नांदेड – वर्षभरातील दोन्ही शैक्षणिक सत्रांत शाळांमधून अध्ययन अध्यापनासह विविध शालेय तथा सहशालेय उपक्रम राबविण्यात येत असतात. या शैक्षणिक वर्षातील दिपावलीच्या सुट्टीत सर्व विद्यार्थ्यांसाठी खाऊ हा उपक्रम राबविण्यात आला होता. आता दोन मे पासून शाळांना उन्हाळी सुट्ट्या सुरू झाल्या आहेत. या कालावधीत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रक्रियेत खंड पडतो. तो पडू नये आणि स्वयं अध्ययनाची सवय लागावी या उद्देशाने जवळा देशमुख येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी एक शक्कल लढवली आहे.
उष्णतेची तीव्रता लक्षात घेऊन व वेळेचे योग्य नियोजन करून गल्ली तेथे आवश्यकतेनुसार शाळेचे मुख्याध्यापक प्रज्ञाधर ढवळे, विषय शिक्षक संतोष अंबुलगेकर, उमाकांत बेंबडे, सहशिक्षक संतोष घटकार यांच्या पुढाकाराने छोट्या छोट्या फळ्यांचीच निर्मिती केली आहे. या उपक्रमास शालेय विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळत आहे.
उन्हाळ्याच्या सुट्टीत बैठे मनोरंजनात्मक व मैदानी खेळांबरोबरच गाव खेड्यात सर्वच वयोगटातील विद्यार्थ्यांनी फळ्याचा वापर करणे अपेक्षित आहे. याद्वारे वाचन, लेखन, गणिती क्रिया, जोडाक्षरयुक्त शब्दांचा सराव, अर्थपूर्ण इंग्रजी शब्द तयार करणे, विविध प्रकारच्या नावांची स्पेलिंग जोडून शब्द रचना तसेच छोटी छोटी इंग्रजी वाक्यरचना तयार करणे, ज्ञानरचनावादी पाढे तयार करणे आदी कौशल्ये विकसित होणार आहेत.
यासाठी जवळा देशमुख येथील गल्लोगल्लीत झाडाखाली सावलीत जिथे बसून स्वयं अध्ययन करता येतील अशा पद्धतीने फळे तयार करण्यात आले आहेत. लहान विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी साक्षी गोडबोले, वैभवी शिखरे, कृष्णा शिखरे, लक्ष्मण शिखरे, सिद्धांत गोडबोले, अजिंक्य गोडबोले, तिरुपती शिखरे आदी विद्यार्थी परिश्रम घेत आहेत. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून
‘गल्ली तेथे फळा अवघे गावच झाले शाळा’ असे बोलले जात आहे.