दि.०७/०३/२०२४ रोजी श्री शिवाजी विधी महाविद्यालय कंधार व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने मौ. कंधारेवाडी ता. कंधार येथे, राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत गावातील प्रतिष्ठित नागरिक अंबादासराव मोकमपल्ले यांच्या अध्यक्षतेखाली, चालू असलेल्या विशेष शिबिरास मार्गदर्शन करतांना श्री शिवाजी कॉलेज कंधार येथील प्राध्यापक.डॉ. उमेश पुजारी यांनी वरील प्रतिपादन केले.
आपल्या देशात महापुरुषांच्या अस्तित्वामुळे आपली भूमी महापुरुषांची भूमी म्हणून ओळखली जाते. समाजातील अनिष्ट रूढी आणि परंपरा, अन्याय, अत्याचार, पारतंत्र्य यांचा नाश करण्यासाठी महात्मा बुद्ध, महात्मा बश्वेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले या व अनेक महापुरुषांनी आपले उभे आयुष्य खर्च केले. आज हे महापुरुष हयात नसले तरी ‘तुका म्हणे एक मरणाची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे’ या तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे त्यांची कीर्ती आजही दरवळत आहे, यापुढेही दरवळत राहणार यात शंका नाही. पण आजच्या तरुण पिढीच्या मनात महापुरुषांविषयी किती आस्था आहे, त्यांचे विचार खरंच आपल्याला समजले का, हा खरा संशोधनाचा भाग आहे. समाजकार्य करणारे, समाज प्रबोधन करणारी आपली सर्व संत परंपरा ज्यांच्या आपण नियमित जयंत्या, पुण्यतिथ्या साजऱ्या करतो त्यांना अभिवादन करतो. परंतु त्यांचे विचार आपण जीवनात रुजवतो का, हा प्रश्न देशातील प्रत्येक नागरिकांनी स्वतःला विचारायला पाहिजे.
आपल्या देशातील लोकांच्या रक्तात महापुरुषांच्या विचारांपेक्षा राजकारणाचे गुणधर्म जास्त आहेत. या गुणधर्मामुळे आपण महापुरुषांचा राजकीय वापर करण्याची कोणतीच संधी सोडत नाही. त्यामुळे आपल्याकडून देशाचं अधःपतन होत आहे. एखाद्या जातीचे, समूहाचे पूर्ण मत घेण्यासाठी नेत्यांची धडपड सुरू आहे. या कार्यक्रमातून मोठ-मोठ्या रॅल्या, मिरवणुका, आतषबाजी, भाषणबाजी इत्यादी अनेक उपक्रम राबवले जातात. त्यावर पाण्यासारखा पैसा खर्च होतो. मात्र, आज लोकशाही वाचवायची असेल तर समाजाला, नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना तसेच अनुयायांना, महापुरुषांच्या निस्वार्थ विचाराची गरज आहे . येणाऱ्या काळात देशातील प्रत्येक नागरिकाने आपले राजकीय स्वार्थ, पक्ष, विचारधारा बाजूला ठेवून महापुरुषांचा वैचारिक वारसा जोपासून तो वाढवला पाहिजे, हीच खरी महापुरुषांना आपली श्रद्धांजली ठरेल…! असे आपल्या भाषणातून सांगितले.
सदरिल कार्यक्रमासाठी, महाविद्यालयातील स्वंयसेवक, कर्मचारी बंधुभगिनी, गावकरी, माय-माऊल्या उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे सूत्र संचलन डॉ. पी.एल. डोम्पले यांनी केले तर उपस्थितांचे आभार सहकार्यक्रमाधिकारी सुनिल आंबटवाड यांनी मानले. डॉ. भाई केशवरावजी धोंडगे साहेबांनी घालून दिलेल्या परंपरेप्रमाणे कार्यक्रमाची सुरवात वंदे -मातरम् गीताने होऊन राष्ट्रगीताने सांगता झाली.