कंधार : प्रतिनिधी
कंधार तालुका आणि शहरामध्ये लिंगायत समाज मोठ्या प्रमाणावर आहे. कंधार शहरामध्ये महात्मा बसवेश्वर महाराज यांचा अश्वारुढ पुतळा उभा रहावा, अशी मागणी लिंगायत समाजाने वारंवार संबधित प्रशासनाकडे केलेली आहे. पण वारंवार विनंती करूनही प्रशासनाने दाद न दिल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते सचिन पेठकर हे 22 तारखेपासून आमरण उपोषणाला बसलेले आहेत.
उपोषणाला चार दिवस उलटून गेले तरी प्रशासन दाद देत नसल्यामुळे सचिन पेठकर यांच्या अमर उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी, लिंगायत समाजाने उपोषण स्थळी महारक्तदान शिबिराचे आयोजन केले. यावेळी कंधार तालुक्यातील नौघरवडी, बहादरपुरा, पानभोसी, चिखलभोसी, मानसपुरी, लालवडी, पांगरा, उस्माननगर, शिराढोण, कौठा, काटकळंबा, फुलवळ, हरबळ, पोखर्णी, मरशिवणी, कुरुळा, दिग्रस आदी गावातील बसव अनुयायांनी या रक्तदान शिबिरामध्ये भाग घेतला आणि रक्तदान शिबिर यशस्वी केले.
डॉ शंकरराव चव्हाण शासकीय वैदकिय महाविद्यालय व रुग्णालय, विष्णुपुरी नांदेड यांच्या रक्तपेढीने रक्तदान शिबिरसाठी वैदकीय सहाय्य केले. उद्घाटन शिवसेनेचे महाराष्ट्र राज्य संघटक एकनाथ दादा पवार यांनी केले. तर रक्तदानाची सुरवात मंगणाळीचे सरपंच प्रतिनिधि पिंटू भाऊ मंगनाळे आणि अक्षय चिवडे यांनी केली.