नांदेड, दि.7 – बांधकाम क्षेत्रात मागील अनेक वर्षांपासून उत्कृष्ट काम करणाऱ्या शारदा कन्स्ट्रक्शन व कार्पोरेशनने सौरउर्जा निर्मितीत आता पुढचे पाऊल टाकले असून या कंपनीला मराठवाड्यातील 3 जिल्ह्यामध्ये 50 मेगावट सौरउर्जा निर्मिती करण्याची परवानगी दिली आहे.यातील 10 मेगावट सौरउर्जा निर्मितीचा प्रकल्प नांदेड जिल्ह्यात उभारला जाणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते आज मुंबई येथे कार्यारंभ आदेश देण्यात आले. या कामासाठी माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांचे प्रयत्न होते. त्या प्रयत्नाना यश प्राप्त झाले आहे.
केंद्र शासनाची कुसुम ‘सी’ ही नैसर्गिक ऊर्जा निर्मितीला प्रोत्साहन देणारी योजना सद्या देशात राबविल्या जात आहे. त्याअंतर्गत महाराष्ट्रामध्ये 2.0 मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजना राबविण्यात येत आहे.या अंतर्गत विविध कंपन्यांकडून सौरऊर्जा निर्मिती संदर्भात निविदा मागविण्यात आल्या होत्या. यामध्ये शारदा कन्स्ट्रक्शन ॲण्ड कार्पोरेशन कंपनीने भरलेल्या निविदा देशात 7 व्या व राज्यात पहिल्या क्रमांकावर आल्या होत्या.
शेतकऱ्यांना माफक दरामध्ये संपूर्ण दिवसभर उत्तम प्रकारची कृषी पंपाला वीज पुरवठा करणारी ही योजना असून या योजनेतून शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी पूर्ण वेळ केवळ 2 रुपये 90 पैसे ते 3 रुपये 10 पैसे या माफक दरात वीज उपलब्ध होणार आहे. त्यामुळे याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.
भोकर तालुक्यातील भोसी व मोघाळी या दोन गावांमध्ये विद्युत उपकेंद्राजवळ हा प्रकल्प उभारण्यात येणार असून या प्रकल्पाच्या माध्यमातून दोन्ही ठिकाणी प्रत्येकी 5 प्रमाणे 10 मेगावट सौर वीज निर्मिती करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे कार्यारंभ आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते शारदा चे संचालक सुमित मोरगे यांना प्रदान करण्यात आले.या प्रकल्पाचे काम मिळाल्याबद्दल उद्योजक सुमित मोरगे यांनी देवेंद्र फडणवीस, खा.अशोकराव चव्हाण यांची आभार मानले आहेत. त्यासोबतच नव्या क्षेत्रात उमेदीने पदार्पण करणाऱ्या सुमित मोरगे यांना खा.अशोकराव चव्हाण यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.