये रुजवल्या तरच त्यांना अंकुर फुटून त्यांचे रुपांतर मोठ्या झाडामध्ये होते.
त्याचप्रमाणे प्रेम असो वा भावना योग्य प्रमाणातच, योग्य त्या वेळी व्यक्त करावे.
तुम्ही तणाव मुक्त असाल तरच तुमच्या परिवाराच्या बाकी व्यक्तींबद्दल अधिक संवेदनशील आणि जागरूक रहाल. यामुळेच तुम्ही स्वत:ला प्रभावीपणे व्यक्त करू शकता आणि तुम्हाला नेमके काय सांगायचे आहे ते इतरांना बरोबर समजू लागेल.

आपल्या घरात, मित्र परिवारात, स्नेही संबंधित आणि प्रियजनांत राहताना शांती, आनंद आणि सुख येण्यासाठी एक पाऊल तुम्ही नक्कीच उचलाल.
एक आनंदी मनच तुम्हाला शांत ठेवू शकते, तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकता आणि आयुष्याचा दर्जा सुधारू शकता. आनंदमय जीवन जगण्यासाठी तुम्हाला स्वतःला वेदेनेच्या अलीकडे आणि भावनांच्या पलिकडे जगावे लागेल.
भावनांचा त्याग करायला शिका, प्रेमाचा नाही.

 

रूचिरा बेटकर, नांदेड.
9970774211

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *