चैत्र पालवीचा नवोन्मेषी बहार – पांडुरंग कोकुलवार

आज आमचे मित्र श्री पांडुरंग कोकुलवार हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा थेरबन ता. भोकर जि. नांदेड येथून सेवानिवृत्त झाले आहेत. यानिमित्ताने त्यांच्या विविध क्षेत्रातील कार्याचा आढावा घेणारा लेख..

=============================

चैत्र पालवीचा नवोन्मेषी बहार – पांडुरंग कोकुलवार

————————————————————-

श्री पांडुरंग कोकुलवार यांची आणि माझी भेट सन २००३ सालातली. नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित कुठल्याशा शिक्षकांच्या प्रशिक्षणात ओळख झाली. आवाज खरबडा असतांनाही ते कवितागायन करीत होते. कुणीतरी म्हणालं की कशाला गातोय हा माणूस? मग दुसराच कोणीतरी म्हणाला, ‘आवाज नसतांनाही गाण्याचा प्रयत्न करतोय, ते महत्वाचं आहे.’ हे किती साधं वाक्य होतं ते! ते माझ्या मनातच रुतलं. आपल्या कामाशी प्रामाणिकपणा आणि प्रयत्नशील असणं ह्या दोन्ही बाबी परस्पर पूरक नसल्या तरी त्या एकत्र आल्या तर काय होईल? याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे पांडुरंग कोकुलवार. ही व्यक्ती हताश होऊन बसणारी नाही. सतत काही ना काही करणारी आणि जे जमत नाही त्यासाठी प्रयत्नशील राहणारी आहे. कामाबाबत, व्यवहाराबात तसेच आपल्या वैचारिकतेबाबतही ते स्वतःशी आणि इतरांशी सतत प्रामाणिक असणं त्यांचा स्वभाव गुणधर्म. त्यामुळं नवं काही करण्याची इच्छा त्यांच्या इभ्रतीला शोभूनच दिसते. सतत उपक्रमशीलता ही त्यांच्या शैक्षणिक आयुष्याचा मुख्य अलंकार. या माणसाने कधीही कुणाची फसवणूक केलेली नाही. म्हणजेच आपल्या विद्यार्थ्यांशी इतरांप्रमाणे प्रामाणिकच राहिले. आयुष्यामध्ये नेहमीच आनंदाची निर्मिती करणारा हा अवलिया आपल्या सेवेची तीस वर्षे येणारा कोणताही क्षण आनंदातच कसा जाईल किंवा एखाद्या कडवट क्षणाचे रुपांतर गोड गोड बोलण्याच्या संक्रांतसणात कसे होईल यासाठीही प्रामाणिकपणे ते प्रयत्नशील असायचे. आता सेवानिवृत्ती होत असली तरी पुढची नवनव्या आनंदाची नवी आवृत्ती असेल ह्यात काही शंका नाही.

एक कवी म्हणून त्यांची असणारी ओळख ही वेगळीच आहे. काय कविता, कसले ते कविसंमेलन आणि ऐकतंय कोण? असे म्हणणाऱ्यांच्या काळात आपल्या कवितेवर नेहमीच प्रेम करणारा आणि कशीही असली तरी आपण आपल्या कवितेवर प्रेम केले पाहिजे हे इतरांना शिकवणारा काव्यगुरुच! मी अनेकवेळा त्यांच्यासोबत कविसंमेलनात होतो. त्यांच्याकडे असणारा संयम वाखाणण्याजोगा आहे. तुलनेने मी अधिक असंयमी आहे. त्यामुळे हेही या कवीकडून शिकण्यासारखे आहे. अक्षरोदय साहित्य मंडळाचे ते संस्थापक सदस्य. यात कार्यरत असतांना त्यांची मंडळाप्रती असलेली प्रामाणिकता सतत अधोरेखित होत होती. आर्थिक सहकार्य करण्याबरोबरच ते मनोबल वाढवण्याचेही कार्य ते करायचे. त्यामुळे मंडळाच्या साहित्य सेवेची उंची वाढत राहिली. काही अपरिहार्य कारणास्तव काही कालावधीनंतर नव्या सप्तरंगी साहित्य मंडळाची निर्मिती झाली. ही निर्मिती करण्याचा मानसही त्यांचाच होता. साहित्याच्या प्रांतात आपल्या कवितेच्या अंगणात नवनिर्मितीचा प्रांत तयार करणारा हा कवी माझ्यासारख्या रागीट स्वभावाचे मनगट धरुन एकाच ठिकाणी जास्त वेळ बसवून ठेवण्याची किमया साधू शकतो, हे कुणालाही फारसे जमणार नाही. कारण नव्या ऋतूचे सगळ्यात आधी बारसे करणारा पांडुरंग कोकुलवार हा महाशय माझ्यापुरता एकमेवच आहे, असे मी मानतो.

 

कोकुलवार हे नाव एका कलासक्त माणसाचे ही नाव आहे. कलेच्या मातीत स्वतःला गाडून घेऊन आपल्यातील कलाबीजे उगवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणारेही ते नाव आहे. शिक्षकी पेशाला प्रामाणिक राहात त्यांनी भाता या शैक्षणिक समस्येवर आधारित लघुचित्रपटाची निर्मिती केली. ‘भाता’ या शॉर्टफिल्मचे ते निर्माते आणि पटकथेचे लेखकही आहेत. तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या नोंदीसाठी वापरावी अशी शैक्षणिक डायरी तयार करून मोफत वाटप केली. त्याचबरोबर ‘जामुंडा’, ‘योजना’, ‘पोटजात,’ ‘चीज’ या लघुचित्रपटात कलाकार म्हणून भूमिका केल्या आहेत.नांदेडमध्ये चित्रिकरण झालेल्या
‘राडा’ या चित्रपटात सहकलाकार भूमिका साकारली आहे.‌ ‘माझ्याबद्धल विचार करा ना!’ या चित्रपटात कलाकार म्हणून निवड झाली आहे. ‘त्यागमूर्ती’ या चित्रपटात कथालेखन व भूमिका असा त्यांचा सहभाग आहे. एवढेच नाही तर ‘लास्ट पेग’ चे कथानक त्यांनी लिहिले आहे. ‘पंचांग,’ ‘हेच माझं प्रेम’ या लघुचित्रपटातही त्यांनी काम केले आहे. या कलोपासनेबरोबरच काही नाटिकांचेही लेखन केले आहे. यात प्रामुख्याने मूलं शिकलीच पाहिजेत, हलवा पाळणा कन्येचा, ज्योती बनली ज्वाला, मंत्र स्वच्छतेचा, चला मतदान करु या, लेक वाचवा, मला आकाश गाठायचंय! यांचा समावेश होतो. या सर्व नाटिकांचे आकाशवाणी नांदेड येथून प्रसारण झाले आहे. अंतरीचे रान या कवितासंग्रहाच्या व मार्कंडेयाची भक्तीगीतांच्या लेखन व डीव्हीडी निर्मितीनंतरही ते स्वस्थ बसले नाहीत.

कवी म्हणून आपल्या स्वरचित कवितांचे सादरीकरण करण्यासाठी नांदेड, यवतमाळ, उमरखेड, ढाणकी, बेलखेड, अकोला,माहूर, मातुळ, धर्माबाद, देगलुर, नायगाव, कंधार, जवळा देशमुख, लोहा, खडकमांजरी, कुरुळा, हिंगोली, परभणी, लातूर, उस्मानाबाद, बीड, पुणे, ओतूर, माहूर, मुंबई (डोंबिवली) अखिल भारतीय साहित्य संमेलन ९० वे, छत्तीसगढ, गुजरात, आदी ठिकाणं पादाक्रांत केली आहेत. नांदेड शहरातही वैविध्यपूर्ण औचित्याने अनेक कविसंमेलनाचे अध्यक्ष ते राहिले आहेत. सहभागही नोंदविला आहे. काव्य पौर्णिमा कार्यक्रमातील हुताशनी पौर्णिमा आणि कोजागिरी पौर्णिमेचे ते गेली सात वर्षे सतत आयोजक राहिले आहेत. याबरोबरच अनेक साहित्य संमेलनातही आपला ठसा उमटवला आहे. पद्मांकुर सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले आहेत. त्यात त्यांचा मोठा वाटा आहे. कोरोना काळातील त्यांचे कार्य वाखाणण्याजोगे आहे. सप्तरंगी साहित्य मंडळातही ते सक्रिय आहेत. त्यांना आत्तापर्यंत महात्मा कबीर समता परिषद महाराष्ट्रचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार -2017, हिंगोली येथील मातोश्री प्रतिष्ठानचा सयाई काव्य गौरव’ पुरस्कार- 2017, गुजरात (बडोदा) येथील मराठी वाङमय ‘मराठी भाषा अभिरुची पुरस्कार’ – 2017 अंतरीचे रान या काव्यसंग्रहास प्राप्त झालेला आहे. याच कवितासंग्रहाला जनहित साहित्यरत्न पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला आहे. साहित्य, कला, विज्ञान मंडळ कंधार यांच्याकडून “साहित्य कलारत्न” पुरस्कार -2020, जि. प. नांदेडचा आदर्श शिक्षक पुरस्कार-2020, ‘पंचांग’ या शॉर्ट फिल्म साठी ‘बेस्ट अवाॅर्ड’, व्यसन – द लास्ट पेग शॉर्ट फिल्म पुणे फेस्टिव्हलमध्ये टाॅप टेन येण्याचा बहुमान मिळाला आहे.

कोरोना काळात माणसाचे जगणे कठीण झाले होते. या रोगामुळे माणसं मरत होती. तर बेरोजगारी व उपासमारीमुळे गोरगरीब जनता अन्नाला मोताद होती. अशावेळी शहरातील विविध ठिकाणी जवळपास १२० कुटुंबांच्या भुकेल्या तोंडी घास भरविण्याचे कार्य कोकुलवारांच्या पुढाकाराने झाले आहे. पोलिस प्रशासनाकडून परवानगी घेवून कोकुलवार यांनी धान्य पॉकेट वितरण केले. ते अगदी गरीब व गरजू कुटुंबाचे कोरोना योध्दा सारखे धाडसी कार्य केले. याचा साक्षीदार मी स्वतः आहे. या उपक्रमात अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत मी सोबत होतो. त्यांच्या अंगी असलेली तळमळ आणि काही करण्याची इच्छा; त्यासाठीची जिवापाड मेहनत मी जवळून पाहिली आहे.
ज्या ज्या वेळी गोरगरीब जनता आर्थिक संकटात असते येईल त्या त्या वेळी ते धावून जातात. नामांतराच्या काळात जेव्हा बौद्ध वस्त्यांवर हल्ले होत होते, त्यावेळी त्यांनी सवर्णांच्या रोष पत्करून भयभीत झालेल्या बौद्ध स्री पुरुष बायका पोरांना आपल्या घरी आश्रय दिला होता. ते आजही समाजाचे उत्तरदायित्व मानतात. २०१७ साली पद्माकुंर सेवाभावी संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय भव्य वधुवर परिचय मेळाव्याचे आयोजन त्यांनी केले होते. मेळाव्याच्या आठ दिवस अगोदर जेव्हा ते महाराष्ट्रभर फिरत होते, त्यावेळी ते एका मोठ्या अपघातातून बचावले. कार्यक्रम राज्यस्तरीय होता तरीही त्यांच्या अगदी उत्तम संयोजनामुळे देशपातळीवर जवळपास एक हजार उपवर – उपवधु यांची हजेरी राहिली होती. अशा कामी त्यांनी कधी हार मानली नाही. तसेच त्यांनी हाती घेतलेल्या कार्यात अयशस्वी झाले आहेत असे काही ऐकिवात नाही.‌ हे पडताळून पहायचेच तर याची अनेक उदाहरणे आहेत. ते प्रत्येक कार्य तन-मन-धनाने आणि प्राणपणाने करीत असतात हे त्याच्या कार्यकर्तृत्वावरून दिसून येते.

 

नांदेडात कोकुलवार कुटुंबापैकी अनेकजण प्रतिष्ठित आहेत. राजकारणात, व्यापारी तसेच सरकारी नोकरीतही आहेत. पांडुरंग कोकुलवार हे शिक्षक होते. त्यांच्या सुविद्य धर्मपत्नी सौ. मिनाक्षी कोकुलवार ह्या पण शिक्षिका आहेत. त्यांचा मोठा मुलगा आकाश कोकुलवार हे केंद्र सरकारच्या सेवेत आहे. दुसरा मुलगा रशियामध्ये वैद्यकीय शिक्षण घेत आहे. कोकुलवारांनी आयुष्यभर सत्याची कास धरली. प्रामाणिकपणे सेवा केली. हे सगळे त्याचेच फळ आहे. त्यांची सांपत्तिक स्थिती चांगली आहे. त्यांनी चुकीच्या गोष्टींना, असत्याला थारा दिलेला नाही. ते कधीही आपल्या स्वार्थासाठी खोटारडेपणाने वागले नाहीत. इतरांना मदतच केली. त्यांची वृत्ती नेहमीच दानशूर अशी राहिली आहे. त्यांनाच अनेक जणांनी फसवले असेल परंतु त्यांनी कोणत्याही परिस्थितीत कुणालाही अडचणीत आणले नाही. आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम राबविले. खर्चाची चिंता केली नाही. तसेच अभिनय, अनेक लघुचित्रपट बनवणे, मार्कंडेयाची भक्तीगीते लेखन व चित्रिकरण यासाठी खूप पैसा खर्च केला. साहित्य सेवेच्या मदतीलाही ते ठामपणे उभे राहतात. आंबेडकरवादी साहित्य संमेलन, अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनातही सहभाग नोंदविला आहे. बुद्ध, म. बसवेश्ववर, शिवाजी महाराज, लोकमाता अहिल्या, म. फुले, सावित्रीमाई फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णा भाऊ साठे यांच्याबद्दल ते नेहमी कृतज्ञता व्यक्त करतात. नांदेडच्या महात्मा कबीर समता परिषदेने त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी मोठ्या प्रमाणात काव्यलेखन केले आहे. त्यांच्यात आजही एखाद्या तरुणाला लाजवेल असे सळसळते चैतन्य आहे. त्यांचा जन्मच चैत्र/ वैशाख महिन्यातला आहे. ही चैत्रपालवी अधिकाधिक पल्लवित होवो. त्यांना त्यांच्या सेवानिवृत्तीनंतरही अनेक वर्षे निरामय, आरोग्यदायी आयुष्य लाभो हीच मनोकामना व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद!

 

– प्रज्ञाधर ढवळे, नांदेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *