मुखेड : पर्यावरणाचा एकूणच समतोल ढासळल्यामुळे,वृक्षतोड ,जंगलतोड , हवेतील वाढते प्रदूषण, दूषित पाणी, जल प्रदूषण, प्लास्टिकचा,रासायनिक खतांचा अतिवापर इत्यादी कारणाने जमिनीचे तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. या वाढत्या तापमानामुळे विनाशाची घटीका जवळ येत आहे. याचे गांभीर्य आपण वेळीच घेतले पाहिजे.अन्यथा पृथ्वीचा विनाश अटळ आहे.असे चिंतनशील विचार प्रा. डॉ. श्याम पाटील यांनी मांडले.
येथील शाहीर आण्णाभाऊ साठे महाविद्यालयाच्या युवकांचा ध्यास ग्राम शहर विकास या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष वार्षिक शिबिरातील दुपारच्या सत्रात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. केशव पाटील होते तर प्रा. एम. एस. सगरोळे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना डॉ. श्याम पाटील म्हणाले की,जमिनीचे तापमान वाढत गेले तर एक दिवस हिमालयातील बर्फ वितळेल. त्याचे पाणी समुद्रात येईल आणि समुद्राच्या पाण्याची पातळी वाढत वाढत जाईल. अशावेळी समुद्राच्या काठावर असणारी शहरे, महानगरे उध्वस्त होतील. वेळेची यावर आपण बंधन घातले नाही तर एक दिवस या पृथ्वीचा विनाश अटळ आहे. म्हणून आपण प्रदूषण होईल असे वाहने वापरणे टाळावे. झाडे लावा झाडे जगवा. पाणी आडवा पाणी जिरवा. हे मूलमंत्र प्रत्यक्षात प्रत्येक भारतीयांनी दैनंदिन जीवनात वास्तवात उतरविले पाहिजे. असेही ते म्हणाले.
प्रा डॉ केशव पाटील यांनी झाडे लावण्याची आणि ती जपवण्याची शपथ विद्यार्थ्यांना दिली. व ही शपथ कृतीत उतरावी असे सांगितले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नारायण गवळे तर आभार राहुल पवार यांनी मांडले. कार्यक्रमास विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.