(कंधार: विश्वंभर बसवंते )
तालुक्यातील मानसपुरी येथील बालाजी शिंदे यांच्या घरी वास्तुशांतीच्या कार्यक्रमानिमित्त मंडप टाकण्यात आला होता, हा मंडप काढतेवेळी मंडपाचा लोखंडी पाईप विद्युत वाहिनीला स्पर्श होऊन मजूर उत्तम दिगंबर भूसकटे वय २४ वर्षे राहणार शेकापूर यांचा अपघाती मृत्यू झाला तर दुसरा मजूर दिलीप राठोड राहणार बिजेवाडी हा गंभीर जखमी झाल्याची घटना मानसपुरी गावात घडल्याने मानसपुरी, शेकापूर व बिजेवाडी तांड्यावर शोककळा पसरली आहे.
घटनेचे वृत्त असे की, मौजे मानसपुरी तालुका कंधार येथील रहिवासी बालाजी शिंदे यांच्या घराचे वास्तुशांती कार्यक्रमाचे दि. ६ एप्रिल २०२४ रोज शनिवारी आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमानिमित्त घरासमोर मंडप (टेन्ट)टाकण्यात आला होता. संपूर्ण कार्यक्रम आटोपल्यानंतर दि. ७ एप्रिल २०२४ रोज रविवारी सकाळी ११:०० वाजता चे सुमारास टेन्ट काढण्यासाठी गेलेले उत्तम दिगंबर भुसकटे, दिलीप राठोड, दाजीबा राठोड, हे टेन्ट काढत असताना उत्तम भूसकटे व दिलीप राठोड यांच्या हातातील टेन्टचा लोखंडी पाईप विद्युत वाहिनीला स्पर्श झाल्यामुळे उत्तम भूसकटे हे विद्युत शॉक लागून मयत झाले तर दिलीप राठोड व दाजीबा राठोड हे जखमी झाले असून, दिलीप राठोड हे गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे.
दिलीप राठोड व दाजीबा राठोड यांना कंधारच्या ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालय नांदेड येथे पाठवण्यात आले आहे.
मयत उत्तम दिगंबर भोसकटे यांच्या पश्चात ७ महिन्याचा १ मुलगा, पत्नी, आई – वडील, १ भाऊ व २ बहिणी असा मोठा परिवार आहे.
मयताचे वडील दिगंबर माणिक भूसकटे रा.शेकापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कंधार पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात येऊन पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्या आदेशान्वये पोहेकॉ. शिवाजी सानप यांच्याकडे दिला आहे.