गावकूसा बाहेरील जीणं

 

 

31 जानेवारी 1920 रोजी मूकनायक वर्तमान पत्र भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले होते, त्या काळात शूद्रांना दिलेली वागणूक कशी होती याचा वृत्तांत या लेखात थोडक्यात लिहिला आहे.
वैदिक काळामध्ये आम्हाला चौथ्या वर्णांमध्ये बसविल गेलं, तीन वर्ण अतिशय श्रेष्ठ समजले जात होते, चौथा वर्ण म्हणजे शूद्र, माणूस असून सुद्धा माणसांमध्ये येता येत नव्हते, ज्या मिरवणुकीमध्ये घोडे ,कुत्रे चालत होते, तिथे आम्हाला चालता येत नव्हते,

गावाचं नाव सांगता येते, परंतु गावात राहता येत नाही, गावकूसा बाहेर जाऊन आम्हाला आमचं जीवन जगावं लागत होत, उच्चवर्णीय लोकांकडून होणारे आमचे हाल, बेहाल कोणाला सांगितले ,तर काहीच फरक पडत नव्हता, त्यामुळे लोकाच्या सेवा करून आमच्या दोन ते तीन पिढ्या गेल्या, गावात कोणताही कार्यक्रम असेल तर आम्हाला शेवटच्या पंगतीत गिळायला मिळत असे, ते सुद्धा अपमाना सोबतच, इतरांची सेवा करण्यातच आमचं आयुष्य बरबाद झालं
,वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवावा म्हणून आमच्या आजोबा, पंजोबांनी अनेक जनांचे मान ठेवले. लोकांच्या सतरंज्या उचलल्या ,जोडे उचलले परंतु माझ्या आजोबांचा मान कधीच कोणी ठेवला नाही ,अशी वाईट अवस्था या डोळ्यांनी पहावी लागली, हेच का जीवन? अनेक वेळेस खावे लागले. काही जण म्हणतात. हे जीवन फार सुंदर आहे या *जगण्यावर शतदा प्रेम करावे* मला या ओळीचा अर्थ आणखी कळला नाही, कसलं जगणं? गावात गेलो तर घर नाही, रानात गेलो तर शेती नाही ? आम्ही काही पाप केलं का ? हे सगळं आमच्यावरचं येते ,कोणीही आमच्या गावकूसाच्या बाहेरील झोपड्यात यावं दोन-चार शिवी हासाडाव्यात आणि निघून जावे, कोणाच्या समोर जायची आमची ताकद राहिली नाही, गावामध्ये रामायण वाचल्या गेले तरी आम्हाला ते ऐकता येत नाही, ऐकायला जाऊन बसण्याची परवानगी नाही, फक्त आम्ही बाहेरून स्पीकर वरून ते ऐकावं ,कसलं हे आमचे जीणं आणि गावामध्ये सप्ताह, भागवत झाले, परंतु आम्हाला कधी त्या ठिकाणी जाऊन चारचौघात बसून आनंद घेता आलं नाही, समानता म्हणतात हे फक्त आम्ही ऐकतो ,परंतु आज पर्यंत असमानतेतूनच जीवन जगलो.

उच्चवर्णीय यांच्या शेतात राबलो, शेतीतील काबाडकष्ट केलो, मुलाबाळांना शिकवण्याचा प्रयत्न केला. परंतु काहीच उपयोग झाला नाही असे किती दिवस चालायचे? आजोबा/ आजीचे कष्ट करून कष्ट करून हात पाय झिजले,पाठीवर ओझ वाहून पाठ झिजली तरी आम्हाला कोणी शाबासकी दिली नाही. गुरे राखायचे, शेण काढायचे, बैलगाड्या घेऊन माल घेऊन जायाचे, विहिरीतलं पाणी वर काढायचं, लाकडे फोडून द्यायचे असे काम आम्हाला एक दोन दिवस नाहीतर आयुष्यभर करावी लागतात, आमच्या चालण्यांने रस्ता बाटतो ,आमच्या थुंकनाने विटाळ होतो, म्हणून आम्हाला कमरेला गाडगे बांधावी लागली, पायांना खराटा बांधावा लागला, हे सगळं सहन करायची वेळ आमच्यावरच का आली? खरोखरच आम्ही एवढे नीच, आहोत काय ?आम्हाला जेवढे अवयव आहेत ,तेवढेच तुम्हाला सुद्धा आहेत, तरी आम्हाला हे का असे करतात? विषमता कोणी तयार केली.

सूर्य सर्वांचाच आहे तरी तो आमच्यावर का रुसला, झाड सर्वांना सावली देते, नदी सर्वांना पाणी देते, परंतु आम्हाला वेगळी वागणूक का दिले जाते, दगडाचा देव मंदिरात ठेवून त्याला बोलता येत नाही तरी आम्हाला तिथे त्याच्याजवळ जाता येत नाही?
किती वाईट अशी ही गावाबाहेरची वेस, संतानी सांगितलं मानवतावादी रहा ,चांगले जीवन जगा, परंतु आज पर्यंत आमच्या वाट्याला हे चांगलं जगनं आलं नाही, लोकांची सेवा करण्यामध्ये आमच आयुष्य गेलं आम्हाला कधी शाळेत जाऊन शिकता आलं नाही? पाठीवर शाबासकी मारून घेता आलं नाही,आमची पाठ फक्त ओझ वाहण्यासाठी होती,
कोणत्या शिक्षकांनी आम्हाला जवळ येऊ दिले नाही, शाळेच्या बाहेर बसविले,नेहमी गावकुसा बाहेरचे म्हणून हिणवले, आज आपला भारत स्वातंत्र्य होऊन 75 वर्षे झाले, अमृत महोत्सव साजरा झाला, किती लोक सुधारले बोट्यावर मोजणे इतके? आणखी ग्रामीण भागात तसेच वातावरण आहे. ग्रामीण भागात आज सुद्धा चहा वेगळ्या कपात देतात, हे ज्वलंत उदाहरण आहे,नुसत्या भौतिक सुविधा झाल्या म्हणजे माणसं सुधारली असे म्हणता येत नाही .सगळं तारुण्य आमचं असंच लाजीरवाण जीवन जगत निघून गेलं ,दात पडल्यानंतर हरभरे देऊन काय उपयोगाचे? अंगात ताकदच राहिले नाही, हाड झिजले तर मखमली कपडे घालून काय उपयोग असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. अनेक जणांनी आमच्या आई -बहिणीच्या अब्रू लुटल्या, कुठे गेले तरी आमच्या पाठी मागे कोणी उभे राहिले नाही , माजला का रे म्हणून लाथा बुक्क्यांनी तिथे ही हाणलं, आज सुद्धा आम्हाला म्हणावा तेवढा सामाजिक मान,प्रतिष्ठान, सन्मान मिळत नाही, थोडे सुधारले की संशय दृष्टिकोनातून आमच्याकडे पाहिलं जाते? असे का होते. आम्ही उपरे आहोत का? आम्ही दुसऱ्या देशातून आलोत काय? आम्हालाच असे काय केले जाते? आम्ही शूरवीर आहोत, हजारो लोकांना आम्ही पळून लावले तरी याचे कोणालाच काही सोयरसुतक नाही, वर्तमानपत्रात बातमी येऊ दिली जात नाही, असे का होते? यावर चिंतन होणे गरजेचे आहे. असे विचारणारा महामानव आम्हाला आता भेटला. आणि त्यांनी स्वातंत्र्य, समता बंधुता, न्याय,हक्क आम्हाला मिळून दिले. चवदार तळ्याचे पाणी पाजविले तसेच काळाराम मंदिरात सत्याग्रह केला म्हणून आम्हाला विठ्ठलाच्या मंदिरात जाऊन डोळे भरून मूर्ती पाहता आली ,

 

संविधान लिहून आम्ही सर्व एक आहोत याची जाणीव करून दिली ,अगोदर त्यांनी आम्हाला शिकवलं नंतर संघटित केलं आणि आता संघर्ष करायची तयारी ठेवली,तेव्हा कुठेतरी खेड्यातली मुलं शहरात जाऊ लागली त्यामुळे त्यांचा देशाभिमान जागृत झाला ,गावातील वेस आम्हाला बरचं काही सांगून गेली ,त्याच्या अलीकडे येताना आम्हाला विचार करावा लागत होता ,आता आम्ही ज्या ठिकाणी राहतो तिथे वेसच राहिली नाही, म्हणून आज आम्ही समाधानी व सुखी राहण्यासाठी धडपड करीत आहोत, आणि शहराकडे स्थलांतर करीत आहोत,म्हणूनच मूकनायक आता बोलू लागला 31 जानेवारी 1920 रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी तो सुरू केला होता,

 

″क्रमशः
शब्दांकन
*प्रा. बरसमवाड विठ्ठल गणपत*
अध्यक्ष: विठूमाऊली प्रतिष्ठान खैरकावाडी ता. मुखेड जि. नांदेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *