सन 29 जुलै 1985 मध्ये राजश्री शाहू विद्यालय येथे विराजमान झाल्यावर डॉ. यमलवाड सरांनी आपल्या रचनात्मक कार्यशैलीने अल्पावधीतच प्रशालेला प्रगतिपथावर नेऊन ठेवले. शिक्षण, सामाजिक, साहित्य क्षेत्रात गेली चार दशके कार्यरत असलेले माझे आदर्श डॉ.यमलवाड सर आपल्या ३9वर्षांच्या निःस्पृह शिक्षकी सेवेतून ३१ जानेवारी २०२34 रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. यानिमित्ताने त्यांच्या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणारे अक्षरधन.
विद्वत्त्वं दक्षता शीलं
सक्रान्तिरनुशीलनम् ।
शिक्षकस्य गुणाः सप्त
सचेतस्त्वं प्रसन्नता॥
शिक्षकाच्या अंगी असलेले सात गुण या सुभाषितात सांगितले आहेत.विद्वत्ता, दक्षता, चारित्र्य (शील), संस्कार करण्याची क्षमता, दयाळूपणा,चैतन्य आणि प्रसन्नता. या सुभाषिताप्रमाणेच शीलवान, संस्कारक्षम, चारित्र्यसंपन्न शिक्षक म्हणजेच राजश्री शाहू हायस्कूलचे मुख्याध्यापक, शिक्षणक्षेत्रातील ज्ञानतपस्वी, साने गुरुजींच्या विचाराचे पाईक, अनेकांचे मार्गदर्शक, विद्यार्थीप्रिय शिक्षक आदरणीय डॉ. यमलवाड सर आहेत.यमलवाड सरांच्या आयुष्याचे अनेक पैलू आहेत. त्यांचा स्वभाव मुळातच कार्यकर्त्याचा असल्यामुळे ते नेहमीच विविध कामांत व्यस्त असल्याचे पाहावयास मिळते.
एका ग्रामीण भागात आपले बालपण घालवीत ज्यांनी शैक्षणिक आणि सामाजिक नैतिक मूल्यांची केंद्रे चालवली तेच त्यांच्या आयुष्याचे मोल सार्थकी लावण्याचे बीजमंत्र होय
नवीन पिढीने राष्ट्र उभारणीसाठी सर्वस्व वेचले पाहिजे, या विचारांवर ठाम असलेल्या यमलवाड सरांनी माझ्यासारख्या अनेक नवोदित, काम करण्याची इच्छा असणार्या तरुणांना आपल्या शैक्षणिक संस्थेत सहभागी करून त्यांना संधी उपलब्ध करून दिली.
तीर्थक्षेत्र असलेल्या गेली ३8 वर्षे आत्मभान, समाजभान आणि राष्ट्रभान जपत समाजवादी विचारसरणीचे पाईक राहून निरपेक्षपणे केलेल्या कामात त्यांनी कोणताही अट्टहास धरला नाही वा मोहही मनाशी बाळगला नाही. त्यामुळेच ते आदर्श शिक्षक या व्याख्येत परिपूर्ण बसतात. त्यांच्या या आजवरच्या शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील कामाची दखल घेऊन आजवर विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
*देणाऱ्याने देत जावे*,
*घेणाऱ्याने घेत जावे*,
*घेता घेता एक दिवस*
*देणाऱ्याचे हात घ्यावे*.
या उद्दात दातृत्वाने,प्रत्येक मानवी जीवा सोबत नेहमीच वर्तनशील व्यवहार करत आपली भूमिका पारदर्शी ठेवली आहेआजच्या बदललेल्या शिक्षक-विद्यार्थी नातेसंबंधांतही विद्यार्थ्यांचा ओघ प्रशालेच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशालेकडे येत आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे निकोप आणि समृद्ध विद्यार्थी घडविणारी डॉ.यमलवाड सरांसारखी आदर्श व्यक्तिमत्त्वे.
माणसाच्या आयुष्यात आलेल्या आव्हानाना सामोरे जाऊन जो आपली अस्मिता अबाधित ठेवतो तो खरा विजेता असतो.हीच शिकवण सरांनी विद्यार्थी आणि सहकारी यांना आपल्या कर्तृत्वातून आणि नेतृत्वातून दाखवून दिले,.भावनेपेक्षा आपले कर्तव्य श्रेष्ठ मानून आपल्या कर्याप्रती अत्यंत दक्ष असणारे यमलवाड सरांसारखी व्यक्तिमत्वे दुर्लभ पहावयास मिळतात.
निरोपाचा क्षण नाही, शुभेच्छाचा सण आहे,
पाऊल बाहेर पडताना रेंगाळणारं मन आहे
निरोपाच्या क्षणी माझी एवढीच इच्छा
लाभो तुम्हास,समृध्दी हीच सदिच्छा .
तुमच्या सारखी निवळशंख,माणसे
आमच्या सानिध्याला उजळ करणारी आहेत.
सहवासाने प्रत्यक्ष नसलो तरी,तुमच्या कर्तृत्वाची अत्तर कुपी सदा दरवळत राहील.
आपलीच हितैषी
प्रा.सारिका बकवाड