व्यंकटेश्वरा पब्लिक स्कूल, पूर्णा रोड नांदेड व ग्यान विकास इंग्लिश स्कूल, शिवनगर नांदेडचा नृत्याविष्कार 2024 हा वार्षिक स्नेहसंमेलानाचा कार्यक्रम कुसुम सभागृह, नांदेड येथे अतिशय उत्साहात व जोशपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक(महात्मा फुले हायस्कूल) अँड. एल. बी. इंगळे तर प्रमुख पाहुणे म्हणून हृदयविकार तज्ञ डॉ. श्रीवल्लभ कार्लेकर (लाइफ केअर हॉस्पिटल), डॉ. गोपाळ चव्हाण (रेनबो हॉस्पिटल) यांच्यासह संस्थेचे अध्यक्ष श्री. नामदेव कार्लेकर, सचिव श्रीमती. आय. एन. कार्लेकर, शाळेचे प्राचार्य श्री. विरभद्र विभूते आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सर्व मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. त्यानंतर शाळेच्या चिमुकल्यांनी स्वागत गीत सादर केले व सर्व मान्यवरांचा शाळेच्या वतीने यथोचीत सन्मान करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल व प्रमाणपत्र देण्यात आले, तसेच विज्ञान शिक्षक धनंजय गायकवाड व गणित शिक्षिका रुचिरा बेटकर यांनीही प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
तद्नंतर प्राचार्य श्री. विरभद्र विभुते यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेमध्ये शाळेचा वार्षिक अहवाल सादर केला. ज्यामध्ये शाळेने वर्षभर राबवलेल्या विविध उपक्रमाची माहिती पालक व मान्यवरांना दिली.
तसेच श्री. विभुते यांनी आपल्या अहवालामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांना पहिल्याच वर्षी मिळालेल्या यशाचा उल्लेख केला. त्यामध्ये पहिल्याच वर्षी बारा विद्यार्थ्यानी ऑलिंपिक मध्ये मिळवलेले गोल्ड मेडल, तसेच विविध नृत्यस्पर्धेमध्ये व्यंकटेश्वराच्या विद्यार्थ्यांनी द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवत आपली गुणवंत सिद्ध केली. विद्यार्थ्यांच्या अथक परिश्रमाने, शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनाने व पालकांच्या सहकार्यामुळे शाळेची वाटचाली यशस्वीपणे होत असून पालकांनी शाळेवर ठेवलेला विश्वास व्यवस्थापन मंडळ व शिक्षकवृंद पात्र ठरवत आहेत असेही श्री.विभुते म्हणाले.
संस्थेचे अध्यक्ष श्री. नामदेव कार्लेकर यांनी आपल्या मनोगतात सर्व यशस्वी विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक व पालकांचे अभिनंदन केले. तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी संस्थेच्या वतीने लागणारी सर्व मदत करून येत्या काळात शाळेमध्ये अधिकाधिक सोयीसुविधा, उत्कृष्ट शैक्षणिक साहित्य व अनुभवी तज्ञ शिक्षक उपलब्ध करून देत विद्यार्थ्यांना नवनवीन संधी उपलब्ध करून देऊ असे सांगितले.
उपस्थित मान्यवर व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. एल. बी. इंगळे यांनी शाळेने मिळवलेले यश व शाळेत राबवत असलेल्या विविध उपक्रमाचे कौतुक करत पालकांनी आपल्या पाल्यास योग्य ठिकाणी दाखल केल्याचे सांगत येत्या काळात व्यंकटेश्वरा पब्लिक स्कूल व ग्यान विकास इंग्लिश स्कूल या दोन्ही शाळा नांदेड शहरातील दर्जेदार शिक्षण देणाऱ्या शाळांपैकी एक असेल असे सांगितले.
कार्यक्रमाच्या द्वितीय सत्रांमध्ये नृत्याविष्कार 2024 सादर करण्यात आला. त्यामध्ये शाळेच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आपला कलाविष्कार सादर केला. यामध्ये गणेश वंदना, शेतकरी गीत, देवीचा गोंधळ आदींनी सुरू झालेला कार्यक्रम अधिकाधिक बहरत गेला.
विद्यार्थ्यांमार्फत सादर केलेला सोशल मीडियाच्या अधिकधिक वापरावर आधारित म्युझिकल ड्रामा व महाराष्ट्र लोकगीतावर आधारीत नृत्य हा स्नेहसंमेलन कार्यक्रमाचा मुख्य आकर्षणबिंदू ठरला. शेवटी सर्व विद्यार्थ्यांचा सामूहिक नृत्य व त्यामध्ये सहभागी झालेले शिक्षक यामुळे कार्यक्रमाला अधिकच रंजकता आली.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्यान विकासचे प्राचार्य जगदीश मोरे व व्यंकटेश्वराच्या उपप्राचार्या रुचिरा बेटकर यांनी तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन भाग्यश्री नमले यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य विरभद्र विभूते, प्राचार्य जगदीश मोरे, उपप्राचार्या रुचिरा बेटकर यांच्यासह भाग्यश्री नमले, अंजूषा कपाळे, जान्हवी गायकवाड, धनंजय गायकवाड ,अनिता काळे, रेखा नरवाडे, शुभांगी वाघमारे, वंदना कोलते , माधव सूर्यकार व सतीश कांबळे आदीनी परिश्रम घेतले