लातूर लोकसभा मतदारसंघात २८ उमेदवार निवडणूक लढविणार; तीन जणांनी नामनिर्देशनपत्रे मागे घेतली * चिन्ह वाटपाची प्रक्रिया पूर्ण

 

लातूर,: लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत तीन जणांनी नामनिर्देशनपत्रे मागे घेतली. त्यामुळे लातूर लोकसभा मतदारसंघात आता २८ उमेदवार निवडणूक लढविणार आहेत. या उमेदवारांना चिन्ह वाटपाची प्रक्रिया पूर्ण झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, लातूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे, प्रभारी अपर जिल्हाधिकारी तथा उप जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भारत कदम, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी नितीन वाघमारे, उपविभागीय अधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे, स्वीपचे नोडल अधिकारी रामदास कोकरे यावेळी उपस्थित होते.

लातूर लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी ३१ व्यक्तींची नामनिर्देशनपत्रे वैध ठरली होती. यापैकी ३ व्यक्तींनी नामनिर्देशनपत्रे मागे घेतली असून २८ उमेदवार निवडणूक लढविणार आहेत. या अनुषंगाने निवडणूक यंत्रणा सज्ज आहे. मतदान यंत्र, मतदान पथके आदी बाबींची पूर्वतयारी करण्यात आली आहे. मतदान प्रक्रिया शांततामय, पारदर्शक आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी भरारी पथके, स्थिर निगराणी पथके यासह २८ पथकांच्या माध्यमातून कामकाज सुरु असल्याचे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे म्हणाल्या. तसेच आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी करण्यात कारवाईबाबतही त्यांनी माहिती दिली.

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील विविध असोसिएशन्सनी यामध्ये पुढाकार घेत मतदान करणाऱ्या नागरिकांना विविध सवलती देण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच युवा मतदार, दिव्यांग मतदार आणि महिला मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. दिव्यांग मतदारांना भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच मतदान केंद्रावर किमान मूलभूत सुविधा पुरविण्यात येतील, असे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी सांगितले.

आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या कार्यवाहीबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी माहिती दिली.

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने १९७७ पासूनच्या माहितीचा समावेश असलेली पूर्वपीठिका जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने तयार करण्यात आली आहे. या पूर्वपीठिकेचे प्रकाशन यावेळी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे, प्रभारी अपर जिल्हाधिकारी तथा उप जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भारत कदम, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांच्या हस्ते करण्यात आले.

निवडणूक लढविणारे उमेदवार, पक्ष, कंसात निवडणूक चिन्ह-

आल्टे विश्वनाथ महादेव- बहुजन समाज पार्टी (हत्ती), डॉ. काळगे शिवाजी बंडाप्पा- इंडियन नॅशनल काँग्रेस (हात), सुधाकर तुकाराम श्रंगारे- भारतीय जनता पार्टी (कमळ), अतिथी खंडेराव सूर्यवंशी- स्वराज्य शक्ती सेना पार्टी (हिरा), अॅड. कसबेकर श्रीधर लिंबाजी- राष्ट्रीय संत संदेश पार्टी (फलंदाज), कामंत मच्छिंद्र गुणवंतराव- बहुजन भारत पार्टी(शिट्टी), नरसिंगराव उदगीरकर- वंचित बहुजन आघाडी (गॅस सिलेंडर), प्रवीण माधव जोहारे- स्वराज्य सेना-महाराष्ट्र (गॅस शेगडी), बालाजी तुकाराम गायकवाड- भारत पीपल्स सेना (शिवण यंत्र), भारत हरिबा ननवरे- पीपल्स पार्टी ऑफ इंडिया- डेमोक्रॅटिक (फळांची टोपली), भिकाजी गंगाराम जाधव- क्रांतिकारी जय हिंद सेना (ऑटो रिक्षा), लखन राजाराम कांबळे- राष्ट्रीय बहुजन पार्टी (ट्रक), विकास कोंडीबा शिंदे- महा-राष्ट्र विकास आघाडी (टी.व्ही. रिमोट), शंकर हरी तडाखे- बळीराजा पार्टी (ऊस शेतकरी), श्रीकांत बाबुराव होवाळ- बहुजन मुक्ती पार्टी (खाट), अभंग गंगाराम सूर्यवंशी- अपक्ष (बादली), अमोल मालू हनमंते- अपक्ष (जहाज), उमेश अंबादास कांबळे- अपक्ष (बासरी), दत्तू सोपान नरसिंगे- अपक्ष (दूरदर्शन), दीपक केदार- अपक्ष (बॅट), पपीता रावसाहेब रणदिवे- अपक्ष (कॅमेरा), पंकज गोपाळराव वाखरडकर- अपक्ष (रोड रोलर), पंचशील विक्रम कांबळे- अपक्ष (ईस्त्री), अॅड. प्रदीप एस. चिंचोलीकर- अपक्ष (तुतारी), बनसोडे रघुनाथ वाघोजी- अपक्ष (प्रेशर कुकर), बालाजी शेषराव बनसोडे- अपक्ष (किटली), मुकेश गोविंदराव घोडके- अपक्ष (शाळेचे दप्तर), सुधाकर तुकाराम सूर्यवंशी- अपक्ष (अंगठी).
*****

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *