फुलवळ (धोंडीबा बोरगावे )
कंधार च्या मन्याड खोऱ्यात बहुगुणी फुल बिब्ब्याची तोडणी करून त्यातील गोडंबी फोडून बाजूला काढून त्याची बाजारात विक्री करून त्यावर
पोटाची खळगी भरण्यासाठी अजूनही भोई समाजातील महिलांना जिवघेणा बिब्बा फोडण्याचा उद्योग करावा लागतोय. आणि याच बहुगुणी बिब्ब्याच्या गोडंबी विक्रीतून अनेकांचा संसारगाडाही चालतो..
बिब्बा फोडणाऱ्या या महिला कंधार तालुक्यातील फुलवळ सह घोडज, बाचोटी, नवरंगपुरा, धर्मापूरी, पांगरा, बामणी, मंगलसांगवी या गावात गेले कित्येक वर्षांपासून बिब्बे फोडण्याचं काम करत आहेत. त्यांचा हा व्यवसाय घरगुती असला तरी त्यातूनच या महिलांना रोजगार मिळतो. पण बिब्ब्यातून निघणाऱ्या हाणीकारक तेलामुळे शरीरावर असंख्य जखमा होतात. महिलांचे चेहरे विद्रुप होतात. महिलांसाठी हे त्रासदायक असून तरुण मुलींच्या चेहऱ्यावर होणारे परिणाम त्यांच्या भविष्यावरही हानिकारक होत असतात.
गोडंबी हे नाव कानावर पडलं तरी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. बिब्या पासून तयार होणारी गोडंबी हे विशेषत: हिवाळ्यात सुका मेवा म्हणून वापरली जाते. बिब्या पासून गोडंबी वेगळी करण्याचे काम अत्यंत जिकरीचं असतं. बिब्बा फोडत असताना त्यातून अंगावर उडणाऱ्या हाणीकारक तेलामुळे अनेक महिलांना जखमा होतात. आज शेतीच्या तंत्रज्ञानाचा वापर होतो , दुसरीकडे या महिलांना बिब्बे फोडण्याचं काम करून उदरनिर्वाह करावा लागतोय. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये या गोडंबीला मोठी मागणी आहे. हे बिब्बे फोडल्यानंतर मिळणाऱ्या गोडंबीची ८०० ते १००० रुपये किलो दराने गावोगावी फिरून विक्री केली जाते. मात्र बिब्बे फोडणाऱ्या या महिलांच्या हातात सरासरी दीडशे ते दोनशे रुपये मजुरी येते. गोडंबीला वेगळं केल्यानतंर उरलेल्या टरफलातून तेल काढलं जातं. हे तेल मानवी त्वचेसाठी हानिकारक असलं तरी ऑईलपेंट निर्मितीसाठी वापरलं जातं.
सुका मेव्यामधील महत्त्वाचा घटक असलेली गोडंबी बिब्या पासून तयार होते. विशेषत: हिवाळ्यात ही गोडंबी शक्तिवर्धक मेवा म्हणून वापरल्या जाते. बिब्यापासून गोडंबी वेगळी करण्याचे काम अत्यंत जिकरीचं असून हे काम करणाऱ्या महिलांना कायम स्वरूपी चेहरा विद्रूप आयुष्य जगावं लागत असत. बिब्बा फोडत असताना त्यातून उडणाऱ्या तेलामुळे या महिलांच्या शरीरावर अनेक जखमा होऊन सौंदर्याला मोठी बाधा निर्माण होते. या बिब्बा फोडण्यासाठी अजूनतरी ग्रामीण भागात एकही यांत्रिक साधन उपलब्ध नसल्यानं पारंपारिक पद्धतीनंच महिलांना हे काम करावं लागत
मोठे व्यापारी बिब्यांची खरेदी करून भोई समाजातील महिलांना बिब्बा फोडण्यासाठी देतात त्यातून महिलांना अत्यल्प मजुरी मिळते. त्यावर त्यांचा दैनंदिन उदरनिर्वाह चालतो. या महिलांच्या आरोग्यासाठी आजपर्यंत कुणीही प्रयत्न न केल्यानं अनेक महिलांचं आयुष्य बिब्यासारखं काळवंडलेलं अनेक ठिकाणी पाहायला मिळते. अशा कामगार महिलांच्या भावनांचा कधी कोणीतरी विचार करेल का..? असा प्रश्न निर्माण झाला आहे.