◆◆◆◆ *कवी – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज**कविता – या झोपडीत माझ्या*
मुळ नाव – माणिक बंडोजी इंगळे.
जन्म – २७/०४/१९०९ (यावली – अमरावती).
मृत्यू – ११/१०/१९६८ (५९ वर्षे).
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म एका अत्यंत गरीब कुटुंबात झाला होता.गुरू आडकोजी महाराज यांनी त्यांचे नाव “तुकड्या” असे ठेवले होते.
तुकडोजी महाराज कमी शिकले असले तरी त्यांची प्रतिभा आणि बुद्धी तल्लख होती. आपल्या भारदस्त आवाजात ते भजन, किर्तन, प्रवचन करीत असत. ते खंजरी हे पारंपारीक वाद्य उत्तम प्रकारे वाजवित असत आणि त्यासोबत भजन सादर करीत असत.
ग्रामोनत्ती आणि ग्रामकल्याण हा त्यांच्या विचारसरणीचा केंद्रबिंदू होता. आपल्या भजन, किर्तन, प्रवचनाच्या माध्यमातून त्यांनी समाज प्रबोधन, स्त्रीमुक्ती चळवळ, अंधश्रद्धा निर्मुलन, अस्पृश्यता, जातीभेद, व्यसने, वाईट चालीरीती, खेडेगावाचा विकास, ग्रामकल्याण याबद्दल सतत जनजागृती केली. सर्वधर्म समभाव याचा त्यांनी सातत्याने पुरस्कार केला.
समाज प्रबोधन करत फिरत असतानाच ते गांधीजींच्या सहवासात आले. १९४२ च्या स्वातंत्र्य संग्राम चळवळीत सहभाग घेतला. त्यात त्यांना कारावासही भोगावा लागला.त्यांच्या समाजकार्य आणि देशसेवा कार्याची दखल घेऊन राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद यांनी त्यांना “राष्ट्रसंत” ही पदवी दिली. तेव्हा पासून सर्वजण त्यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणून संबोधू लागले.
आपल्या अनुभवातून आणि प्रतिभेतून त्यांनी “आनंदामृत” आणि “ग्रामगीता” या रचनांची निर्मिती केली.१९५५ मध्ये जपान मध्ये झालेल्या विश्वशांती संमेलनात संत तुकडोजी महाराज यांना निमंत्रित केले गेले होते.
मराठी, हिंदी भाषेत मिळून त्यांनी जवळपास तीन हजार भजने, दोन हजार अभंग आणि पाच हजार ओव्या लिहिल्या. या व्यतिरीक्त धार्मिक, सामाजिक, राष्ट्रीय अशा विविध विषयांवर त्यांनी ६०० लेख लिहिले. अशा प्रकारे तुकडोजी महाराज यांची प्रचंड साहित्य संपदा आज उपलब्ध आहे.
तुकडोजी महाराज आयुष्यभर ब्रम्हचारी राहिले. आयुष्याच्या शेवटी त्यांना कँसर हा आजार झाला होता. आणि त्यातच त्यांचे वयाच्या ५९ व्या वर्षी ११/१०/१९६८ रोजी निधन झाले.
******************
तुकडोजी महाराज यांनी त्यांच्या रचनांमधून ग्रामीण समाजाच्या प्रबोधनासाठी सातत्याने लेखन केले. त्यांची “या झोपडीत माझ्या” ही खूप गाजलेली रचना पाठ्यपुस्तकात अभ्यासक्रमात होती.
साधी, सोपी, सरळ आणि मनाचा ठाव घेणारी प्रबोधनात्मक रचना हे त्यांच्या रचनांचे वैशिष्ट्य आहे. रोजच्या जीवनातील दाखले आणि उदाहरणे देत तुकडोजी महाराज यांनी अनेक रचनांमधून त्यांचे विचार लोकांच्या मनात रुजविले.
माणसाच्या भौतिक गरजा कमी असल्या की माणूस झोपडीमध्ये सुद्धा सुखी राहतो. त्याला महालाची आवश्यकता नाही. अशा आशयाची सुंदर रचना “या झोपडीत माझ्या” आजही आपल्या सर्वांच्या मनामनात आहे.
चला तर मग सोपी शब्दरचना पण मोठा आशय असलेल्या या कवितेचा प्रत्यक्ष आनंद घेऊया –
या झोपडीत माझ्या
————————
राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली
ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या ॥१॥
भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे
प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या ॥२॥
पहारे आणि तिजोर्या, त्यातूनी होती चोर्या
दारास नाही दोर्या, या झोपडीत माझ्या ॥३॥
जाता तया महाला, ‘मज्जाव’ शब्द आला
भिती न यावयाला, या झोपडीत माझ्या ॥४॥
महाली मऊ बिछाने, कंदील शामदाने
आम्हां जमीन माने, या झोपडीत माझ्या ॥५॥
येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा
कोणावरी न बोजा, या झोपडीत माझ्या ॥६॥
पाहून सौख्यं माझे, देवेंद्र तोही लाजे
शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या ॥७॥
‘तुकड्या’ मती करावी, पायी तुझ्या नमावी
मूर्ति तुझी रहावी, या झोपडीत माझ्या ॥८॥
◆◆◆◆◆— राष्ट्रसंत तुकडोजी महाराज◆◆◆◆◆
संदर्भ – इंटरनेट
(विजो – विजय जोशी, डोंबिवली, ९८९२७५२२४२)
विनंती – या स्मृतिगंध उपक्रमाबद्दल आणि या कवितेबद्दल आपला अभिप्राय जरूर कळवा.
सुचना – या उपक्रमातील माहिती कोणताही बदल न करता आपण इतरत्र देऊ शकता.
■■■