संत तुकाराम महाराजांनी वारकरी धर्मावर कळस चढवला. असे त्यांच्या शिष्या संत बहिणाबाईनी म्हटले आहे. खरोखर ते योग्यच आहे. कीर्तनाच्या माध्यमातून ज्ञानदान देण्याचे कार्य करून समाज जागृत केला. अभंग निर्मिती करीत त्यांनी जगभरात ज्ञानदीप लावण्या साठी अडगळीत पडलेल्या समाजाला वर काढून ज्ञानामृत पाजण्यासाठी ते पुढे आले. म्हणून समाज परिवर्तन झाले आहे. झोपलेल्या समाजाला जागा करण्याचे महान कार्य त्यांनी केले.
त्यांचे अभंग हे वैज्ञानिक सत्यावर आधारित आहेत. *वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे* असे म्हणून निसर्गाचे संतुलन करण्यास ते सांगतात. हजारो वर्षांपासून ज्या समाजाला ज्ञानापासून वंचित ठेवण्यात आले होते; ते ज्ञान त्यांनी लोकांपर्यंत पोहोचण्याचा जणू विडाच उचलला होता. माणसाच्या वर्तनात आणि त्यांच्या वृत्तीत बदल हा कीर्तनातून केला. वारकरी धर्माची पताका त्यांनी जगभर फिरवली. तुकोबांनी एवढे मोठे तत्त्वज्ञान निर्माण केले, की त्यांना प्रेरणा कुठून मिळाली असेल त्यांचे उत्तरही त्यांनी स्वतः दिले आहे.
जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा आज स्मृतिदिन आहे. जगभरात तुकाराम बीज किंवा बीजोत्सव म्हणून साजरा केला जातो.त्या निमित्ताने आपण ही माहिती घेत आहोत. जो भक्त आपल्यातील अहंकाररुपी गोष्टीचा पूर्ण त्याग करतो. षड्रिपू पासून दूर राहतो.
तेव्हाच परमेश्वर त्या भक्ताला दर्शन देतो. म्हणून भक्ती ही अशी करा की प्रत्यक्ष देव तुम्हाला भेटला पाहिजे. धर्म मार्तंडाच्या अन्यायाविरुद्ध उभे राहून समाजाला शहाणे करणारे ते एक महान संत होते.
*आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने*, असे सांगून समाजातील अंधश्रद्धा, वाईट चालीरीती, रूढी परंपरा मोडून काढले. बहुजन समाजाला बोलण्याचा, शिक्षण घेण्याचा अधिकार त्या काळात नव्हता, आपल्या विद्वतेच्या बळावर त्यांनी पंडित रामेश्वर भट्टासारख्या व्यक्तींना सुद्धा सडेतोड उत्तर देऊन नि:शब्द केले.समाज जागा करून योग्य दिशा दाखवण्याचे काम त्यांनी केले.
आज तुकाराम महाराजांच्या विचाराची खरोखरच समाजाला गरज आहे.
जगभरामध्ये तुकाराम महाराजांना जो आदर आहे तो कशामुळे तर त्यांच्या प्रतिभेमुळे आहे ,त्यांच्या संघर्षशील प्रवृत्तीमुळे त्यांचा आज सर्वत्र मानसन्मान आहे. तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात *भीत नाही आता आपल्या मरणा* अशी त्यांची निडर वृत्ती होती. त्यांच्या अभंगांनी जगाला वेड लावलेले आहे. त्यांचे काव्य सर्वांना स्फूर्ती देणारे आहे
.कठीण परिस्थितीत कोणताही माणूस त्यांच्या अभंगाचे वाचन केल्यानंतर समाधानी होतो. त्याची मनोवृत्ती शांत होते. फिनिक्स पक्षी जसे राखेतून आकाशात उंच भरारी घेतो; तसे तुकोबाचे जीवन संघर्ष रंजल्या गांजल्यापासून आहे की, *रात्र दिन आम्हा युद्धाचा प्रसंग* आहे. म्हणून
मानवी जीवनातील समाधान, सुख सध्याला निघून चालले आहे. आज माणूस समाधान हरून बसला आहे. फक्त संतांचे विचार ऐकून चालत नाहीत. संत साहित्य वाचून समाधान होत नाही. तर त्यानुसार आचरण केले तर खरोखरच आपल्याला सुख समाधान मिळेल. संत तुकाराम महाराजांनी आपल्या जीवनामध्ये लोकांना हेच ओरडून सांगितले आहे.
वाईट रूढी, परंपरा विरुद्ध अतिशय परखड शब्दात त्यांनी समाजावर कोरडे ओढले आहेत आणि त्यांना भक्तिमार्गाकडे घेऊन गेले आहेत.
संत तुकाराम महाराज यांच्या अगोदर त्यांच्या आठ ते नऊ पिढ्या विठ्ठलाच्या भक्तीत न्हावून निघालेल्या होत्या. विश्वंभर बाबा पासून ही परंपरा चालत आली होती. पंढरपूर नंतर महाराष्ट्रातील पहिले विठ्ठल मंदिर फक्त देहू या ठिकाणीच उभे केले होते.
त्यातील विठ्ठलाची मूर्ती ही स्वयंभू आहे. त्यांनी साध्या सोप्या भाषेत भक्तिमार्ग सांगून करोडो भक्तांचे मने जिंकली. त्यामुळे भक्तांनी त्यांना जगद्गुरु ही सन्मानाची उपाधी दिली त्याकरिता ते वारकरी संप्रदायाचे कळस झाले. सर्वांना शिक्षण देते वेळेस एका शरीराचे तोंड, हात,कान, नाक, पाय हे अवयव आहेत. तसे आपण सर्वजण एकच आहोत, त्यामुळे कोणीही कोणाबद्दल भेदाभेद करू नये अशी एकात्मतेची शिकवण महाराजांच्या अभंगामधून आपल्याला मिळते म्हणून ते *भेदाभेद भ्रम अमंगळ* असे म्हणतात.
आज वाड्या वस्त्यावर सर्वत्र तुकाराम महाराजांचे अभंग घेऊन संत ,महंत कीर्तन करतात या कीर्तनातून समाज प्रबोधन करण्याचे काम केले जाते. त्याचे सर्व श्रेय तुकाराम महाराजांना जाते. संत तुकाराम महाराजांचे आज हजारो मंदिरे गावोगावी बांधली गेलेली आहेत. देहू पासून पंढरपूर पर्यंत अखंड ज्ञानोबा- तुकोबाचा गजर करत वारकरी पायी दिंडी सोहळा काढतात .सर्वधर्म भावाची शिकवण यातून मिळते, म्हणून तुकाराम महाराज हे आपले सर्वांचे प्रेरणास्त्रोत आहेत. रंजल्या गांजलेल्याचे दुःख ते विठ्ठलाला सांगतात. आपल्या प्रत्येक अभंगातून समाजाला सुधारण्याचे दृष्टांत देतात. तुकाराम महाराज हे खरोखरच अंधश्रद्धा ,रूढी परंपरेचे कर्दनकाळ होते .बहुजन समाजाला प्रकाशाचे झाड कोणी लावून दिले असेल तर ते म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज होय .
तुकाराम महाराजांची वाणी हे अमृतवाणी होती. ढोंगी दुराचारी, व्याभिचारी लोकांना त्यांनी पैजरांने मारावेत अशी उदाहरणे दिली आहेत.नाठाळ लोकांना सुद्धा आम्ही वठणीवर आणू असे त्यांनी सांगितले. खरोखरच आपण तुकाराम महाराजांचा बीजोत्सव साजरा करत असाल तर तुकाराम महाराजांचे वर्तन, आचरण आचरणात आणण्याची गरज आहे. ढोंगी लोकांना मदत करू नका. माणसं ओळखायला शिका. अंगाला राख लावून कोणी साधू म्हणत असेल तर त्यांना थारा देऊ नका. अनेक संधी साधू तयार झालेले आहेत हे ओळखा. फुकट कोणाला देणग्या देऊ नका. त्यांनी चारशे वर्षांपूर्वी आपणाला सांगितले आहे. तरच आपल्याला खरा बीजोत्सव साजरा केला. याचे समाधान मिळेल.
नाहीतर ढोंगी लोकांना तुम्ही किती खर्च केले तरी ते समाज सुधारणार नाहीत. उलट समाज बिघडण्याचा काम करतील. कसलाही संपत्तीचा त्यांना मोह नव्हता. आपल्या व्यापारातून उरलेल्या पैशातून चरितार्थ चालवत होते, दुष्काळ पडले त्यावेळेस त्यांनी घरातील संपूर्ण साहित्य लोकांना वाटून टाकले. हा किती मनाचा मोठेपणा होता .स्वतःही आपण कृती करून बघा .
आपल्याला जमेल काय ? म्हणून संत कोणाला म्हणावे? खरोखरच हे आपला कळाले तर ,जो समाजाचा हित साधतो त्याला संत म्हणावे स्वतःच्या नावावर आश्रम तयार करून वाईट अविचारी लोकांना एकत्रित करून गुंडवृत्तीने वागवून जमीन जुमला एकत्रित करणाऱ्या व्यक्तीला संत म्हणू नये. जो देशाची एकात्मता साधतो .देश आणि व्यक्ती यांचा समन्वय साधून अध्यात्माच्या दरवाजातून सर्वांना एकत्रित आणतो त्याला संत म्हणावे. जिथे कीर्तन झाले तिथं अन्न सेवन करू नये. यांना आपण संत म्हणतो. म्हणून ही संतांची भूमी आहे .बाह्य शुद्धीपेक्षा मनाची शुद्धता झाली की देव भेटतो .
आजच्या बुवा बापूंनी कीर्तनकारांनी कर्मकांडाच्या नादी लागून वाईट मार्गाला लागले. नुसती भगवी वस्त्रे. माळा ,खडावा जटा, घालून किंवा दाढी वाढवून कोणी साधु किंवा संत ठरत नाही ,मग खरा साधू कोण? ज्याचे अंत:करण शुद्ध आहे. स्वतःबद्दल प्रचंड आत्मविश्वास अशा व्यक्तीना संत म्हणावे. साधुत्वाच्या तोऱ्यात चुकीने वागू नये . दाभिंकपणा जगाला दाखवू नये. *दया करणे जे पुत्राशी। तेच दास आणि दासी* ज्यांच्या मनात कोणत्याही जीवाबद्दल कसलाच मत्सर नाही ,जी व्यक्ती सर्वांगी निर्मळ असून तिचे चित्त हे गंगाजळाप्रमाणे निर्मळ आहे. अशा व्यक्तीच्या गळ्यात तुळशीच्या माळा आहेत. त्यांचे वागणे अतिशय चांगले नियतीला धरून आहे. संसार करून त्यांनी लोकांना उपदेश केला आहे.
अशा व्यक्तीलाच भक्त जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात. म्हणून सर्वांनी त्यांच्या आचरणाुसार वर्तन करावे, तरच तुकाराम बीज साजरा केल्याचे समाधान मिळेल.
शब्दांकन-
*-प्रा. विठ्ठल बरसमवाड*
*अध्यक्ष: विठूमाऊली प्रतिष्ठान खैरकावाडी. ता. मुखेड*