नांदेड : प्रतिनिधी
सुप्रसिद्ध अभिनेते पुष्कर श्रोत्री व अभिनेत्री मृण्मयी देशपांडे यांच्या हस्ते आज कुसुम महोत्सवाचे थाटात उद्घाटन करण्यात आले. स्व.सौ. कुसुमताई चव्हाण यांच्या स्मरणार्थ दरवर्षी आयोजित केल्या जाणारा हा महोत्सव यंदा १ ते ३ मार्च दरम्यान येथील यशवंत महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे.
शुक्रवारी सकाळी झालेल्या उद्घाटन समारोहाला ज्येष्ठ नेते माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर, महोत्सवाच्या संयोजिका माजी आमदार सौ. अमिताताई अशोकराव चव्हाण, सहसंयोजिका अॅड. सुजया चव्हाण व अॅड. श्रीजया चव्हाण, माजी महापौर मंगलाताई निमकर, सौ. शैलजाताई स्वामी, सौ. मोहिनी येवनकर, सौ. जयश्री पावडे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. मंगाराणीताई अंबुलगेकर आदी उपस्थित होत्या. प्रारंभी पुष्कर श्रोत्री व मृण्मयी देशपांडे यांनी फित कापून महोत्सवाचे उद्घाटन केले. त्यानंतर डॉ. शंकरराव चव्हाण आणि सौ.कुसुमताई चव्हाण यांच्या प्रतिमांना हारार्पण व दीपप्रज्वलन करण्यात आले.
कुसुम महोत्सवाच्या शुभारंभानंतर पुष्कर श्रोत्री म्हणाले की, केवळ महिला दिन हा एकच दिवस महिलांचा दिवस नसून, वर्षाचे सर्वच्या सर्व ३६५ दिवस महिलांचेच असतात. आजी, आई, पत्नी, मुलगी अशा विविध रुपात एक स्त्रीच आपले आयुष्य घडवत असते. चव्हाण कुटुंबियांचे कलेवरील प्रेम मला माहिती होते. मात्र, कुसुम महोत्सवाच्या निमित्ताने महिला-भगिनींसाठी त्यांच्याकडून होत असलेल्या प्रयत्नांचीही ओळख झाली. मृण्मयी देशपांडे यांनी आपल्या भाषणात कुसुम महोत्सवाच्या माध्यमातून महिलांच्या सुप्त गुणांना वाव आणि व्यासपीठ देण्याच्या प्रयत्नांची प्रशंसा केली. विविध वस्तू, खाद्यपदार्थ बनविण्यांच्या महिलांच्या छंदाला व्यवसायात रुपांतरीत करण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
भास्करराव पाटील खतगावकर यांनी उपस्थितांशी संवाद साधताना डॉ. शंकरराव चव्हाण व सौ. कुसुमताई चव्हाण यांच्या काही आठवणींना उजाळा दिला. कुसुमताई आयुष्यभर साधेपणाने वागल्या. मंत्र्याची पत्नी म्हणून त्यांच्या वागण्यात कधीच फरक पडला नाही. त्या १५-१५ दिवस शेतात रहायच्या. गहू काढायच्या, धान्य घरी आणून स्वयंपाक करायच्या, असे ते म्हणाले. चव्हाण कुटुंबाचे कलेवर प्रचंड प्रेम असून, अशोकराव चव्हाण यांनी मंत्री म्हणून काम करताना सांस्कृतिक खाते आवर्जून मागून घेतले. मराठी चित्रपटांना त्यांनी सर्वतोपरी मदत करण्याची भूमिका घेतली, असेही त्यांनी सांगितले.
नांदेड जिल्ह्यातील महिलांमध्ये कमालीची क्षमता असून, त्या काय करू शकतात हे जगासमोर आणण्यासाठीच कुसुम महोत्सवाचा आम्ही प्रारंभ केला. या महोत्सवाला इतका प्रतिसाद मिळतो आहे की आम्हाला जागा अपुरी पडू लागली आहे. प्रत्येकाने आपल्या मुलींना शिकवावे, त्यांचे आयुष्य घडवावे आणि त्यांना एक चांगले नागरिक बनवावे, असे आवाहन कार्यक्रमाचा संयोजिका तथा माजी आमदार सौ. अमिताताई चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी महापौर मंगलाताई निमकर, सूत्रसंचालन कुणाल रेगे व स्मिता गव्हाणकर तर आभार प्रदर्शन अॅड. श्रीजया चव्हाण यांनी केले.
*पुष्कर श्रोत्री, मृण्मयी देशपांडेंनी लुटला खरेदीचा आनंद*
उद्घाटन सोहळ्यानंतर अभिनेते पुष्कर श्रोत्री, मृण्मयी देशपांडे यांनी कुसुम महोत्सवातील स्टॉल्सला भेट देऊन खरेदीचा आनंद लुटला. दोघांनीही निरनिराळ्या वस्तुंची भरपूर खरेदी केली. कुसुम महोत्सवात महिलांनी बनवलेल्या अनेक वस्तू, घरात, स्वयंपाक घरात दररोज लागणाऱ्या वस्तू, महिला वर्गाच्या वापरात असलेल्या वस्तू, साठवून ठेवण्याचे खाद्यपदार्थ तसेच जागेवरच आस्वाद घेण्यासाठी अनेक चविष्ट खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लागले आहेत. १ ते ३ मार्च दरम्यान दररोज सकाळी ११ ते रात्री १० पर्यंत हे स्टॉल्स सुरु राहतील.
यावर्षीच्या कुसुम महोत्सवात १ मार्चला सायंकाळी ६ वाजता नमस्ते नांदेड इन्फ्ल्यून्सर अवॉर्ड शो, फॅशन शो, २ मार्चला सायंकाळी ६ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम ‘मराठी पाऊल पडते पुढे’ तर ३ मार्चला सायंकाळी ६ वाजेपासून सुप्रसिद्ध गायक आणि गायिकांचा बहारदार कार्यक्रम बॉलीवूड नाईट कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.