कंधार/प्रतिनिधी
श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधार व यात्रा महोत्सव समितीच्यावतीने शिवजयंती, महात्मा बसवेश्वर जयंती व श्री व्दादशभुजादेवी यात्रा निमित्त बहाद्दरपुरा ता. कंधार येथे चार दिवस विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.दि.९ में रोज गुरुवारी सकाळी आठ वाजता श्री व्दादशभुजादेवीचा अभिषेक सोहळा पार पडणार आहे. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा बसवेश्वर यांच्या अश्वारूढ प्रतिमेची भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे.
याप्रसंगी कंधार मधील छत्रपती शिवाजी महाराज,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वीरशिरोमणी महाराणा प्रतापसिंह, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. या शोभायात्रेचा समारोप शांतीघाट, बहाद्दरपुरा येथे होणार आहे.
दि.१० मे शुक्रवारी संस्थेअंतर्गत सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये विज्ञान प्रदर्शन, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, मिरवणुकीतील झाकी स्पर्धा पार पडणार आहे.दि.११ में रोजी शनिवारी सकाळी ९:०० ते ११:०० व सायंकाळी चार ते सहा वाजेपर्यंत दोन सत्रात दिवंगत भाई झोटींगराव पा.मुंडे पैलवान आखाड्यात भव्य कुस्त्यांची दंगल रंगणार आहे. ग्रामीण लेखिका तथा चंद्रप्रभावतीबाई धोंडगे यांच्या हस्ते कुस्ती विजेत्याला प्रथम बक्षीस २१ हजाराचे देण्यात येणार आहे.शेवटची कुस्ती २१ हजार रुपयांची होणार आहे. तसेच महिला कुस्त्यांची दंगलही रंगणार आहे. या स्पर्धेत विविध ठिकाणच्या महिला कुस्तीपटू सहभागी होणार आहेत.दि.१२ मे रविवारी रोजी सायंकाळी सात वाजता कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माळाकोळीचे शाहीर प्रेमकुमार मस्के, उद्घाटक सुप्रसिद्ध गायिका अनुराधा नांदेडकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात येणार आहे.चार दिवस चालणाऱ्या या विविध कार्यक्रमांचा पंचक्रोशीतील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा.डॉ. पुरुषोत्तम धोंडगे यांनी केले आहे.