कंधार : प्रतिनिधी
दि.०८/०३/२०२४ रोजी श्री शिवाजी विधी महाविद्यालय कंधार व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत मौ. कंधारेवाडी ता. कंधार येथे, गावातील प्रतिष्ठित नागरिक अंबादासराव मोकमपल्ले यांच्या अध्यक्षतेखाली, चालू असलेल्या विशेष शिबिरास मार्गदर्शन करतांना श्री शिवाजी विधी महाविद्यालय कंधार येथील विद्यार्थिनी ग्रामीण साहित्यिका सौ.शोभा धोंडिबा पारसेवार यांनी वरील उद्गार काढले.
महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, गोपाळ गणेश आगरकर, लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख, महर्षी धोंडो केशव कर्वे अशा कित्येक समाजसुधारकांनी, महिलांचे समाजातील स्थान महत्त्वाचे आहे हे सांगण्यासाठी अथक प्रयत्न केले. त्यांच्याच पायावर पाय ठेऊन पंडिता रमाबाई, डॉ. रखमाबाई राऊत, डॉ. आनंदीबाई जोशी, ताराबाई शिंदे अशा कितीतरी ज्ञात आणि अज्ञात स्त्रियांनी स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळात स्त्रियांच्या प्रश्नावर, परिस्थितीवर लिहायला, बोलायला सुरुवात केली. महिला शिकत आहेत. अर्थाजनासाठी बाहेर पडू लागल्या आहेत. सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीनं कामलागल्या आहेत. या महिला आता मुलगी, सून, पत्नी, माता या चौकटीत न राहता स्वावलंबी बनत आहेत. त्या अधिकारी, वैज्ञानिक, शिक्षक, कर्मचारी, मालक, अशा अनेक रूपांनी आपल्या समोर येत आहेत. त्यांनी ही चमक आपल्या कर्तृत्वाने मिळवली आहे. महिला स्वःतच्या बुद्धीला, आत्मसन्मानाला, कल्पनांना नवीन दिशा देण्याचा प्रयत्न करत आहेत.
हे खरे असले तरी आज स्त्रीला खऱ्या अर्थाने समानतेची वागणूक मिळत नाही. अधिकारांच्या अनेक संधी, तिच्याकडून केवळ ती महिला आहे म्हणून काढून घेतल्या जातात. महिलांना समाज आणि देशाच्या उभारणीसाठी दुय्यम समजल्या जाते. त्यांचा भेदभाव केला जातो.
अशा महिलांना कायद्यातल्या विविध तरतुदी उपयोगी येऊ शकतात. म्हणून त्यांच्या शक्ती आणि अधिकारांबद्दल माहिती देणे आवश्यक आहे. जेणेकरून ती तिच्या अधिकार आणि सुरक्षिततेबद्दल जागरूक होऊ शकेल. लैंगिक हिंसा आणि छळ विरुद्ध कायदा, घरगुती हिंसाचार रोखण्यासाठी कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा, हुंडा पद्धतीच्या विरोधात हुंडा बंदी कायदा, प्रसूती रजा कायदा, वडिलांच्या मालमत्तेवर महिलांचा हक्क स्वतंत्र भारतात महिलांसाठी आणलेला सर्वात ऐतिहासिक आणि महत्त्वाचा कायदा म्हणजे हिंदू उत्तराधिकार कायदा, गर्भपाताचा अधिकार कोणत्याही स्त्रीला गर्भपाताचा अधिकार आहे, म्हणजेच तिला हवे असल्यास ती तिच्या पोटात वाढणाऱ्या बाळाचा गर्भपात करू शकते. यासाठी तिला पती किंवा सासरच्या लोकांच्या संमतीची गरज नाही. असे अनेक महिलांचे संरक्षण कायदे आहेत.
परंतु सर्वसामान्यपणे, कायदे हे बाईच्या बाजूने आहेत हा गैरसमजही मोठया प्रमाणावर समाजात आहे. या गैरसमजातून आपण तिच्या अधिकारांची थट्टा तर करीत नाही ना? हा विचार होणे गरजेचे आहे. असे आपल्या मनोगतात सांगितले.
या कार्यक्रमासाठी, स्वंयसेवक, कर्मचारी, गावकरी, माय-माऊल्या उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे सूत्र संचलन डॉ. पी.एल. डोम्पले यांनी केले तर उपस्थितांचे सहकार्यक्रमाधिकारी सुनिल आंबटवाड यांनी आभार मानले.