उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे – निवडणूक सामान्य निरीक्षक निरंजन कुमार

निवडणूक निरीक्षकांनी घेतली निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची बैठक

उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे – निवडणूक सामान्य निरीक्षक निरंजन कुमार

• भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांबाबत मार्गदर्शन
• दैनंदिन खर्चाची अचूक नोंद ठेवणे बंधनकारक

लातूर, दि. २३ : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांचे आणि आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करून निवडणूक पारदर्शक, शांततामय आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी सहकार्य करावे. प्रत्येक बाबीसाठी विहित कालावधीत पूर्वपरवानगी घेवूनच प्रचार मोहीम राबवावी, असे निवडणूक सामान्य निरीक्षक निरंजन कुमार यांनी सांगितले. तसेच उमेदवारांकडून होणारा प्रत्येक खर्च नोंदवहीत नमूद करावा, असे निवडणूक खर्च निरीक्षक संजीब बॅनर्जी यांनी सांगितले.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांबाबत माहिती देण्यासाठी लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, सहायक जिल्हाधिकारी नमन गोयल, प्रभारी अपर जिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भारत कदम, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी नितीन वाघमारे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी, निवडणूक संनियंत्रण समितीचे नोडल अधिकारी तथा मुख्य लेखा व वित्त अधिकारी आप्पासाहेब चाटे, आदर्श आचारसंहिता कक्षाचे सहायक नोडल अधिकारी जावेद शेख यावेळी उपस्थित होते.

प्रचारामध्ये कोणत्याही उमेदवाराने भडकावू, तेढ निर्माण करणारी भाषणे करू नयेत. तसेच व्यक्तिगत टीका टाळावी. प्रचारासाठी वाहने आणि इतर बाबींची पूर्वपरवानगी घ्यावी. प्रचाराचा कालावधी, ध्वनिक्षेपक वापराची वेळ सर्वांनी पाळावी. सर्व उमेदवारांनी मतदान प्रतिनिधी आणि मतमोजणी प्रतिनिधी यांची नियुक्ती करून त्यांना आवश्यक प्रशिक्षण द्यावे. मतदानादिवशी मतदान सुरु होण्यापूर्वी ९० मिनिटे अगोदर मॉक पोल घेण्यात येणार आहे. यावेळी सर्व उमेदवारांनी आपले प्रतिनिधी उपस्थित ठेवावेत. तसेच मतदान यंत्रांचे दुसरे सरमिसळीकरण झाल्यावर मतदान केंद्रनिहाय मतदान यंत्रांची यादी सर्व उमेदवारांना देण्यात येणार असून त्याप्रमाणे मतदान यंत्राची मतदान केंद्रावर पडताळणी करावी. गृह मतदानात गोपनीयतेचा भंग होणार नाही, याची दक्षता घेतली जाणार असून उमेवरांनीही यामध्ये सहकार्य करावे, असे निवडणूक सामान्य निरीक्षक निरंजन कुमार म्हणाले.

प्रत्येक निवडणूक खर्चाची नोंद बंधनकारक : निवडणूक खर्च निरीक्षक

प्रचारासाठी होणाऱ्या प्रत्येक खर्चाची नोंद उमेदवाराने आपल्या निवडणूक खर्च नोंदवहीत करणे बंधनकारक आहे. या नोंदी घेताना त्या विहित नमुन्यात आणि विहित पद्धतीने घ्याव्यात. निवडणूक खर्चासाठी सर्व उमेदवारांचे स्वतंत्र बँक खाते आवश्यक आहे. तसेच एखाद्या उमेदवाराच्या प्रचारासाठी स्टार प्रचारकाची सभा आयोजित केल्यास त्या अनुषंगाने प्रशासकीय पातळीवरून करण्यात येणाऱ्या सुरक्षा विषयक, तसेच इतर बाबींवरील खर्चाचा समावेशही संबंधित उमेदवाराच्या खर्चात केला जाणार आहे, असे संजीब बॅनर्जी यांनी सांगितले. तसेच ज्या उमेदवारांवर गुन्हे दाखल असल्यास त्यांनी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार इलेक्ट्रॉनिक आणि मुद्रित माध्यमातून तीन वेळा त्याची प्रसिद्धी करावी, असे त्यांनी सांगितले.

भयमुक्त, पारदर्शक निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज : जिल्हाधिकारी

लातूर लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जिल्हा निवडणूक यंत्रणेने सर्व आवश्यक सज्जता केली असून भयमुक्त, निःपक्षपाती आणि पारदर्शक वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी यंत्रणा सज्ज आहे. तसेच आदर्श आचारसंहितेचा भंग होवू नये, यासाठी विविध पथके तैनात करण्यात आली आहेत. तसेच याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व उमेदवारांनी आदर्श आचारसंहिता आणि प्रचाराच्या अनुषंगाने विविध नियमांचे पालन करून निवडणूक यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सांगितले. तसेच मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

समाज माध्यमांवर निगराणीसाठी स्वतंत्र कक्ष : जिल्हा पोलीस अधीक्षक

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून जिल्ह्यात समाज माध्यमांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. यासाठी सायबर पोलीस स्टेशन अंतर्गत स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला असून आदर्श आचारसंहितेचा भंग करणाऱ्या, व्यक्तिगत बदनामी करणाऱ्या, सामाजिक तेथ निर्माण करणाऱ्या, भडकवू मजकूर असलेल्या पोस्ट टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत दहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अशा प्रकरणात सखोल तपास करून इतरही संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही केली जाणार असल्याचे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी सांगितले.

आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्यास गुन्हा दाखल होणार : मुख्य कार्यकारी अधिकारी

आदर्श आचारसंहिता कालावधीत काय करावे आणि काय करू नये, याबाबत भारत निवडणूक आयोगाने सुस्पष्ट सूचना दिल्या आहेत. यासोबतच प्रचारासाठी आवश्यक बाबींची पूर्वपरवानगी घेण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्यानुसार कार्यवाही करून सर्वांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे. या काळात कोणीही आदर्श आचारसंहितेचा भंग केल्यास त्याच्यावर थेट आदर्श आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश आहेत. त्यामुळे सर्वांनी आपापल्या निवडणूक प्रतिनिधींना, कार्यकर्त्यांना आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याच्या सूचना द्याव्यात, असे आदर्श आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी सांगितले.

 

 

टपाली मतदानाप्रसंगी विशेष खबरदारी घेणार : उपजिल्हा निवडणूक अधिकारी

भारत निवडणूक आयोगाने ८५ वर्षापेक्षा अधिक वय असलेले, तसेच ४० टक्केपेक्षा अधिक दिव्यांगत्व असलेल्या मतदारांना गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यासाठी प्राप्त अर्जानुसार नियोजन करण्यात आले असून दोन वेळा गृह भेट देवून ही मतदान प्रक्रिया पूर्ण करून घेतली जाणार आहे. यामध्ये गोपनीयतेचा भंग होवू नये, यासाठी विशेष खबरदारी घेतली जाणार आहे. अत्यावश्यक सेवा, निवडणूक कर्तव्यावर असलेले अधिकारी, सैनिक मतदार यांच्या मतदानासाठी करण्यात आलेल्या पूर्वतयारीची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भारत कदम यांनी यावेळी दिली. तसेच प्रचारासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक ऑडीओ-व्हिडीओ जाहिरातीचे जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीकडून पूर्वप्रमाणीकरण करून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

निवडणूक खर्च विषयक तरतुदीनुसार नोंदवही लिहावी

उमेदवाराच्या प्रचारासाठी होणाऱ्या प्रत्येक खर्चाची नोंद उमेदवाराच्या निवडणूक खर्च नोंदवहीत होणे बंधनकारक आहे. विविध प्रचार साहित्य, सभा, वाहने, जेवण, नाश्ता यासारख्या प्रत्येक बाबीचा खर्च यामध्ये समाविष्ट असून त्याची दैनंदिन नोंद घ्यावी, असे निवडणूक खर्च संनियंत्रण समितीचे नोडल अधिकारी आप्पासाहेब चाटे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *