नोकरी करणाऱ्या स्त्रीला घर व नोकरी सांभाळताना नाकी नऊ येतात. अर्थात तारेवरची कसरत करावी लागते.स्त्री नोकरी करण्यासाठी किंवा अर्थार्जन करण्यासाठी आटोकाठ प्रयत्न करते. कुटुंबाच्या सुख- दु:खाचा, राहणी मानाचा भविष्याचा विचार करून ती वागत असते. ती किती ही शिकली, कमावू लागली, किंवा तिला कोणताही अधिकार प्राप्त झाला तरी तिचं लक्ष आपल्या संसारात असते. घार हिंडते आकाशी। चित्त तिचे पिल्लापासी।।आधुनिक काळात होत गेलेले बदल समाज सुधारणा यातून स्त्रियांचा विकास होत आहे, पूर्वीच्या काळी स्त्री ही चूल आणि मूल यामध्येच गुरफटून गेलेली होती,
एकत्रित कुटुंब पद्धती असल्या मुळे नणंद, भावजय, दीर, सासरे, सासू सर्वांनाच घेऊन तिला चालावे लागत असे. त्यामुळे नेहमीच महिलांना दुय्यम दर्जाची वागणूक दिली जात होती. पती हा कितीही व्यसनी ,दुराचारी असला तरी पती परमेश्वर म्हणून वटपौर्णिमेला वटवृक्षाला फेऱ्या मारून प्रार्थना करावी लागते. हाच पती जन्मोजन्मी मिळू दे म्हणून त्याच्या नावावर कुंकू, जोडवे, मंगळसूत्र ठेवावे लागते, धर्मानुसार आचरण करावे लागते. स्त्रीच्या ठायी त्रिगुणात्मक स्तोत्राचा संगम आहे. असे म्हणतात भक्ती, युक्ती व शक्ती अशी त्रिसूत्री तिच्याजवळ असते. नोकरी करते वेळेस अनेक समस्यांना तिला तोंड द्यावे लागत आहे. नोकरी करीत असताना सहकार्याच्या, वरिष्ठांच्या, वाईट नजरेला कधी कधी तोंड देण्याची वेळ येते. मोलकरीण, कामगार, शेतमजूर, ऑफिस मधील महिलांना काही पुरुषांकडून थोड्या वेगळ्या नजरेने पाहिले जाते.
त्यामुळे त्याच्यावर सुद्धा मात करून आज महिला नोकरी करीत आहेत. बऱ्याच महिला मोठमोठ्या पदावर विराजमान झालेल्या आहेत. त्यामुळे काही पुरुषांना त्यांच्या हाताखाली काम करणे. कमीपणाचे वाटत आहे. हे कटू सत्य आहे. त्यामुळे असहकार करून कामाची टोलवाटोलटवी केली जाते.
आजही महिलांना पूर्णपणे स्वातंत्र्य नाही, ग्रामीण भागामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांचे अधिकार पती स्वत :वापरत असतात हे काही अंशी योग्य नाही .कारण त्या अबला नसून सबला आहेत, त्यासाठी त्यांना पूर्णपणे स्वातंत्र्य द्यावे.शिकलेली मुलगी, सून म्हणून घरात आल्यानंतर ती नोकरी करते वेळेस तिचं स्वातंत्र्य तिला असू द्यावे. जाण्या येण्यासाठी कमी-जास्त वेळ लागतो. त्यामुळे शंका न घेता वास्तविकता जाणून घ्यावी आज पर्यंत आपण जे शिक्षण शिकवलं त्याचा फायदा करून घेण्यासाठी तुम्ही महिलांना सहकार्य करा.घरातील कामे सर्वसाधारण सगळे कर्तव्य बजावून महिला नोकरी करतात. हे म्हणावी तेवढी सोपी गोष्ट नाही. महिला जर माहेरी गेली असल्यास एक ते दोन दिवस पुरुषांना घर सांभाळता सांभाळता नाकी नऊ येतात ही वास्तविकता आहे.
सुशिक्षित महिला आपल्या शिक्षणाचा वापर आज अर्थार्जनासाठी करत आहेत .त्यामुळे तिला व्यक्ती स्वातंत्र्य देणे अतिशय महत्त्वाचे आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, आदर्श राजमाता जिजाऊ भोसले ,पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, पंडिता रमाबाई रमाबाई रानडे ,ताराबाई शिंदे
,महाराणी ताराबाई या सर्व निर्भिड महिला होत्या .त्यामुळे समाज परिवर्तन झालेले आहे. सुनीता विल्यम्स, कल्पना चावला ,किरण बेदी, सानिया मिर्झा,कॅप्टन राधिका मेनन या महिला धाडसी निर्णय घेऊन आपल्या जीवनात बदल करून घेतले. त्यामुळे हे येथे नमूद करावे वाटते, आज महिला सर्व क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत त्यांना आता समज आलेली आहे. घरदार सांभाळून सुद्धा अर्थार्जन करून कुटुंब सुखी करीत आहेत. त्यामुळे पुरुषी अहंकार सोडून त्यांना मदत करणे. त्यांना समजून घेणे. त्यांच्या इच्छा आकांक्षाला आकार देणे,घेणे या गोष्टी आज अतिशय महत्त्वाच्या आहेत, मुलांचा अभ्यास, बाजारहाट, गृहस्वच्छता बाल संगोपन घरातील उष्टी, खरकटी काढणे।.धुणं धुणे आल्या गेल्यांचा मानपान ठेवणे ही सोपी गोष्ट नाही, त्यामुळे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपण आज अनेक कर्तृत्वान महिलांचा अभ्यास केला आहे, क्रिकेटमध्ये सुद्धा महिलांनी चांगली इमेज तयार केली आहे ,त्या कोणत्याही खेळामध्ये आता पाठीमागे राहिल्या नाहीत राजकारणा बद्दल बोलायचं असेल तर पंतप्रधान,
राष्ट्रपती, मुख्यमंत्री, राज्यपाल पदापर्यंत विराजमान झालेल्या आहेत, म्हणून स्त्री- पुरुष समानता असणे काळाची गरज आहे. ऑलिंपिक स्पर्धेमध्ये सुद्धा कर्णम मल्लेश्वरीने कांस्य पदक जिंकलेले आहेत हे विसरता कामा नये. म्हणून सर्व पुरुषांनी महिलांना साथ द्यावी,
गैरसमजुतीतून अनेक गोष्टी घडतात, त्याची शहानिशा करावी
.महिला या अबला नसून त्या सबला आहेत हे लक्षात असू द्यावे. निसर्गातून लिंग भेद आहे. पण पुरुष आणि महिला म्हणून परंतु दोघांनाही बौद्धिक क्षमता एकापेक्षा एक जास्त आहेत. त्यासाठी महिला या कोमल आहेत पण कमकुवत नाहीत, हे मला येथे आवर्जून सांगावे वाटते, त्यासाठी सर्वच पुरुषांनी महिलांना सहकार्याच्या अपेक्षेने पहावे, व आपल्या घरी आई ,बहीण, मुलगी आहे हे समजून वागल्यास महिला सक्षमीकरण काही काळातच पूर्ण होईल,त्याची वाट पाहण्यासाठी आपल्याला दुसरीकडे कुठे जावे लागणार नाही ,सुरुवात मात्र स्वतःपासून करावी व महिलांना तिचा सन्मान मिळवून द्यावे ही अपेक्षा…
*प्रा. बरसमवाड विठ्ठल गणपत*
अध्यक्ष: विठमाऊली प्रतिष्ठान खैरकावाडी मुखेड