कुणी, घर देता का? घर?
तूफानातुन वाचून आलेल्या या खगाना कुणी घर देत का? घर?
दरी-डोंगरातून हिंडत आलेल्या या द्विजाला कुणी, घर देता का? घर? जळके, मळके पंख खुरडत खुरडत उडत आहे, पंख मिटून पडण्यासाठी, कुणी घर देता का रे? घर? अशी व्यथा तुम्ही कुठे ना कुठे ऐकलीच,वाचली असेलच… अशीच काहीशी व्यथा आम्हा पक्ष्यांची तुमच्या मुळे होत आहे. लहानपणी सर्वांनाच वाटायचं…मी पक्षी झालो असतो तर किती बरं झालं असतं!
….बरोबर ना! मी पक्षी होऊन भुर्र्कन उडून कुठे ही गेलो असतो. काही ही खाल्लो असतो…असंच बरंच काही वाटायचं…
तुमच्या लहानपणी तुम्ही आम्हाला पाहिलेला काळ वेगळा होता आणि आत्ता तुमची मुले, नातवंड आम्हाला पाहत असलेला काळ हा वेगळा आणि विचित्र आहे. हो विचित्रच, फार दयनीय अवस्था आमच्या पशू- पक्षींची झाली आहे. तुमच्या बदलत्या काळातील संस्कृतीमुळे, तुमच्या खाण्यापिण्यांच्या सवयीमुळे, तुमच्या नियमित दैनंदिन राहणीमानांमुळे आमच्यावर फार बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे. तुम्हाला असं वाटायचं ना की तुम्ही पक्षी झाला असता तर, आता आम्हालाही असं वाटते की, खरंच तुम्ही पक्षी झाला असतात तर तुम्हाला ही कळलं असतं की आम्हाला काय काय भोगावं लागत आहे…
सुमारे शंभर प्रजातींतील पक्षी मित्र हे उन्हाळ्यात आपल्या भारतात येतात.अर्थात ते काही सुट्या लागल्या म्हणून किंवा प्रेक्षणीय स्थळे पाहायला नाही; तर त्यांच्या मूळ रहिवासाच्या जागी त्या कालावधीत असलेल्या थंडीपासून वाचण्यासाठी आणि अन्नाच्या शोधात ते पक्षी पंखात पुरेशी ताकद आणि योग्य परिस्थितीचा अंदाज घेत उत्तुंग पर्वत, बर्फाळ डोंगर, नद्या, सरोवरे, अथांग सागर पार करीत भारतात येतात.असा हजारो मैलांचा प्रवास करून वातावरणातील बदलांच्या अनेक संकटांना पार करून ते आपल्याकडे येतात. अश्या परिस्थितीत केलेला प्रवास किंवा केलेलें स्थलांतर हे खरोखर एक आश्चर्य आहे.
त्यातील दरवर्षी स्थलांतर करणारे लाखों पक्षी काही ऊर्जानिर्मिती आणि मोबाईल टॉवर प्रकल्पांमुळे मृत्युमुखी पडतात.
स्थलांतर काळातली आमची इथली रहिवासाची ठिकाणे ही नष्ट होत आहेत. पक्ष्यांचे हे स्थलांतर व स्थलांतर करणारे पक्षी मानवाच्या उर्जेच्या वाढत्या गरजेमुळे धोक्यात येत असल्याचे सर्वांच्या लक्षात येतं असले तरी त्यांचा वापर कमी होत नाही.
ठराविक काळानंतर शिल्लक राहिलेले पक्षी परत आपल्या मायदेशी जातात. स्थलांतर करण्याच्या आधी आम्ही पक्षी येथिल वातावरणातील बद्दलांचा अचूक वेध घेऊन स्थलांतर होतो आणि आपापली प्रजाती टिकवण्यासाठी अलौकीक अशी धडपड ही करतो.
स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांना समुद्र किनाऱ्यावरील तेलखाणी, पवनचक्क्या, विजेच्या तारा, कारखाने असे मानवनिर्मित अडथळे घातक ठरतातच; पण याशिवाय आमची शिकार मोठ्या प्रमाणात होते. तसेच वादळे, वणवे, वाढत्या इमारतींमुळे आमचा निवारा आणि अन्न मिळण्याची ठिकाणे नष्ट होत आहेत.
इतर वेळी शहरात उपलब्ध पाणी साठ्यांवर आम्ही पशू-पक्षी आपली तहान भागवत असतो. शारीरिक थंडावा देखील शोधत असतो. सिमेंटच्या जंगलात झाडांची संख्या ही त्या तुलनेने कमी होत आहे. त्यातच नुकतीच पानगळ सुरू झाल्याने झाडे उघडी बोडकी दिसत आहेत. त्यामुळे पुरेशी सावलीही आम्हाला उपलब्ध होत नाही. या अश्या सिमेंट, डांबरी रस्त्यांमुळे उन्हाचे चटके अधिक जाणवत आहेत. त्यामुळे आम्हाला मरगळ येत आहे किंवा उष्माघाताने आम्ही खाली पडत आहोत. अश्या परिस्थितीत तुम्ही त्वरित महापालिकेचे प्राणिसंग्रहालय, पशुवैद्यकीय रुग्णालय अथवा जवळपास सर्पमित्र असल्यास त्यांच्याकडे सोपवावे.
आपल्या घराच्या आसपास थंडाव्याच्या शोधात येणाऱ्या पशू-पक्ष्यांना हकलवू नका. गच्चीवर, बाल्कनीत आमच्यासाठी
थंडगार पाणी वारंवार उपलब्ध करून द्यावे, ताजे खाद्य द्यावे.
खाद्य व पाण्यासाठी प्लॅस्टिकच्या भांड्यांचा वापर करणं टाळावं.
लोखंडी पिंजर्यात अथवा लोखंडी साखळ्यांनी पशू- पक्षींना ठेवू किंवा बांधू नये. शहरात, घराजवळ व परिसरात पशू-पक्ष्यांसाठी पाणवठे तयार करावेत. कृत्रिम घरट्यांची सोय करावी, निदान तुमच्या मुळे आम्हाला त्रास होणार नाही अशी काळजी घ्यावी… पुढच्या पिढीला आम्ही पक्षी फक्त चित्रात बघायला लागू नयेत, प्रत्यक्षातही बघता यावेत असे वाटत असेल तर ध्वनी, पाणी, हवेचे प्रदूषण करताना याचे भान ठेवावे.
अशा विविध अडचणींमुळे आमचे जीवन आणि अनेक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.
माझ्यासह अनेक पशू-पक्ष्यांना वाढत्या उष्णतेच्या झळा पोहचत आहेत. उष्माघाताने आमचा बळी जाण्याची भीती दिवसांदिवस वाढत आहे, आमच्या मदतीसाठी प्रत्येकाने आता खारीचा वाटा
उचलला पाहिजे. तुम्ही सोशल मीडियाचा खुप वापर करता ना? मग, सोशल मीडियावरही आम्हाला वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करावी. पशू-पक्ष्यांसाठी तुम्ही सर्वांनी केलेल्या अश्या छोट्याशा उपाय योजनांमधून उष्माघातापासून आम्ही नक्कीच वाचू शकतो आणि आम्ही आमच्या पुन्हा घरी स्थलांतर होऊ शकतो.
रूचिरा बेटकर,नांदेड.
9970774211