नांदेड : मोंढ्यामध्ये हमाली व हॉटेलमध्ये वेटर चे काम करता करता शासकीय नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या अशोक गंगासागरे या युवकाची महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामध्ये शिपाई पदासाठी निवड झाल्यानंतर हालाखीची परिस्थिती असल्यामुळे प्रशिक्षण फी व पीटी किट व इतर साहित्यासाठी आर्थिक मदत करण्याचे आवाहन धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर यांनी समाज माध्यमातून केले असता अर्ध्या तासात पुरेसा निधी जमा झाल्यामुळे समाज माध्यमाचा चांगला उपयोग सुद्धा होतो हे सिद्ध झाले आहे.
अशोक गंगासागरे या तरुणाने कष्टाची कामे करत अनेक वर्ष अभ्यास सुरूच ठेवला. पोलीस ,सैन्य तथा विविध भरतीसाठी त्याचे प्रयत्न चालू होते. शेवटी त्याला वयाच्या ३४ व्या वर्षी यश मिळाले. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामध्ये वर्णी लागली.राज्य राखीव पोलीस बल गट प्रशिक्षण केंद्र, नानवीज, जि. पुणे येथे ४५ दिवसाच्या प्रशिक्षणासाठी बोलविण्यात आले. सिक्युरिटी डिपॉझिट रक्कम ₹ १५०००, पीटी किट्स साठी ₹१४५० भरणे आवश्यक होते. परंतु घरची हलाखीची परिस्थिती असल्यामुळे रोख रक्कम भरणे शक्य नव्हते. अनेकांना त्यांनी उधारी वर पैसे मागितले पण कोणी दिले नाही.
शेवटी ज्येष्ठ समाजसेवक दिलीप ठाकूर यांच्याशी त्यांनी संपर्क साधला. सर्व परिस्थितीची खात्री केल्यानंतर दिलीप ठाकूर यांनी सोशल मीडियामध्ये गंगासागरे यांना मदत करण्याचे आवाहन केले. अर्ध्या तासातच सतीश सुगनचंदजी शर्मा,डॉ. सुनील चिन्नावार,ॲड.दिलीप ठाकूर,गजानन जोशी,डॉ. राजेंद्र मुंदडा,डॉ. दि.बा.जोशी, अशोक पाटील धनेगावकर,सरदार गिरवरसिंघ छ. संभाजीनगर,योगेशकुमार जायसवाल,रवी कडगे,माधव संतोबा बोडके,सिद्राम सुर्यभान दाडगे,शशिकांत देशपांडे बा-हाळी,भानुदास काब्दे,श्रीधर विष्णुपुरीकर,डॉ. यशवंत चव्हाण,महादेवी मठपती,डॉ. अजय सिंह ठाकुर पूर्णा,डॉ. शिवाजी शिंदे इस्लापूर,डॉ.गंगाधर हेसे वसमत, रत्नाकर जोशी,संजय रणवीरकर अर्जापूर,अशोक गंजेवार,अविनाश गाढे,श्रीपाद देशपांडे लातूर यांनी मदतीचा हात पुढे केला. दिलीप ठाकूर यांनी एकत्रित झालेली रक्कम अशोक गंगासागरे यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी सेवानिवृत्त मंडळ अधिकारी पंडितराव माळोदे, तानाजी सोळंके, मंगलाबाई माळोदे,अजयसिंह परमार हे उपस्थित होते. आर्थिक परिस्थितीमुळे मिळालेली नोकरी सोडावी लागते की काय या विवंचनेत असलेल्या गंगासागरेला तातडीने सहकार्य मिळाल्यामुळे गहिवरून आले. त्यांनी दिलीप ठाकूर व सहकार्य करणाऱ्या सर्व दानशूर नागरिकांचे आभार मानले. भविष्यात प्रामाणिकपणे सेवा करून राष्ट्राचे व नांदेडचे नाव उज्वल करीन असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सोशल मीडियाचे अनेक दुष्परिणाम समोर येत असताना सदहेतूने प्रयत्न केल्यास चांगला उपयोग होऊ शकतो याचा यावेळी प्रत्यय आला.