सोनल मॅडम आपली प्राउड टू बी अ ट्रान्सवूमन ही कादंबरी नुकतीच वाचली . तृतीयपंथी समाजाच्या व्यथा छान रेखाटलात .
स्त्री की पुरुष या सीमारेषेवर असलेल्या एका बालकाच्या मनातील गुंता ,त्यावर आपसूकच येणारे एकाकीपण आणि to be or not to be या दोलायमान स्थितीतील बारकावे वेचक , वेधक आणि निवडक शब्दांत मांडलात .एका वेगळ्या धाटणीच्या विषयाला हात घालतांना विषय कुठेही भरकटला नाही तर व्यथा आपली सारीच ओंगळवाणी रूपे घेऊन पुढे सरकत जाते.
ऐश्वर्या आणि कादंबरी यातील फरकही ठळकपणे जाणवतो . एक आहार ,निद्रा ,भय मैथुन यात गुरफटलेली तर दुसरी सद्सद्विवेक बुद्धी जागृत असणारी .या दोन रेखा रेखाटतांना त्यांच्यातील सूक्ष्म दरीही अधोरेखित होते .
ऐश्वर्या ही व्यक्ती एका सुसंस्कृत घरांमधून आली असल्यामुळे क्वचित आयुष्याकडे ती सकारत्मक दृष्टीने बघते .मात्र सर्वसामान्य घरातून आलेल्या मुलांचं काय होत असेल हे कल्पनेपालिकडे आहे.आयुष्याच्या विविध वळणावर मिळणाऱ्या व्यक्ती , अमन सारखा जिवाभावाचा सखा, योगेशसारखा उत्तम मार्गदर्शक क्वचित ऐश्वर्याला मिळाला आणि म्हणूनच ऐश्वर्या ,कादंबरी म्हणून ओळख मिळवू शकली .
अगदी बालवयात समाजाकडून बालमनावर झालेले आघात ,त्यात समाजाची मानसिकता ,आणि आहे ते न स्वीकारण्याची घरच्यांची वृत्ती, यात त्या बालमनाचा होणारा कोंडमारा . डॉक्टरांनी सर्व स्पष्ट केल्यानंतरही ते न स्वीकारता माझा मुलगा यातून बाहेर निघेल ही आईची वेडी आशा.
खऱ्या अर्थाने विचार करायला लावते ते ऐश्वर्याचे कादंबरी होणं .ऐश्वर्याला योगेश ,अमन मिळाले म्हणून क्वचित तिला कादंबरी होता आलं ,पण अशा अनेक ऐश्वर्या असतील ज्यांच्या वाटेवर अमन ,योगेश नसतील.पावसाच्या पाण्याप्रमाणे , जिकडे उतार तिकडे वाहने हेच त्यांच्या ललाटी लिहिले असेल.अशा अनेक कादंबरी मिळून क्वचित त्यांचा दीपस्तंभ ठरतीलही ,मात्र खरा प्रश्न आहे तो समाजाच्या मानसिकतेचा .पोटच्या गोळ्यालाही न स्वीकारणारा आपला समाज अशा ऐश्वर्या आणि कादंबरीला स्वीकारेल ?
अजय गडचिरोली