गेल्या पाच वर्षापासून रयत रुग्णालयात दररोज लायंसच्या डब्याच्या माध्यमातून रुग्णांच्या दुपारच्या जेवणाची सोय केल्याबद्दल लायन्स क्लब नांदेड सेंट्रल चे प्रोजेक्ट चेअरमन धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांचा रयत आरोग्य मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये डॉ. खुरसाळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी दिलीप ठाकूर यांनी रयत रुग्णालयाला रुपये पंचवीस हजाराची देणगी दिली.*
लायन्स क्लब नांदेड सेंट्रल तर्फे २०२० सालापासून दिलीप ठाकूर यांच्या संकल्पनेतून लायन्सचा डबा रयत रुग्णालयात अखंडितपणे सुरू आहे. परिवारातील सदस्यांच्या वाढदिवसानिमित्त, लग्नाच्या वाढदिवसानिमित्त अथवा परिवारातील प्रियजनांच्या स्मृतिदिनानिमित्त दानशूर नागरिकांच्या हस्ते दररोज डब्याचे रुग्णांना वाटप करण्यात येते. ज्या दिवशी कोणी अन्नदाता नसेल त्यादिवशी दिलीप ठाकूर यांच्यातर्फे जेवणाचे डबे वाटप करण्यात येतात.गेल्या तेरा वर्षात दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारातून भाऊचा डबा व लायन्सचा डबा द्वारे नऊ लाखापेक्षा जास्त जेवणाचे डबे वितरित करण्यात आलेले आहेत. याशिवाय वर्षभरात ८६ जगावेगळे उपक्रम राबवून दिलीप ठाकूर हे अखंड सेवा कार्यात तत्पर असतात. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन रयत आरोग्य मंडळातर्फे शाल पुष्पहार व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी सचिव डॉ. अर्जुन मापारे, कोषाध्यक्ष सुधीर चिंतावर, उपाध्यक्ष सुधाकर टाक व एम. आर. जाधव, रवी कडगे, व्यंकटेश भवर पाटील, नगरसेवक बापू गजभारे, हेमंत गीते, नरेंद्र पटवारी, रंगनाथ उंबरकर, बनारसीदास अग्रवाल, डॉ. शशी गायकवाड यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. रयत रुग्णालयात गरीब रुग्णांना माफक दरात योग्य उपचार करण्यात येत असल्यामुळे रुपये पंचवीस हजाराची देणगी दिलीप ठाकूर यांनी याप्रसंगी दिली. वार्षिक सर्वसाधारण सभेत बिनविरोध निवडून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे दिलीप ठाकूर यांनी अभिनंदन केले.