महाराष्ट्रातील आजची धम्मचळवळ आणि आव्हाने

        बौद्ध धम्मात वैशाख पौर्णिमेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. या पौर्णिमेला अनेक महत्त्वपूर्ण घटना घडलेल्या आहेत. तथागत गौतम बुद्धाचा जन्म वैशाख पौर्णिमेला झाला आणि महापरिनिर्वाणही वैशाख पौर्णिमेलाच झाले.  तसेच राजकन्या यशोधरेचा जन्म आणि राजपुत्र सिद्धार्थाशी यशोधरेचा मंगलपरिणय म्हणजेच विवाह हा वैशाख पौर्णिमेलाच झाला. एवढेच नव्हे तर या पौर्णिमेला आणखी काही घटना घडल्या आहेत त्या म्हणजे सिद्धार्थ गौतमाची ज्ञानप्राप्ती, गया येथील बोधिवृक्षाचा जन्म,  कालुदायी नामक राजा शुद्धोधनाच्या अमत्याचाही जन्मदिवस हाच होय. तथागताचा सर्वांत प्रिय शिष्य म्हणून विश्वविख्यात झालेल्या आनंदचा जन्मही वैशाखी पौर्णिमेलाच झाला. याशिवाय सिद्धार्थ गौतमाचा सारथी छन्न, राजपुत्र सिद्धार्थचा प्रिय घोडा कन्थक, अजानीय गजराज हेदेखील याच दिवशी जन्माला आले. अशी या दिवसाची आणि पौर्णिमेची महती आहे. जगभरातील बौद्ध राष्ट्रांत आणि बौद्ध समुदायात बुद्ध जयंती मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. या जयंतीला महोत्सवाचे स्वरूप येते. विविध ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने ती साजरी केली जाते. हा महोत्सव अनेक देशांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण ठरलेला आहे. भारतातही मोठ्या उत्साहाने बुद्ध जयंती साजरी केली जाते. या निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. यात सर्व बौद्ध उपासक उपासिका बालक बालिका शुभ्र वस्त्र परिधान करून सहभागी होतात. बुद्ध विहारांतही मोठ्या प्रमाणावर बुद्ध जयंतीचे औचित्य साधून कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. 
         महाराष्ट्रात नागपूर मुक्कामी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५६ साली स्वतः  आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. हा सोहळा म्हणजे एक रक्तविहिन क्रांती होती. या क्रांतीने तत्कालीन अस्पृश्यांचे जीवनमान बदलले. त्यांच्या आयुष्यात अमुलाग्र परिवर्तन घडून आले. भारतात बौद्ध धम्म नसल्यासारखाच होता. धम्मदीक्षेद्वारे बाबासाहेबांनी भारतात बौद्ध धम्माचे पुनरूज्जीवन केले. इथल्या तमाम अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या महार जातीला बौद्ध धम्माच्या स्वाधीन केले. जे बाबासाहेबांसोबत होते ते दीक्षित झाले. पण घरी, गाव खेड्यात मोठ्या प्रमाणावर हा समाज होता, तोही धम्मदिक्षित व्हायला हवा होता. पण तसे झाले नाही. आज जसे वाटते तसे त्या काळापासूनच दरेकाला दरेकाने दीक्षा द्यायला हवी होती. आजही ही काळाची मागणी आहे. १४ आॅक्टोबर १९५६ रोजी सर्वच बौद्ध झाले, असे मानण्यात येते. पण हा भ्रम आहे. आज आपण आपल्या आजूबाजूला नेहमीच बौद्ध धम्मविरोधी घटना घडत असतांना पाहतो. ह्या कुणामुळे घडतात? तर जे स्वतःला केवळ बौद्ध म्हणवून घेतात त्यांच्यामुळेच. अशा घटना घडण्याचे प्रकार आणि त्यामागील कारणे वेगवेगळी असली तरी ते काही थांबले किंवा थांबवले जात नाही.  या धम्मविरोधी कारवाया, विरोधी आचरण थांबलेच पाहिजे किंवा थांबवले पाहिजे.‌ यासाठी दुसरा तिसरा कुणीही येणार नाही तर आपणच सहभागी होऊन पुढाकार घेतला पाहिजे. हे काम फारसे अवघड नाही. पांढरे कपडे घातले म्हणजे कुणी बौद्ध होत नाही. शुद्ध आचरण हीच बौद्धांची ओळख आहे.
    
         १९५६ नंतर बौद्ध धम्माच्या प्रचार आणि प्रसाराची जबाबदारी खऱ्या अर्थाने धर्मांतरित बौद्ध लोकांवर होती. जुन्या काळात ज्या पद्धतीने प्रचाराची चळवळ चालत होती, त्यावर हिंदू धर्माचा पगडा जास्त होता. आजही तो अनेक ठिकाणी पहावयास मिळतो. जगभरात धम्मचळवळीचे स्वरूप भिन्न भिन्न स्वरुपाचे असल्याचे आपल्याला पहावयास मिळते. बौद्ध धम्माच्या चालीरीती वेगळ्या आहेत. परंतु महाराष्ट्रात धम्म चळवळ धम्म परिषदांपुरतीच मर्यादित झाली आहे. बुद्ध विहारे बांधणे, त्यासाठी मूर्तीची खरेदी करणे, प्रतिष्ठापना करणे, वर्षावास साजरा करणे, जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करणे, सामुहिक विवाह मेळावे आयोजित करणे, श्रामणेर दीक्षेचे आणि इतर शिबिरांचेही आयोजन करणे, बुद्ध भीम गायनाचे भव्य कार्यक्रम आयोजित करणे, धम्मसहलींचेही आयोजन करणे असे काही धम्म परिषदांच्या जोडीला असणारे कार्यक्रम असतात. आयुष्यभरात होणारे धम्मविधी, धम्मसंस्कार हेही महत्त्वाचेच आहेत. मात्र या व्यतिरिक्तही बौद्ध धम्म प्रचार आणि प्रसाराची जबाबदारीही तितकीच महत्त्वाचीच आहे. ‘चलो धम्म की ओर’ किंवा ‘गाव तिथे बुद्ध विहार’ यांसारखे महत्त्वाचे अभियान वगळता महाराष्ट्रात समकाळासंदर्भाने एखादी सशक्त चळवळ उभी राहिलेली आपल्याला दिसत नाही. आज कुणी कुणाचे ऐकत नसले तरी शहर तसेच गाव खेड्यात घराघरांत जाऊन बौद्ध तत्त्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसारासाठी मोठ्या प्रमाणात श्रामणेर भंते आणि कायमस्वरूपी भिक्खू निर्माण होण्याची गरज आहे. यासाठी दीर्घकालीन आराखड्याचीही आवश्यकता आहे.
          भारतात विविध धम्मविषयक संघटनांच्या माध्यमातून धम्म चळवळी चालवल्या जातात. महाराष्ट्रातही भारतीय बौद्ध महासभा,  त्रिरत्न बौद्ध महासंघ, बौद्धजन अध्ययन संघ, स्वतंत्र समता सैनिक दल वगैरे संघटनांद्वारे बौद्ध धम्माच्या प्रचार आणि प्रसाराचे काम मोठ्या प्रमाणावर केले जाते. काही सेवाभावी संस्थाही हे काम मोठ्या नेटाने करताहेत. तसेच बौद्ध विहार समितीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. पुतळ्यांची उभारणी, धम्मदीक्षेचे कार्यक्रम, धम्मदेसना कार्यक्रम, शिबिरे, सामुहिक विवाह मेळावे, भव्य स्वरुपातील बुद्ध भीम गीत गायनाचे कार्यक्रम असे काही उपक्रम त्यात भर घालण्याचा प्रयत्न करतात. काही बचत गट, सहकारी बँकाही आता पुढे आल्या आहेत. विविध मार्गांनी धम्म चळवळीचे काम सुरू असताना काही मूलभूत अडसरांना दुर्लक्ष करून चालणार नाही. बौद्धांमधील अधिक उर्मटपणा आणि आक्रमकपणा हा मोठाच अडसर आहे. यांमुळे हिंसकता वाढली आहे. सुखलोलुपतेमुळे मोह, लोभ, माया, मत्सर, क्रोध, अहंकार हे दैनंदिन जीवनात सगळीकडे पसरतांना आपल्याला दिसतात. अहंकार तर सर्वांच्याच ठायी असल्याचे समजून येते. यांमुळे प्रचारासाठी अडथळे निर्माण होतात. हा प्रचार जन्माने बौद्ध असणाऱ्या लोकांसाठी आहे. त्यामुळे मानवातील सर्वच षडविकार नाहिसे झालेच पाहिजेत. बौद्धांसाठी तर अत्यंत निकडीची बाब आहे. त्यासाठी पंचशिलाबरोबरच अष्टशील, दसशीलही काटेकोरपणे पाळले पाहिजे. दररोज सकाळ संध्याकाळ ध्यानसाधना केली पाहिजे. बौद्धांच्या अंगी अत्यंत विनयशीलता, नम्रता, करुणा, दया, क्षमा, शांतीचा वास असला पाहिजे. शीलवान चारित्र्य हीच बौद्धांची खरी ओळख आहे.
            धम्म चळवळीच्या प्रचारासाठी व्यसनाधीनता हाही मोठाच अडसर असल्याचे सर्वत्र दिसतो. कोणत्याही भागात जा तिथल्या बकाल बौद्ध वस्त्यांमध्ये व्यसनाधीनता, अवैध धंदे, मारामारी, खून, दरोडे, चोऱ्यामाऱ्या या प्रकारांची जाणिव होते. हे सगळे जन्माने बौद्ध असणे त्याहीपेक्षा आचरणाने बौद्ध असणे अधिक आवश्यक आहे. बावीस प्रतिज्ञांना हरताळ फासल्याचे कार्य अशा ठिकाणांवर दृष्टीक्षेप टाकला की लक्षात येते. यातून गुंडांची निर्मिती होण्यापेक्षा श्रामणेरांची निर्मिती होणे अधिक श्रेयस्कर ठरते. गावखेड्यातही कमी जास्त प्रमाणात असे प्रकार पहायला मिळतात. ग्रामीण लोकांना व्यसनापासून दूर करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रबोधनाची गरज आहे. बाबासाहेबांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञा खोट्या करण्याची स्पर्धा ग्रामीण भागातही चाललेली असते. म्हणून मध्यंतरी काही गावांमध्ये बावीस प्रतिज्ञा प्रचार प्रसार अभियान राबवावे लागले होते. खऱ्या अर्थाने आजही या अभियानाची गरज आहे. या बावीस प्रतिज्ञांमध्ये वाढ करण्याची आवश्यकता असल्याचे निरिक्षण एका अभ्यासगटाने नोंदवले आहे. ही एक आवश्यकता असली तरी मूळात बावीस प्रतिज्ञांचे कठोर पालन होणे अत्यंत गरजेचे आहे. हाही धम्म चळवळीच्या प्रचाराचा भाग आहे. तेव्हा आपले आचरण आणि इतरांशी वर्तन कसे आहे, याचे लोक निरिक्षण करीत असतात. तुमच्या समाजातील वागण्या बोलण्यातून बौद्धत्वाची ओळख होते. स्वतःला बौद्ध म्हणवून घेणारे धम्मविरोधी कारवाया करु लागले तर इतरांवर काय प्रभाव पडणार? इतर जाती धर्मांतील लोकांना बौद्ध धम्माविषयी वैचारिक आकर्षण निर्माण व्हायला हवे असे आपले आचरण हवे.
          
                 पोटजात ही एक मोठीच समस्या आजच्या बौद्धांमध्ये आहे. पुर्वाश्रमीची दलित मानसिकता अजूनही मनामध्ये घर करून आहे. बौद्ध धम्मामध्ये कोणत्याही जाती किंवा पोटजाती नाहीत. परंतु महाराष्ट्रात माझ्या माहितीप्रमाणे सोमवंशी, आंधवन, लाडवन, तीळवन, अंगदकुळ, बावणे, घोडेखाजवे, विणकर, राईंदर वगैरे पोटजातींची काळी छाया या बौद्ध लोकांवर कायम उभी आहे. ती १९५६ नंतर आजपर्यंत दूर व्हायला हवी होती परंतु अकरामाशी, बारामाशीचा जो मिथ्याभिमान आपण बाळगून ठेवला आहे तो वाईटच आहे. ओळखीतून किंवा प्रेमप्रकरणातून बेटी व्यवहाराला मान्यता दिली जात आहे. काही कुटुंबे एकत्र येत पोटजातीला फाटा देत आहेत. ही चांगली आशादायी चित्र आहे. बौद्धांत असलेल्या या पोटजातींचा निचरा होण्यासाठी आपले मानसिक परिवर्तन होणे अत्यंत आवश्यक आहे. पसंती असेल तर मनात कोणतेही किंतु परंतु न ठेवता सरळ मंगल परिणयाचे आयोजन केले पाहिजे. छोट्या मोठ्या निवडणुकांतही पोटजातीचे राजकारण केले जाते. यामुळे विजय तिसऱ्याचाच  होतो. नुकसान आपलेच होते. धर्मांतराचे सोहळेही मोठ्या प्रमाणावर होत आहेत. बौद्ध धम्म स्विकारतांना इतर जातींच्या धर्मांतरावेळीही ही बाब पुढे येते. धम्म स्विकारलेल्या नवबौद्धांना असुरक्षित वाटायला लागतो. त्यांना वाटते की यांच्यातच पोटजाती आहेत. ते कसे आपल्याला जवळ करणार? या नवबौद्धांचीच एक नवी पोटजात तर तयार होणार नाही ना? ही भिती निर्माण होते. त्यामुळे धम्म प्रसारासाठी अडथळे निर्माण होतात. पोटजाती कायमस्वरुपी नष्ट होणे ही काळाची गरजच आहे.
              धम्मचळवळीच्या प्रसार आणि प्रसाराची खरी जबाबदारी भिक्खू संघाची आहे. पण भिक्खूंची निर्मिती मोठ्या संख्येने व्हायला हवी. मोठ्या प्रमाणावर श्रामणेर दीक्षा झाली पाहिजे. नांदेड तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्राचे कार्य वाखाणण्याजोगे आहे. अशी केंद्रे सर्वत्र निर्माण व्हायला हवी आहेत. कायमस्वरूपी भिक्खूंची संख्याही वाढली पाहिजे. व्यसनाधीनता, अवैध धंदे, देवदेवतांचे पूजन, व्रतवैकल्ये, अंधश्रद्धेची जोपासना, कंदोऱ्या,  दुराचार, पोटजातीची मानसिकता, हिंसेचे वर्तन अशा ज्या काही अडचणी आहेत त्यांचे निराकरण करण्यासाठी भिक्खू संघाची निर्मिती होण्याची गरज आहे. धर्मांतर करून बौद्ध झालेल्यांसाठी त्यांना आश्वस्त वाटले पाहिजे असे उपदेश भिक्खू संघाकडून होणे अपेक्षित आहे. ज्या संघटनांच्या माध्यमातून ज्या धम्म चळवळी चालवल्या जातात किंवा तसे त्या दावा करतात, त्यांनी हे काम मोठ्या प्रमाणावर हाती घेतले पाहिजे. परंपरेनुसार चालत आलेला पोटजातीसारखा प्रश्न जर निकाली निघू शकतो तर इतरही अडसर दूर होऊ शकतात. या संघटनांनी एकत्र येत दीर्घकालीन आराखड्याची निर्मिती करायला हवी. पण एकत्र येण्याचे आपल्याला अगदीच वावडे आहे. आजच्या गलिच्छ राजकारणाचे विपरीत परिणाम समाजावर होत असतात. परंतु कुठेतरी सुरुवात होणे गरजेचे आहे. धर्मांतराचे सोहळे होत राहतीलच; त्याकडे धर्मांतर नव्हे तर  मूल्यांतर म्हणून बघितले पाहिजे. बुद्ध जयंतीचे मोठमोठे सोहळे आयोजित करण्यापेक्षा धम्मचळवळी समोर निर्माण झालेली आणि होत असलेली आव्हाने सर्वांनीच एखाद्या योद्ध्याप्रमाणे मोडीत काढली तर शाश्वत विजयाची धम्मध्वज पताका प्रबुद्ध भारताच्या शिखरावर फडकल्याशिवाय राहणार नाही.
          – प्रज्ञाधर ढवळे, नांदेड.
         मो. ९८९०२४७९५३
            

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *