भारत देश हा असा देश आहे ईथे वैराला उत्तर मैत्री आणि प्रेम आहे. माणूस नावाचा प्राणी विभिन्न जाती-धर्मात जन्माला आलेल्या ‘माणसाचा’ मानव म्हणून संवेदनशील व हृदयस्पर्शी जीवन जगणे हा त्याचा मूलाधार आहे. वेळोवेळी संपूर्ण जगाला अहिंसा, करुणा व मैत्रीचा संदेश देणारी बुद्धांची ती स्थितप्रज्ञ मूर्ती सांगत असते. पण तोफगोळय़ांचा मारा करून क्षणार्धात त्या मूर्तीची नासधूस केली जाते.
मार्च २००१ मध्येच नव्हे तर अनेक वेळा बुद्धमूर्ती तोडण्यात आल्या.पण त्यानंतर काय घडलं नि आजला काय घडतयं, हे उभे जग पाहत आहे. द्वेषाने पेटलेला ‘माणूस’ नावाचा दहशतवाद अवघ्या जगासाठी धोक्याची घंटा ठरतो आहे. हा माणूस येत्या काळात काय विद्ध्वंस घडवेल, याचा काहीही नेम राहिलेला नाही. हा माणूस माणसाचा वैरी का झाला? एकमेकांच्या रक्ताची होळी खेळण्याइतपत तो हिंस्त्र व पशू का झाला? ‘माणूस’ नावाच्या जगातील सर्वात मोठय़ा धर्माला त्याचे उत्तर सापडत नाही वा त्याला ते समजून घेण्याची गरजही वाटत नसावी का?.
बुद्धत्वाची, प्रज्ञेची प्राप्ती जगातील कोणतीही व्यक्ती करू शकते का?. त्याला धर्म, भाषा, प्रांत व जातीचे कोणतेही बंधन आडवे येत नाही का?. मग, जगभर पसरलेल्या मानवी दहशतवादाचे मूळ कशात आहे? हा प्रश्न दररोज जगण्याची लढाई लढताना प्रत्येक माणसाला अस्वस्थ करतो आहे.
दिनदर्शिकेतील प्रत्येक तारीख नि वार, कोणता, कुठे नि काय रक्तपात घडवेल हे भविष्यवेत्ता सांगू शकणार नाही. ही भीषण परिस्थिती का व कोणामुळे निर्माण झाली असावी?
क्रौर्य आणि हिंसा हा पशूंचा धर्म आहे. विवेकी माणसाचा तो अधर्म होईल. तेव्हा क्रूर आणि हिंसक कर्म न करणे, हेच माणसाच्या सुखसमृद्धीचं मर्म आहे. सुज्ञ माणसाने दुष्टविचार व दृष्टप्रवृत्ती टाळावी, मानव धर्म पाळावा,भांडणतंटे व अशांतता यांना आळा घालावा. ते न कुणाच्याही हिताचे हे जाणावे. माणसाने माणसाला का आणावा कमीपणा? संपूर्ण विश्वात शांतता नांदण्यासाठी ‘मानवधर्म’आपणाला सदैव हीच शिकवण देतं राहते. त्यानंतरही दहशतवाद उफाळून येतोच.
माणसाने माणसांवर केलेल्या हल्ल्यात अनेक लोक मृत्युमुखी पडतात. मृतांना श्रद्धांजली आणि कँडलमार्च निघतो. काळा दिवस म्हणून बर्याच तारखांची नोंदही होते परंतु जग आणि माणूस कुठेच थांबत नाही. असं हे चक्र सुरू राहत आहे . भारतातील अनेक राज्यांत तसेच मुंबई, राजस्थान, दिल्ली, हैदराबाद या प्रमुख शहरांत दहशतवाद्यांनी घडवून आणलेला रक्तपात. बॉम्बस्फोट मालिकां किडय़ा-मुंग्यांप्रमाणे माणसं मारणे इतकी मानवी दहशत पसरली आहे. पशूहून हिंस्त्र झालेला माणूस एकमेकांच्या जीवावर उठला आहे. युद्ध हाच त्याला पर्याय वाटू लागला आहे. द्वेषाला उत्तर द्वेष, हेच त्याच्या डोक्यात भिनले आहे.
प्रत्येक माणसांतील मानवहित जपणारा आणि मानवधर्म हाच जगात सर्वश्रेष्ठ मानणारा बुद्धाचा शांतीचा ‘सन्मार्ग’ तो स्वीकारेल का?
अवघ्या जगाला शांती, प्रज्ञा आणि मैत्रीची शिकवण देणा-या तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या भारत देशात‘असहिष्णुते’ ने वातावरण गढूळ केलं आहे. नाना जातींचा, नाना धर्माचा, विविध भाषा बोलणारा भारत देश स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुतेच्या पायावर टिकून आहे. भारतीय संविधान हा पवित्र ग्रंथ आपणा सर्वाना देशधर्म सांगत आहे,‘मी कोणत्याही जात, धर्माचा असलो तरी ‘मी प्रथम भारतीय व अंतिमही भारतीय आहे’ हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. भारतात धर्म नि जातीच्या नावाने आपसात युद्ध घडवणे सहज सोपे हे ज्यांना ठाऊक आहे. ते माणसा-माणसांत आग लावून देण्याचे काम करत आहेत.
‘असहिष्णू’ या शब्दाभोवती सध्या देशाचे राजकारण नि समाजकारण फिरतं आहे. समाजवाद व धर्मनिरपेक्षतेची व्याख्या शोधण्याचा प्रयत्न स्वातंत्र्याच्या नंतर का होईना, सुरू झाला आहे. धर्मनिरपेक्षतेची व्याख्या जो-तो आपल्या परीने करत आहे. काहींना भारतीय राज्यघटनेमुळे मिळालेल्या संविधानात्मक पदाचाही आदर राखणेही अवघड जात आहे.
देशात ‘धर्मयुद्ध’ पेटण्यास या नेते मंडळी खतपाणी घालण्यात नाहीत का?‘असहिष्णुता ‘ म्हणजे काय रे भाऊ..! असा सवाल देशातील गरीब, कष्टक-यांना पडला आहे.
भारतीय संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर करून काही ‘वाचाळवीरांची’ फौज देशातील सामाजिक सलोखा बिघडवत आहेत. विविधतेत एकता सांगणारा नि ‘मानवधर्म’ जोपासणारा आपला भारत देश संपूर्ण जगासाठी आदर्श.
इथे विज्ञानवाद जवळ करणारा, अहिंसा, प्रज्ञा, मैत्री आणि करुणा हा युद्धापासून परावृत्त करणारा बुद्धांचा मार्ग आहे. प्रत्येकाने मानवधर्मातील परिवर्तनाचा रथ पुढे झाल्या म्हणून या रथाचे सारथ्य करावे,
जात, वंश, लिंग, भेदाच्या भिंती येथे कोसळून पडाव्यात. सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या भारतभूमीत आपसातील युद्धाची भाषा थांबावी. हा शांती व ममतेचा संदेश घेऊन जगात शांतता प्रस्थापित होण्यासाठी भारतात ‘शांतिदूत’निर्माण होण्याची गरज आहे.
रूचिरा शेषराव बेटकर,नांदेड
9970774211