शब्दांना कोडं पडतं तेव्हा….

 

 

जेव्हा पहाटे शब्द स्वप्नात येउन माझी झोपमोड करतात , कानाला गुदगुल्या करत गुलाबी थंडीत मला उठवतात तेव्हा मात्र बेडवरुन खाली उतरण्याशिवाय पर्यायच उरत नाही..कारण तुम्ही माझ्या आर्टीकलची वाट पहात असता माझा रियाज म्हणुन मी रोज नवनवीन लिहायचा प्रयत्न करते ..
आज मोबाईल घेउन लिहायला सुरुवात करताना शब्दांनाच कोडं पडलं कारणच तसं होतं.. माझी नागपूरची मैत्रीण म्हणाली , मी वापस परत पुण्यात आले , शब्द गोंधळात पडले की राव , ते म्हणाले , वापस म्हणजेच परत हेच मी लहानपणी शिकलो .. आमच्या कोकणातील मुली म्हणतात , मी आलो , मी गेलो .. हे ऐकल्यावर वाटतं , लहानपणी पुल्लिंगी , स्त्रीलिंगी शिकलो मग ते काय होतं.. ते कुत्र की तो कुत्रा अर्र डोक्याची मंडइ होते राव..

पुण्यातले माझे मित्र म्हणतात , आमची बायको असं म्हणाली, आमची बायको तसं म्हणाली . आमची म्हणजे किती जणांची .. त्यापेक्षा माझी म्हणा की… उगाचच नको तिथे आदर दाखवला की शब्दही हसतात राव. कोल्हापूरचा माझा मित्र त्याच्या मुलाला म्हणतो , अहो राजे इकडे या , नाहीतर आम्ही पुणेकर ” ये बाबा” म्हणतो , का तर म्हणे , बाबा मित्र असतो .. मग मित्र कोण असतो भावा.. सगळाच गोंधळ .. भावा जेवलास का??. भावा आलास का ??.. कोल्हापूरकरांचे सगळेच भाऊ मग इतर नात्यांचं काय राव.. इचार करुन डोक्याचा भुगा हुतोय निस्ता..

मराठवाड्यातला माझा मित्र म्हणाला , सोनल तु पन कार्यक्रमाला ये .. अरे मित्रा तो बाणातला ण असतो रे .. नळातला नाही.. यांना हा फरक झेपतच नाही बुवा आणि आमच्यासारख्या तिखट कानाच्या पुणेकरांना जराही हे खपत नाही.. पानी नाही रे पाणी असतं ते पण आमच्या तोंडचं पाणी पळवुन हे खुशाल पुण्यात वावरतात.. धुळ्यावाले म्हणतात , आम्ही धुड्याचे .. अर्र , बोलताना ळे ला डे बोलतात मग लिहीताना काय लिहीतात ??.. ळ ला ड असेल तर मग ड ला काय भावा ??.. नको रे हा छळवाद.. पुण्यात जन्म झालेली आणि संपूर्ण आयुष्य पुण्यात घालवलेली मैत्रीण म्हणते ,आज नास्ट्याला मी ढोसा केला होता.. अरे देवा , हिने ढोसा ढोसला पण मला तो शब्द आजही पचवता आला नाही.. अनेक ढोसे हिने लिलया पचवले असतील .. मुळचे अकोल्याचे मित्र गेली अनेक वर्षे ते मुंबईत रहातात.. वरच्या पदावर नोकरी करतात तरीही एशी (A.C) म्हणतात.. अरे एसी असतं ना ते.. पण जेव्हा या शब्दांना कोडं पडतं आणि ते माझं डोकं खातात तेव्हा मी कोणाचं डोकं खाउ रे.. ??

इंग्रजीचं बरं राव , ही फादर तरीही फादर ला आदर दिला जातो..कट कट कट .. मराठीसारखी कटकट नाही.. पण मराठीत असलेला गोडवा या इंग्रजाळलेल्या भाषेत कुठून येणारना.. त्या त्या शब्दांचं , भाषेचं वेगळच सौंदर्य असतं राव ..
पण मला वैयक्तीक विचाराल तर मला प्रत्येक भाषेचा लहेजा आवडतो पण अशुद्ध भाषा अजिबात झेपत नाही.. रोज शब्दांशी खेळते , त्यांच्यासोबत जगते , त्यांच्यासोबत वावरते तरीही ते मला रोज नवी कोडी घालतातच कारण आपलं आयुष्यच एक गोड कोडं आहे..

सोनल गोडबोले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *