याला उपमा नाही

कालचा दिवस माझ्यासाठी भलताच आनंद घेवून आला . सकाळी सकाळी १९८८ बॅचचा माझा विद्यार्थी संदिप गणपतरावजी हनवते याचा फोन आला . जवळपास अर्धा तास मोबाईलवर गप्पा मारण्यात गेला .) संदिप सध्या मंत्रालयात काम करतोय . मला आनंद याचा होतोय की या धावपळीच्या युगात वेळेतला वेळ काढून विद्यार्थी शिक्षकाला बोलतात . खालीखुषाली विचारतात . खरं तर जाळपास पस्तीस छत्तीस वर्षानंतर विद्यार्थी हे स्वतःच्या संसारात गुंतलेले असतात.वयाची पन्नाशी गाठलेले असतात. त्याच्या कार्यात ते मग्न असतात तरी वेळेतला वेळ काढून माझ्यासारख्या सामान्य शिक्षकांची आठवण करत फोन लावतात ते माझ्यासाठी आनंदाची अभिमानाची गोष्ट ठरते.

 

संदिप सारखे माझे दुसरे विद्यार्थीही मला नियमित फोन लावतात. यात प्रामुख्याने माझे मनोविकास विद्यालय कंधारचे ( १९८४- ८६ ) विद्यार्थी व जिपहा हदगाव (१९८७-९६ ) चे विद्यार्थी आजही घरी येतात. फोनवर बोलत राहतात .या विद्यार्थात शेतकरी , प्राध्यापक ,डॉक्टर ,शिक्षक राजकारणी,उद्योगपती,व्यापारी अटोचालक ,मजुरी करणा-यापासून उच्चपदस्थ सरकारी नोकरदार यांचा समावेश आहे.
माझ्या घरी विद्यार्थ्यांची आजही रेलचेल असते . त्याचं भेटणं माझ्यासाठी जीवनातलं एक अविस्मरणीय क्षण असते . तो क्षण खुपच आनंद देवून जातो. भूतकाळातील इतिहास जिवंत होतो. ते जेव्हा मला भेटतात तेव्हा ते त्याचं वय विसरतात.व जणूकाही ते शाळेतच शिकत आहेत याच भाव विश्वात ते रममान होतात. मी ही जणू पंचवीस तीस वर्षाचा आहे असं वाटायला लागते. किती निर्मळ बोलतात किती निर्मळ हसतात .सर्व काही विसरून फक्त गुरू शिष्य नातंचं ते जपत असतात.

माझे विष्णुपूरीचे विद्यार्थी व गाववाले आजही माझ्यावर जीवापाड प्रेम करतात. आजही ते म्हणतात , ” माझे गुरुजी आहेत.” खरंतर विष्णुपूरीची जिपहा ही शाळा सोडून ( मे .२००३ ) विस एकविस वर्ष झाले . पण ऋणानूबंध कायम आहेत. आजही विद्यार्थी आणि गावकरी यांच्याकडून आदरयुक्त सन्मान भेटत आहे.

काल रात्री ठिक दहावाजेच्यानंतर माझ्या घरी विष्णुपूरीच्या माहेरवासीन पण सध्याला औरंगाबाद निवासी आसलेल्या तीन मुली भेटायला आल्या तेंव्हा मी मुंबई विरुद्ध गुजरात मुलींचा क्रिकेट सामना पाहत होतो.आवाज आला राठोड सर .मी बाहेर पडण्यापूर्वीच त्या बैठक रूमसमोर येवून थांबल्या होत्या. मला निटसं दिसलं नाही. मी “कोण म्हणून विचारलो “. त्या तिघींही हसत एकदाच बोलल्या , “सर ओळखला नाहीत का ? ” मी थोडसं गडबडून गेलो. त्या मुली जवळपास विस पंचविस वर्षानंतर भेटत होत्या.

बैठकीत बसत्यानंतर मी चेहरा न्याहळत तिघींपैकी एकीला म्हणालो, “बेटी तूझं आडनाव जाधव पाटील “. ती हसली व म्हणाली , ”हो सर.” मग दुसऱ्या मुलीकडे पहात म्हणालो, ” तू गोविंद दादा हंबर्डेची मुलगी आहेस. ती ही हसत म्हणाली ,”सर कसं ध्यानात ठेवलात.” मग तिसरी प्रसन्न हसत म्हणाली , ” सर मी ? ” माझ्या लक्षात काही येत नव्हतं . पुन्हा ती म्हणाली , ” सर मी छ .संभाजीनगरला राहते . त्यावेळी मलाही हसू आलं मी हसत हसत म्हणालो , ” रत्नमाला गोविंदराव हंबर्डे आहेस तू . बरोबर आहे ना.”ती तिच्या नवऱ्यास सोबत होती. दोघंही हसले. त्यांच्यासोबत बालाजी उद्धवराव सातपुते पोलीस कॉन्स्टेबल हाही आला होता. या माझ्या विद्यार्थी आणि विद्यार्थीनीनी माझा सपत्नीक शाल , सुंदर फुलांची माला , पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. हा सत्कार माझ्या विद्यार्थाने केलेला माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. हा क्षण मी जीवनात कधीच विसरणार नाही.

निता जाधव , मीना हंबर्डे, रत्नमाला हंबर्डे , बालाजी सातपुते व जावईबापू देशमुख यांना माझं स्वकथन ” आठवणींचं गाठोडं ” देवून त्यांचा सत्कार केलो.
थोडसं राग थोडंस प्रेमाने त्या सांगत होत्या तुमी आमच्याकडे का येत नाहीत. आता छ. संभाजीनगरला आलात तर आमच्याकडे याच असं अवतान देवून त्या माझा निरोप घेवून मार्गस्थ झाल्या .

 

राठोड मोतीराम रूपसिंग
“गोमती सावली ” काळेश्वरनगर,
विष्णुपूरी, नांदेड -६
९९२२६५२४०७ .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *