आदरणीय सोनल मॅडम सस्नेह नमस्कार. मी सोलापूर वरून वाचक विद्यार्थी रियाज हनिफ तांबोळी. आपल्या ८व्या पुस्तकाचा संपूर्ण प्रकाशन सोहळा पाहिला आणि तो हृदयात साठवून घेतला… सर्वांची आदराने आपण केलेली विचारपूस, सचिन सरांचे प्रभावी सुत्रसंचालन, पुस्तकाबद्दल आपण केलेले मनस्पर्शी भाषण आणि सर्वच मान्यवरांची अत्यंत बोलकी मनोगते. सगळंच अप्रतीम होतं…
मॅडम तुमची आणि माझी ओळख तशी मागच्या ३ महिन्यापासूनचीच…. परंतु आपल्या दैनंदिनीतून व समृद्ध लेखनातून आपल्या व्यक्तीमत्वाची खूप चांगल्या रितीने ओळख झाली आहे. आपलं लेखन हे सर्वंकश असतं. विशेषतः ज्या विषयाला कोणीच स्पर्श करत नाही असे वेगवेगळे विषय तुम्ही लिहायला घेतात हे तुमच्या लेखनाचं वेगळेपण नेहमीच मला भावतं… लेखनामागची आपली शुद्द भावना ज्याला कळणार नाही तो आपल्यावर टिका करेल व ज्याला ती कळेल तो सदैव आपल्याशी टिकून राहील…
कादंबरी मॅडम या समाजासमोर प्रेरणा आहेत. ही केवळ त्यांची व्यथा नसून ही एका समाजाची यशोगाथा आहे. आपण त्यांचा संपूर्ण जीवन प्रवास समाजा समोर उलगडण्याचे महान कार्य केले आहे. आपल्या या आगळ्या-वेगळ्या निर्मितीला माझा मनापासून सलाम…
आपण जेव्हा पुस्तक लिहितानाचे आपले अनुभव सांगत होतात तेव्हा डोळे पाणावत होते… १५० पानांचे लेखन करून ते समाधानकारक न वाटल्यामुळे फाडून टाकणे, आपल्या हातून हे पुस्तक होऊ शकत नाही की काय असे वाटत असताना चेतक बुक्सने हे फक्त तुम्हीच लिहू शकता असे सांगणे, हे सगळं हा अनमोल ठेवा वाचकांसमोर आणण्यासाठी त्या विधात्याने आपल्याला दिलेला शुभ संकेत समजूयात… जी स्त्री स्वतःला पूर्णतः वाहून घेण्याची क्षमता ठेवते, जीच्या अंगी कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्याचे सामर्थ्य आहे तीच लेखिका अशी साहित्य कृती लिहू शकते. आपल्या प्रत्येक शब्दा-शब्दातून सर्वांबद्दलची कृतज्ञता आणि कादंबरी मॅडमबद्दलचा आदरभाव झळकत होता. मी हे पुस्तक वाचून सविस्तर नक्की लिहिन मॅडम… पुन्हा एकदा आपले मनापासून अभिनंदन…